पुण्यातील प्रसिद्ध ‘ब्लू नाईल रेस्टॉरंट’शी संबंधित इराणी कुटुंबावर भारतीय नागरिकत्व मिळवून इराणी नागरिकत्व कायम ठेवण्याचा आरोप !
राष्ट्रीय सुरक्षेविषयी गंभीर चिंता !
पुणे – शहरातील प्रसिद्ध ‘ब्लू नाईल रेस्टॉरंट’शी संबंधित इराणी कुटुंबावर भारतीय कागदपत्रे बनावट पद्धतीने मिळवून इराणी नागरिकत्व कायम ठेवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. दिवंगत अब्दुल हमीद जाफरीनाईमी, ‘ब्लू नाईल रेस्टॉरंट’चे मालक आणि त्यांच्या कुटुंबावर हे आरोप लावले गेले आहेत. या प्रकरणामुळे राष्ट्रीय सुरक्षेविषयी गंभीर चिंता निर्माण झाली असून पुणे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी चालू केली आहे. दिवंगत जाफरीनाईमी यांचे पुत्र मोस्तफा जाफरी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, सर्व आरोप निराधार आहेत. तक्रारदाराच्या आरोपांमध्ये जर काही तथ्य असते, तर पोलिसांनी आतापर्यंत कारवाई केली असती; मात्र तसे काही झालेले नाही. समीर मजुमदार यांनी या संदर्भात तक्रार केलेली आहे.
हेरगिरीचा धोका ?
जाफरीनाईमीने संवेदनशील संरक्षण क्षेत्राच्या जवळ म्हणजेच ‘सदर्न मिलिटरी कमांड’जवळ १४ मजली इमारत बांधली आहे, जे अत्यंत गंभीर असून यामुळे हेरगिरीचे धोके आहेत.
संशयास्पद मृत्यू !
२९ ऑक्टोबर २०२४ या दिवशी मजुमदार यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात या कुटुंबाविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर तक्रार प्रविष्ट झाल्याच्या काही दिवसांनी म्हणजे १ नोव्हेंबर २०२४ या दिवशी जाफरीनाईमीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतरांना वाचवण्यासाठी आणि अन्वेषणाची दिशा भरकटवण्यासाठी त्यांचा मृत्यू घडवून आणला गेला असल्याचा आरोप मजुमदार यांनी केला आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, अशी अनेक कुटुंबे किंवा इतर देशांतील व्यक्ती यांनी भारतीय नागरिक म्हणून ओळख मिळवण्यासाठी पारपत्र आणि महत्त्वाची कागदपत्रे मिळवली आहेत. कायद्यातील अनेक पळवाटा अशा स्थलांतरितांना त्यांचे मूळ नागरिकत्व लपवून भारतीय नागरिक म्हणून राहू देतात. (असे असेल, तर अशांना पूर्ण निश्चिती न करता कागदपत्रे देणार्या प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही कारवाई हवी. – संपादक)
आम्ही अद्याप अन्वेषणाच्या प्रारंभिक टप्प्यात आहोत ! – पोलीस
मजुमदार यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यावर निष्क्रीयतेचा आरोप केला आहे. आरोपांचे गांभीर्य असूनही, कोणताही अधिकारी कारवाई करण्यास किंवा अशा गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यास सिद्ध नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते म्हणाले, ‘‘आम्हाला या प्रकरणाची माहिती आहे आणि त्याला अनेक पैलू आहेत, तथापि, आम्ही अद्याप तपासाच्या प्रारंभिक टप्प्यात आहोत.’’ (एवढे गंभीर प्रकरण असूनही अन्वेषणाच्या प्राथमिक टप्प्यात असल्याचे सांगणे, ही पोलिसांची निष्क्रीयता नव्हे का ? – संपादक)