घोटाळे करून भारताबाहेर पळून गेलेल्या उद्योगपतींकडून आतापर्यंत २२ सहस्र २८० कोटी रुपये वसूल ! – FM Nirmala Sitharaman

कुणालाही सोडणार नाही ! – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् (डावीकडे) घोटाळे करून पळालेले उद्योजक नीरव मोदी, मेहूल चोक्सी आणि विजय मल्ल्या (उजवीकडे)

नवी देहली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी संसदेत माहिती देतांना सांगितले की, घोटाळे करून देशाबाहेर पळालेले उद्योजक विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्याकडून २२ सहस्र २८० कोटी रुपये अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्या माध्यमातून वसूल करण्यात आले आहेत. या प्रकरणी यापुढेही कारवाई चालूच रहाणार आहे. विजय मल्ल्याकडून १४ सहस्र १३१ कोटी ६० लाख रुपयांची संपत्ती वसूल करून ती सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला परत देण्यात आली. तसेच नीरव मोदी प्रकरणात १ सहस्र ५२ कोटी ५८ लाख रुपये वसलू करण्यात आले आहेत. आम्ही कुणालाही सोडले नाही. भलेही ते देश सोडून पळाले असतील; पण आम्ही त्यांच्या मागे लागलो आहोत. जो पैसा बँकांचा आहे, तो बँकांना परत मिळालाच पाहिजे.

मेहूल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी एकत्रितपणे पंजाब नॅशनल बँकेची १३ सहस्र कोटी रुपयांची फसवणूक केली होती. चोक्सीकडून २ सहस्र ५६६ कोटी रुपयांची संपत्ती वसूल करण्यात आली असून त्यांचा लिलाव करण्यात आला आहे, अशीही माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी दिली.