डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलण्याची अनुमती नाकारल्याने विरोधकांचा सभात्याग !

  • केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वक्तव्याचे अधिवेशनात पडसाद !

  • डॉ. आंबेडकरांचा अवमान करून राजकारण करणार्‍या विरोधकांना उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सुनावले

नागपूर, १८ डिसेंबर (वार्ता.) – संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले आहेत. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सभागृहात उभे राहून बोलण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी १८ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत केली; मात्र उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी ‘विधीमंडळाच्या नियमानुसार संसदेच्या सभागृहात केलेल्या वक्तव्याचा विधान परिषदेत उल्लेख करता येत नाही’, असे स्पष्ट करून दानवेंसह विरोधकांना बोलण्याची अनुमती नाकारली. या विषयावर बोलू न दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहात गदारोळ केला, तसेच घोषणा देत सभात्याग केला.

प्रारंभी अंबादास दानवे म्हणाले की, सभागृहात आम्ही गृहमंत्र्यांच्या विधानाचा निषेध केल्यावर ते ‘रेकॉर्ड’वर येण्यासाठी उपसभापतींनी वेगळी भूमिका घेतली. गृहमंत्र्यांचे उद्गार हे राज्यघटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अवमान करणारे आहे. महायुती त्यांचा आदर करत नाही का ? संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे सूत्र राज्यातील सभागृहात उपस्थित केले जाते, मग केंद्रीय गृहमंत्री यांच्या उद्गाराचे सूत्र का उपस्थित केले जात नाही ? असे सांगून त्यांनी निषेध व्यक्त केला.

उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे म्हणाल्या की, डॉ. आंबेडकरांचा आम्हाला आदर आहे. या विषयावरून विरोधकांनी विनाकारण गदारोळ करू नये. मी अनुमती न दिल्यामुळे सदस्यांनी दिशाभूल करून आरडाओरड करू नये. कामकाज करायचे कि नाही, ते सांगा. विरोधक गोंधळ घालून डॉ. बाबासाहेबांचा अवमान करत आहेत.