‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’च्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण !
नागपूर – राज्यातील गोवंशियांच्या संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’च्या www.mahagosevaayog.org या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १७ डिसेंबर या दिवशी येथे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम विधानभवनातील समिती सभागृहात पार पडला. राज्यामध्ये देशी गोवंशियांचे संवर्धन, संरक्षण आणि कल्याण करण्यासाठी अन् त्यासाठी कार्यरत असणार्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी ‘गोसेवा आयोगा’ची स्थापना करण्यात आली आहे.
१. ‘राज्यात १ कोटी ३९ लाख गोवंश असून त्यामध्ये १३ लाख देशी गायी असल्याची माहिती अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. ‘गो टेन’च्या अंतर्गत गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमय मूल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गोपालक, गो आधारित शेती, गो साक्षरता आणि गो पर्यटन या माध्यमांतून गायींच्या संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. राज्यात देशी गायींसाठी विशेष दुग्धशाळा निर्माण करण्यात येतील’, असेही मुंदडा यांनी सांगितले.
२. आयोगाच्या वतीने देशी गोवंशियांचे संवर्धन, संरक्षण आणि कल्याण करणे अन् त्यासाठी कार्यरत असणार्या संस्थांचे पर्यवेक्षण केले जात आहे. गोशाळा, गोसदन, पांजरपोळ आणि गोवंश संस्थांची नोंदणी, गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना अन् इतर योजना अंतर्भूत करणे आणि त्याची कार्यवाही करणे, पशूआरोग्य सेवांचे प्रचालन करणे, दुर्बल, वयस्क आणि रोगग्रस्त पशूंचे व्यवस्थापन, काळजी आणि उपचार यांची सुनिश्चिती, पशूंची काळजी घेणार्या व्यक्तींचे प्रशिक्षण आणि जनजागृती केली जात असून त्याबाबतची माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यात आली आहे.
३. सर्वसामान्य जनता आणि गोवंश संवर्धन करणार्या संस्थांसाठी या संकेतस्थळाच्या माध्यमातून एका ‘क्लिक’वर माहिती उपलब्ध करून दिली आहे.
४. संकेतस्थळाच्या अनावरणप्रसंगी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, गोसेवा आयोगाचे सदस्य सर्वश्री संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय, उद्धव नेरकर, सुनील सूर्यवंशी, सनत कुमार गुप्ता, दीपक भगत आदी उपस्थित होते.