हिंदु राष्ट्र निर्माण होण्यासाठी जगभरातून आवाज येत आहे !
पुरीच्या पुर्वाम्नाय पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे विधान !
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणू शकत नाही. राज्यघटनेच्या सीमेत असे होऊ शकत नाही. देशाचे विभाजन हिंदु आणि मुसलमान धर्मावरून झाले. महंमद पैगंबर आणि येशू यांचे पूर्वज कोण होते ? याचा शोध घेतल्यास हिंदु राष्ट्र होण्यास काय अडचण आहे ? हिंदु राष्ट्र निर्माण करणे, आमच्यासाठी कठीण नाही. आम्ही जे बोलतो ते होते, जे होणार आहे, तेच आम्ही बोलतो. संपूर्ण जगातून आवाज येत आहे की, हिंदु राष्ट्र निर्माण झाले पाहिजे, असे विधान पुरी (ओडिशा) येथील पुर्वाम्नाय पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केले. ‘श्रीमद् जगद्गुरु पुरी शंकराचार्य स्वागत समिती’, पुणे यांच्या वतीने बी.टी. कवडे रस्त्यावरील ‘मियामी टेरेस’ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते.
हिंदु राष्ट्रात प्रत्येकाच्या लौकीक आणि पारमार्थिक अभिव्यक्ती यांचा मार्ग विकसित होईल !
शंकराचार्य पुढे म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्रामध्ये शिक्षण, अर्थ, संरक्षण आणि सेवा हे वर्णानुसार कार्य चालेल. महिला सुरक्षित रहातील. विनागर्भपात लोकसंख्या नियंत्रित राहील. प्रत्येक व्यक्तीचे जीवन व्यसनरहित होईल. सुसंस्कारित, सुरक्षित, सुसंपन्न, सुशिक्षित सेवा, सदसद्विवेक सेवा अशी समाजरचना हिंदु राष्ट्रात असेल. प्रत्येकाच्या आयुष्यात लौकीक आणि पारमार्थिक अभिव्यक्ती यांचा मार्ग विकसित होईल.’’
सृष्टीच्या उत्पत्तीपासून चालणारी राजघटना हिंदु राष्ट्रात असेल !
मनुस्मृतीविषयी बोलतांना ते म्हणाले, ‘‘सृष्टीच्या उपत्तीपासून श्रीराम, श्रीकृष्ण यांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत कोणती राज्यघटना चालू होती. त्या राज्यघटनेने धर्मराज्य, रामराज्य दिले. भारत विश्वगुरु होता, तीच राज्यघटना हिंदु राष्ट्रात असेल.’
हिंदूंनी धर्माचरण केल्यास त्याचे रक्षण होईल !
शंकराचार्य म्हणाले की, धर्माचरण केल्यास हिंदू पूजला जाईल. केवळ पोट (खाणे-पिणे) आणि परिवार यांपर्यंत हिंदु विचार करत आहे. त्याने हिंदु राष्ट्र, धर्मानुसार मार्गक्रमण, सेवा आणि संघटित राहिला, तर त्याची पूजा केली जाईल. अन्यथा तिथेही (बांगलादेशात) मारला जाईल आणि येथेही (भारतातही) मारला जाईल. त्यामुळेच हिंदूंना अनेक ठिकाणांहून पळून जावे लागले. त्यासाठी ईश्वराचे नामस्मरण करा.
हिंदु शब्दाचे अर्थशंकराचार्यांनी हिंदु शब्दाचे अर्थ सांगतांना म्हटले की, हिंदु शब्दाचे २ अर्थ आहेत. पहिला ‘हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या भूमीला ‘हिंदुस्थान’ म्हणतात.’ दुसरा हिंदु म्हणजे ‘स्वत:तील स्वभावदोष दूर करणारा, हीनता, दरिद्रता दूर करणारा हिंदु’ असा आहे. |