‘कट कमिशन’च्या नावाने रुग्णांना लुटण्याचा प्रकार थांबण्यासाठी सरकारने कठोर कायदा करावा ! – राम कदम, आमदार भाजप
‘सनातन प्रभात’कडे मांडले मत
नागपूर – भाजपचे आमदार श्री. राम कदम यांनी महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात चाललेल्या भ्रष्टाचाराविषयी ‘कट प्रॅक्टिस’चे (वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकाराचे) सूत्र सभागृहात उपस्थित केले. मुंबई सहित संपूर्ण महाराष्ट्रात आधुनिक वैद्यांची ‘कट कमिशन’ची ‘प्रॅक्टिस’ चालू आहे. एखाद्या रुग्णाने कोणत्याही ‘लॅब’मध्ये एखादी चाचणी केली किंवा एखाद्या रुग्णालयात भरती झाला, तर त्यानंतर येणारे जे देयक आहे, ते समजा एक लाख रुपये झाले, तर त्यातील २५ ते ४० सहस्र रुपये एवढे मोठे ‘कमिशन’ आधुनिक वैद्यांना दिले जाते.
कट कमिशनच्या नावाने गोरगरीब रुग्णांना हा जो भुर्दंड सहन करावा लागतो, ते कट कमिशन थांबले पाहिजे. महाराष्ट्र सरकारने या संदर्भातील कठोर कायदा करावा, यासाठी मी सभागृहात मागणी केली आहे, असे भाजपचे आमदार राम कदम यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना ‘कट प्रॅक्टिस’विरोधी कायदा महाराष्ट्रात यावा; म्हणून त्यांनी समिती स्थापन केली. त्या समितीने अहवालही सादर केला आहे. त्यामुळे मी स्वतः याचा पाठपुरावा घेऊन हा कायदा लागू होण्यासाठी प्रयत्न करीन, असेही श्री. राम कदम यांनी सांगितले.