Ajit Doval China visit : (म्हणे) ‘आम्ही प्रामाणिकपणे मतभेद सोडवण्यास सिद्ध !’ – चीन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनमध्ये घेतली चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट
बीजिंग (चीन) – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची येथे भेट घेतली. भारत आणि चीन यांच्यातील २३ व्या विशेष प्रतिनिधी स्तरावरील बैठकीत सहभागी होण्यासाठी डोवाल आले होते. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर शांतता आणि स्थिरता राखणे, तसेच गेल्या ४ वर्षांहून अधिक काळ रखडलेले द्विपक्षीय संबंध पूर्ववत् करणे यांसह अनेक सूत्रांवर या वेळी चर्चा झाली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी सांगितले की, भारतासमवेत केलेल्या करारांची कार्यवाही करण्यास आम्ही सिद्ध आहेत. चीन प्रामाणिकपणे मतभेद सोडवण्यास सिद्ध आहे.
वर्ष २०१९ नंतर ही पहिलीच वेळ आहे की, भारताचा वरिष्ठ अधिकारी चीनला भेट देत आहे. यापूर्वी २०१९ मध्ये परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर बीजिंगला गेले होते.
पूर्व लडाखमधील सीमावादावरून भारत आणि चीन यांच्यामध्ये ४ वर्षांपासून तणाव होता. २ वर्षांच्या वाटाघाटीनंतर २१ ऑक्टोबरला दोन्ही सैन्याने सीमेवरील वादग्रस्त ठिकाण डेपसांग आणि डेमचोक येथून माघार घेण्याचा करार झाला. यानंतर २५ ऑक्टोबरपासून दोन्ही देशांच्या सैन्याने या ठिकाणांवरून माघार घ्यायला चालू केले.
संपादकीय भूमिकाचीनसारखा विश्वासघातकी देश जगाच्या पाठीवर नाही. त्यामुळे त्याने जे म्हटले त्यावर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे आणि ते भारताला आता ठाऊक आहे ! |