योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण
१. योगतज्ञ प.पू. दादाजी यांनी भक्ताला काटकसर करायला शिकवणे
‘एक भक्त मायेतील अनावश्यक गोष्टींमध्ये पुष्कळ खर्च करत असे. या गोष्टीची वारंवारता अधिक असल्यामुळे योगतज्ञ प.पू. दादाजींनी त्याला २ – ३ वेळा जाणीव करून दिली. योगतज्ञ प.पू. दादाजींना वाटायचे, ‘याने (भक्ताने) आताच काटकसर केली नाही, तर पुढे याचे कसे होईल ?’ योगतज्ञ प.पू. दादाजींना त्याच्या संभाव्य परिस्थितीची दूरदृष्टी असल्याने ते त्याला वेळोवेळी जाणीव करून देत असत. योगतज्ञ दादाजींना भक्तांची सर्वतोपरी काळजी आणि त्यांच्याबद्दल आत्मियता असल्याने ते भक्तांना वेळीच चुकीविषयी सावध करत अन् त्यांना होणार्या परिणामांची जाणीवही करून देत असत.
२. अध्यात्मात उच्च स्थानी असूनही योगतज्ञ दादाजी यांनी सर्वसामान्यांसारखे जीवन जगणे आणि स्वत:ला ‘एक हितचिंतक’, असे संबोधणे
योगतज्ञ प.पू. दादाजी अध्यात्मातील उच्च स्थानी होते, तरीही ते जनमानसात सर्वसामान्यांसारखे जीवन जगत होते. आपल्या वागणुकीतून त्यांनी स्वत:चा वेगळेपणा कधीच दाखवला नाही आणि तो इतरांना जाणवूही दिला नाही. ते दु:खी, कष्टी, आध्यात्मिक त्रासाने ग्रासलेल्या लोकांना स्वत: मध्ये असलेल्या दैवी बळाचा वापर करून संकटातून बाहेर काढत. असे करून ते त्यांना एकप्रकारे साहाय्य करत असत; परंतु योगतज्ञ दादाजी याचा कर्तेपणा स्वत:कडे न घेता, ते स्वत:ला एक ‘हितचिंतक’ म्हणत असत. ‘हितचिंतक’ म्हणजे नेहमी इतरांचे ‘हित चिंतणारा.’ योगतज्ञ दादाजी एखाद्याशी पत्रव्यवहार करत असत, तेव्हा ते पत्राच्या शेवटी ‘आपला हितचिंतक, दादाजी’ असे लिहीत असत, तसेच प.पू. दादाजी यांच्याविषयी कोणी आभार व्यक्त केले किंवा कृतज्ञता व्यक्त केली, तरी ते नेहमी ‘मी तुमचा ‘हितचिंतक’ आहे’, असे म्हणत. यावरून त्यांच्यातील सामान्यत्वाचे दर्शन होते. ‘आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये उच्चस्थानी असलो, तरी आपल्याला सामान्यांप्रमाणे रहाता यायला हवे’, हे त्यांच्या वागण्यातून लक्षात येते.
३. समोरील व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये ओळखून मोजक्या शब्दांत कौतुक करणे
अ. माझी पत्नी पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार (सनातन संस्थेच्या ६९ व्या समष्टी संत) हिचे योगतज्ञ दादाजी यांच्याशी प्रथम संभाषण झाल्यानंतर तिचे बोलणे ऐकून झाल्यावर योगतज्ञ दादाजी तिला म्हणाले, ‘‘स्वीट टॉक !’’, म्हणजे त्यांना म्हणायचे होते, ‘तुझे बोलणे गोड आहे.’ नंतर काही महिन्यांनी परत पू. (सौ.) अश्विनी आणि योगतज्ञ दादाजी यांचे भ्रमणभाषवर बोलणे झाले. तेव्हाही त्यांनी तिला ‘‘स्वीट टॉक !’’ असे म्हटले. योगतज्ञ दादाजी एखाद्याचे गुण बरोबर हेरत असत आणि लक्षातही ठेवत असत.
आ. एक साधक नेहमी टापटीपपणे रहायचा. स्वच्छ कपडे परिधान करायचा. हे पाहून योगतज्ञ दादाजी त्याला म्हणाले, ‘‘टीप टॉप !’’ यावरून व्यक्तीच्या गुणांना मोजक्या शब्दांत योग्य विशेषण देण्याची त्यांची पद्धत लक्षात येते.
४. पुढे इतरांना चालण्यासाठी वापरायला मिळावे; म्हणून भक्तवत्सल योगतज्ञ प.पू. दादाजी यांनी तशा वस्तू आणणे
योगतज्ञ दादाजी यांना वय वर्ष ९५ पासून वयोमानानुसार ‘व्हीलचेअर’ची (चाकाच्या आसंदीची) आवश्यकता भासू लागली. कोणाचाही आधार न घेता स्वतंत्र चालता यावे; म्हणून त्यांनी बाजारातून नवीन ‘वॉकर’ (पांगुळ गाडा), तीन पायांची काठी (चालतांना तोल जाऊ नये म्हणून वापरण्यासाठी) आणायला सांगितली, तसेच एक ‘व्हीलचेअर’ असतांना त्यांनी अधिक २ ‘व्हीलचेअर’ आणायला सांगितल्या. त्यामध्ये एक वजनाने हलकी आणि दुसरी थोडीशी मोठी होती. त्याप्रमाणे या सर्व वस्तू बाजारातून आणल्या. वास्तविक पाहता ‘एक ‘व्हीलचेअर’ वगळता उर्वरित वस्तूंचा ते वापर करतील’, असे आम्हाला वाटत नव्हते. ‘योगतज्ञ दादाजींचा यामागचा कार्यकारणभाव कोणाच्या लक्षात येईल’, असे नव्हते. योगतज्ञ दादाजी यांचे आज्ञापालन म्हणून या वस्तू आणल्या. वॉकर (पांगुळ गाडा), तीनपायी काठी यांचा वापर योगतज्ञ दादाजींनी जेमतेम १ – २ वेळा केला असेल. त्यानंतर त्यांनी त्या वस्तू परत वापरल्या नाहीत. आजवर काटकसर करीत आलेले योगतज्ञ दादाजी आता अनावश्यक खर्च कशाला करतील ? बघणार्यांना वाटेल, ‘या वस्तू योगतज्ञ दादाजींसाठीच आणल्या असतील’; परंतु त्यांनी फार पुढील विचार केला होता. ‘माझ्यानंतर कुटुंबातील मंडळीना किंवा इतरांना त्यांचा उपयोग होईल. त्यांना काही कारणास्तव अथवा वृद्धापकाळात या वस्तूंची आवश्यकता भासेल. तेव्हा त्यांना या वस्तूंची शोधाशोध करायला नको, तसेच कुटुंबातील मंडळींचे वय झाल्याने, तेव्हा त्यांना या वस्तू आणायला अडचण नको. या वस्तू घरातच असल्याकारणाने ते त्यांचा उपयोग करतील’, हे त्यांना ज्ञात होते. या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी त्या वस्तू घेऊन ठेवल्या होत्या. ‘योगतज्ञ दादाजी नेहमी स्वत:च्या आधी इतरांचा विचार करत असत’, असे पुष्कळ प्रसंगांत त्यांच्या सहवासात असतांना लक्षात आले. योगतज्ञ दादाजी यांच्या देहत्यागानंतर ‘व्हीलचेअर’, तीनपायी काठी आणि ‘वॉकर’ या वस्तूंचा उपयोग त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांनाही झाला. त्याचप्रमाणे ‘योगतज्ञ दादाजींनी त्या वस्तू १ – २ वेळा वापरल्या असल्याने त्यांतील चैतन्याचा लाभ वापरकर्त्यांना झाला’, असे मला जाणवले.
५. साधनेसाठी येणार्या भक्तांची सोय व्यवस्थित होण्यासाठी स्वत: लक्ष घालणे
योगतज्ञ दादाजी नाशिक येथे असतांना साधक आणि हितचिंतक योगतज्ञ दादाजींच्या दर्शनासाठी येत असत. काही साधक साधनेसाठी नाशिक येथील निवासस्थानी राहण्यास येत असत. तेव्हा योगतज्ञ दादाजी ‘त्यांचे जेवण आणि रहाणे या व्यवस्था व्यवस्थित केल्या आहेत ना ? त्यांना काही अडचण नाही ना ?’, हे स्वत: पहात असत. ‘साधकांना लागणार्या वस्तू, उदा. झोपण्यासाठी गाद्या, उशा, पलंग पुरेसे आहेत ना ?’, हे मला विचारत असत. नाशिक येथील निवासस्थानी लहानसे स्वयंपाकघर, प.पू. दादाजींची लहानशी खोली आणि एक मोठी बैठकीची खोली होती. योगतज्ञ दादाजी यांनी बैठक खोलीत एका कोपर्यात ‘प्लायवुड’चे ‘पार्टीशन’ करायला सांगून साधिकांना आवरण्यासाठी खोली बनवून घेतली. त्यामुळे साधिकांची आवरण्याची सोय झाली. त्यानंतर काही कालावधीने बैठक खोलीतील दुसर्या कोपर्यामध्ये पुरुषांना आवरण्यासाठी दुसरी खोली बनवली. जेणेकरून येणार्या भक्तांची सोय व्यवस्थित होऊन कोणाला अडचण येणार नाही. ‘साधनेसाठी येणार्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये’, याकडे योगतज्ञ दादाजींचे विशेष लक्ष असायचे.
६. सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणे
बैठक खोलीमध्ये सुतारकाम करणारे कारागीर काम करत असतांना योगतज्ञ दादाजी मधेच फेरी मारत असत. ते स्वत: लक्ष घालून आवश्यक तेथे पालट करायला सांगत. वय ९९ वर्षे असतांनाही ते स्वत: लक्ष घालत असत. त्यावरून त्यांच्यातील गुणांचे दर्शन होते.
७. कृतीतून शिकवणे
अ. योगतज्ञ दादाजींना अव्यवस्थितपणा अजिबात आवडत नसे. योगतज्ञ दादाजी ‘व्हीलचेअर’वरून बैठक खोली, तसेच स्वयंपाकघर येथे मधे मधे फेरी मारत असत. कोठे साहित्य अव्यवस्थित ठेवलेले दिसल्यास ते त्याच वेळी व्यवस्थित ठेवायला सांगत. बैठक खोलीमध्ये खुर्च्या तिरक्या किंवा अव्यवस्थित ठेवल्या असतील, तर त्या व्यवस्थित करायला सांगत.
आ. आम्ही राहत असलेल्या निवासस्थानी आरंभी स्वयंपाकघरात असलेल्या जेवणाच्या पटलावर सामान अव्यवस्थित असे. लहान-लहान कागदी पुड्यांमध्ये किंवा पिशवीमध्ये असलेले साहित्य पटलावर ठेवलेले असे. हे योगतज्ञ दादाजी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मला एका विशिष्ट मापाचे ‘प्लॅस्टिक’चे पारदर्शक एकसारखे डबे बाजारातून आणायला सांगितले. पटलावर असलेल्या पुड्यांमधील सामान पारदर्शक डब्यांमध्ये भरले आणि जेवणाच्या पटलाला लागून असलेल्या लाकडी फळीवर एका रांगेत लावले. ‘पारदर्शक डब्यांमुळे आतमध्ये कोणते धान्य किंवा वस्तू ठेवली आहे’, हे लक्षात येते. स्वत: योगतज्ञ दादाजींनीच ते साहित्य व्यवस्थित लावले. ‘योगतज्ञ दादाजींनी स्वत: पटल आवरला’, हे साधकांच्या लक्षात आल्यानंतर साधक त्यानंतर स्वत:च साहित्य व्यवस्थित ठेऊ लागले.
८. भेटायला येणार्यांचा वेळ सत्कारणी लागावा, यासाठी प्रयत्न करणे
योगतज्ञ दादाजी यांना भेटण्यासाठी साधक, तसेच साधकांचे नातेवाईक येत असत. त्यांना रिकाम्या वेळेत वाचण्यासाठी बैठक खोलीमध्ये ‘टिपॉय’वर एका पिशवीमध्ये धार्मिक पुस्तके आणि मासिके ठेवलेली असत. योगतज्ञ दादाजी यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात पिशवीवर ‘वाचनीय, वाचून परत जागेवर ठेवा’, असे लिहिलेले असायचे. एखाद्या पुस्तकात किंवा मासिकात वैशिष्ट्यपूर्ण काही लिखाण असेल, तर त्याच्या पहिल्या पानावरच त्याच्या पान-क्रमांकाचा संदर्भ देऊन ‘हे अवश्य वाचा’, असे लिहिलेले असायचे. त्याचप्रमाणे बैठक खोलीत एक मोठा सूचना फलक बनवून घेतला होता. त्यावर साधनेला उपयुक्त असे माहितीचे कागद, साधकांच्या अनुभूती, तसेच काही वैशिष्ट्यपूर्ण अनुष्ठाने यांची माहिती लावलेली होती. ‘भेटायला येणार्यांचा वेळ जाऊ नये आणि त्यांनी वेळेचा योग्य वापर करून सत्विषयी वाचन करावे’, असा योगतज्ञ दादाजी यांचा उद्देश असायचा.’
– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.७.२०२४)