तमिळनाडूमध्ये फोफावणारा आतंकवाद आणि फुटीरतावाद रोखा ! – डॉ. पाळा संतोष कुमार, ‘हिंदु येल्लूची पुरवाई’

‘हिंदु येल्लूची पुरवाई’ची केंद्र सरकारकडे मागणी  

डावीकडून केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार आणि डॉ. पाळा संतोष कुमार

चेन्नई – तमिळनाडूमध्ये फोफावणारा आतंकवाद आणि फुटीरतावाद रोखण्यासाठी केंद्र सरकारने विशेष लक्ष द्यावे. तसेच राज्यातील आतंकवाद निपटण्यासाठी विशेष विभागाची स्थापना करावी, अशी मागणी तमिळनाडूतील ‘हिंदु येल्लूची पुरवाई’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. पाळा संतोष कुमार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार यांची भेट घेऊन त्यांनी तमिळनाडूमध्ये वाढीस लागलेला आतंकवाद निपटण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

१. अल्पसंख्य चळवळीच्या नावाखाली तमिळनाडूमध्ये आतंकवादी कारवाया चालू आहेत. तमिळनाडू सरकार आणि राजकीय पक्ष निवडणुकीत एकगठ्ठा मतांसाठी आतंकवादाला विरोध करण्यास धजावत नाहीत. तमिळनाडूमधील काही फुटीरतावादी चळवळी राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधात उघडपणे प्रचार करतात आणि आतंकवादाचे समर्थन करतात, असे डॉ. पाळा संतोष कुमार यांनी म्हटले आहे.

२. आंतरराष्ट्रीय आतंकवादाशी संबंधित कारवाया, बाँबस्फोटांची मालिका, जिहादी कारवाया राज्यात मोठ्या प्रमाणात चालू आहेत. देशाची शांतता भंग करण्याच्या उद्देशाने तमिळनाडूमध्ये आतंकवादी कारवाया वाढीस लागल्या आहेत. केंद्रीय गृहखात्याने याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही ते या वेळी म्हणाले.

संपादकीय भूमिका

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी राष्ट्रप्रेमी संघटनांवर येऊ नये. सरकारने स्वतःहून ही कारवाई करणे आवश्यक !