ऐतिहासिक विजय संपादन करणार्या धर्मप्रेमी लोकप्रतिनिधींचा संत-महंतांच्या उपस्थितीत नागपूर येथे १९ डिसेंबरला सन्मान सोहळा !
|
नागपूर – नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ‘व्होट (मतदान) जिहाद’चा पराभव करून ऐतिहासिक विजय संपादन करणार्या हिंदु धर्मप्रेमी लोकप्रतिनिधींचा सन्मान सोहळा संत-महंत, समस्त मंदिर विश्वस्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या उपस्थितीत १९ डिसेंबरला नागपूर येथे आयोजित केला आहे. ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा सोहळा नागपूर येथील ‘विदर्भ साहित्य संघा’च्या सभागृहात सायं. ५.३० ते रात्री ८ या वेळेत होणार आहे. ‘हिंदुत्वनिष्ठांचे सरकार आणि सरकारचे हिंदुत्व’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक तथा ‘मंदिर महासंघा’चे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली. ते येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर, नागपूर येथील श्री बृहस्पती मंदिराचे विश्वस्त श्री. रामनारायण मिश्र, ‘श्री पंचमुखी हनुमान मंदिरा’चे विश्वस्त श्री. दिलीप कुकडे, ‘राष्ट्रीय युवा गठबंधन’चे संस्थापक अध्यक्ष श्री. राहुल पांडे आणि भाजपचे श्री. अनिल शर्मा उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, मंत्री सर्वश्री भरतशेठ गोगावले, योगेश कदम, आशिष जयस्वाल, तर भाजपचे मंत्री सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे, अतुल सावे, आकाश फुंडकर, संजय सावकारे, पंकज भोयर, तसेच शिवसेनेचे आमदार सर्वश्री प्रदीप जयस्वाल, चंद्रकांत सोनावणे, अमोल खताळ, बालाजी किणीकर, तर भाजपचे आमदार सर्वश्री मंगेश चव्हाण, सुनील कांबळे, सत्यजित देशमुख, अतुल भातखळकर, प्रतापराव अडसर, महेश लांडगे, सुरेश भोळे, शंकर जगताप, सचिन कल्याणशेट्टी, नारायणराव कुचे, संजय केळकर, कालीदास कोळंबकर, सुभाष देशमुख यांच्यासह अनेक विजयी आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनाही महासंघाच्या वतीने नागपूर येथील विधान भवनात प्रत्यक्ष भेटून कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. चांगला कार्यक्रम आयोजित केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी भेटीत सांगितले. या सोहळ्यासाठी सर्वांना मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे, तसेच अधिक माहितीसाठी ७०५७३६८८६० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.