पंचांची प्रत्यक्ष साक्ष, पंचनामा आणि प्रत्यक्ष वस्तूस्थिती यांतील अनेक तफावती अधिवक्ता अनिल रुईकर यांच्याकडून न्यायालयासमोर उघड !
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील एक संशयित डॉ. वीरेंद्र तावडे यांच्या घराची केंद्रीय अन्वेषण पथकाने १ जून २०१६ या दिवशी घेतलेली झडती आणि अन्य गोष्टी यांच्या संदर्भातील साक्ष मुंबई येथील मूल्यवर्धित करप्रणाली अधिकारी पंच अमित गोयल यांनी १७ डिसेंबरला न्यायालयात दिली. ही साक्ष देतांना त्या घटनेच्या वेळी प्रत्यक्ष पंचनाम्यात नमूद करणार्या आलेल्या गोष्टी, पंचांनी न्यायालयात दिलेली साक्ष अन् प्रत्यक्षातील वस्तूस्थिती यांत अनेक तफावती असल्याचे ज्येष्ठ अधिवक्ता अनिल रुईकर यांनी न्यायालयात उघड केले. डॉ. तावडे यांच्या घरातून वस्तू जप्त केल्यानंतर त्यातील एका वहीत एक छायाचित्र होते, त्याचा उल्लेख पंचनाम्यात नाही, डॉ. तावडे यांच्या घरातून जप्त केलेल्या एका छोट्या नोंदवहीत, तसेच अन्य एका वहीत दोन कागद मिळून आले याचाही उल्लेख नव्हता. डॉ. तावडे यांच्या घरावर त्यांच्या नावाची पाटी नव्हती आणि तसा उल्लेख पंचनाम्यात-प्रत्यक्ष साक्षीत नाही यांसह अनेक गोष्टी अधिवक्ता अनिल रुईकर यांनी उलट तपासणीत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.
बचाव पक्षाच्या अधिवक्त्यांनी पंचांना हिंदीतून प्रश्न विचारावेत, अशी सरकारी अधिवक्त्यांची आग्रही मागणी !बचाव पक्षाच्या वतीने अधिवक्ता अनिल रुईकर पंचांची उलटतपासणी घेत असतांना सरकारी अधिवक्त्यांनी पंचांना मराठी येत नसल्याचे कारण पुढे करत वारंवार अधिवक्ता अनिल रुईकर यांनी पंचांना हिंदीतून प्रश्न विचारावेत, अशी आग्रही मागणी केली. यावर अधिवक्ता अनिल रुईकर यांनी महाराष्ट्रात मराठीतून प्रश्न विचारण्यास काय हरकत आहे ? महाराष्ट्रात मराठीत नाही, तर कोणत्या भाषेत प्रश्न विचारणार ? असे प्रश्न न्यायालयासमोर उपस्थित केले. सरकारी पक्ष वारंवार अशा प्रकारे अडथळे निर्माण करणार असेल, तर सरकार पक्षाच्या वतीने दुभाषी ठेवावा, अशी मागणी केली. यावर दोन्ही बाजूने काही काळ खडाजंगी झाली. |
कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे. सरकार पक्षाच्या वतीने अधिवक्ता हर्षद निंबाळकर यांनी (साक्षीदार) पंच अमित गोयल यांची साक्ष नोंदवली. या प्रसंगी सरकार पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे उपस्थित होते. बचाव पक्षाच्या वतीने अधिवक्ता डी.एम्. लटके, अधिवक्त्या प्रीती पाटील आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते.
अधिवक्ता अनिल रुईकर उलट तपासणीत म्हणाले, ‘‘डॉ. तावडे यांच्या घरातून एक मोठी वही जप्त केली, त्यात अनेक पृष्ठे कोरी आहेत; मात्र कोर्या पृष्ठांवर नंतर कुणी नोंद करू नये यांसाठी पंच अथवा अन्वेषण अधिकारी यांच्या कुणाच्याही स्वाक्षरी नाहीत. पंचनाम्यात अथवा प्रत्यक्ष साक्षीत पंचांना कोणत्या खुनाच्या संदर्भात साक्ष नोंदवायची आहे, याचा उल्लेख नाही. डॉ. तावडे यांच्या घराच्या मालकी अधिकाराच्या संदर्भातील कागदपत्रे पंचांनी पडताळली नाहीत, घरातून नेमक्या कोणत्या खोलीतून वस्तू जप्त करण्यात आल्या याचा उल्लेख पंचनाम्यात अथवा साक्षीत नाही.’’