दोडामार्ग तालुक्यात हत्तीकडून मोठी हानी : शेतकरी धास्तावले

प्रतिकात्मक छायाचित्र

दोडामार्ग – तालुक्यातील वीजघर आणि घाटीवडे परिसरात हत्तीचे आगमन झाले आहे. या हत्तीने येथील ४ – ५ शेतकर्‍यांच्या केळी, सुपारी आणि माड यांच्या बागायतींची मोठी हानी केली आहे. गेले काही महिने हे हत्ती नव्हते. त्यामुळे शेतकर्‍यांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला होता; मात्र हत्ती परत आल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

तिलारी खोर्‍यात मागील २२ वर्षांपासून हत्तींचा उपद्रव चालू आहे. हत्तींना आवश्यक अन्न आणि विपुल प्रमाणात पाणी तिलारी खोर्‍यात मिळत असल्याने ते येथेच स्थिरावले आहेत. हे हत्ती शेतकर्‍यांच्या केळी, सुपारी, माड यांच्या बागायती, तसेच पावसाळी आणि उन्हाळी पिकांची मोठ्या प्रमाणात हानी करत आहेत. हे हत्ती दोडामार्ग तालुक्याच्या नजीक असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या तालुक्यांतही अन्नाच्या शोधात भ्रमंती करत आहेत. तिलारी खोर्‍यात गतवर्षी हत्तींचे २ कळप वावरत होते. या वर्षी ऑगस्ट महिन्यानंतर हे हत्ती चंदगड आणि आसपासच्या परिसरात गेले होते. त्यानंतर नुकतेच या हत्तींचे तिलारी खोर्‍यात आगमन झाले. वीजघर,  घाटिवडे आदी भागांत या हत्तींनी हानी केली आहे. वन विभागाने घटनास्थळी जाऊन या हानीचा घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.