विकासक्षम नागरिकांमुळेच राष्‍ट्राची प्रगती ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘राज्‍यस्‍तरीय दिव्‍यांग शिबिरा’चे पुणे येथे उद़्‍घाटन !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

पुणे – भारताच्‍या विकासासाठी समाजातील सर्व घटकांना सक्षम करणे आवश्‍यक आहे. देशाचा विकास हा केवळ सेवेपुरता मर्यादित नाही, तर सेवेतून नागरिकांना विकासक्षम बनवायला हवे. अशा विकासक्षम नागरिकांमुळेच राष्‍ट्राची प्रगती होते, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. खराडी येथील ‘ढोले पाटील एज्‍युकेशन सोसायटी’ येथे आयोजित ‘भारत विकास परिषद विकलांग केंद्रा’च्‍या रौप्‍य महोत्‍सवी वर्षाच्‍या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. यानिमित्त राज्‍यस्‍तरीय विनामूल्‍य दिव्‍यांग (अपंग) शिबीर आयोजित करण्‍यात आले होते. त्‍यामध्‍ये १ सहस्र २०० दिव्‍यांगांना मॉड्युलर कृत्रिम हात आणि पाय बसवण्‍यासाठी मोजमाप घेण्‍यात येत आहे.

प.पू. सरसंघचालक पुढे म्‍हणाले की, काही अंशी अहंकार ही माणसाला कार्यप्रवृत्त करण्‍यास आवश्‍यक प्रेरणा ठरते; परंतु त्‍या पलीकडे येते, ती शाश्‍वत प्रेरणा ! ती चिरंतन असते. त्‍यातून निर्माण होणारा सेवाभाव म्‍हणजे सेवानिष्‍ठांची मांदियाळी होय. आपलेपणाचा स्रोत एकसारखाच असतो, त्‍यातून लोकोत्तर प्रेरणेने सेवा घडते.

कार्यक्रमाला फाउंडेशनचे अध्‍यक्ष दत्ता चितळे, सचिव राजेंद्र जोग, ‘ढोले पाटील एज्‍युकेशन सोसायटी’चे अध्‍यक्ष सागर ढोले पाटील उपस्‍थित होते. दिव्‍यांग केंद्राला आर्थिक साहाय्‍य करणार्‍या महाराष्‍ट्र नॅचरल गॅस, ढोले पाटील एज्‍युकेशन सोसायटी, ‘ब्रिज नेक्‍स्‍ट’, ‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे हेरिटेज’, ‘ऑटो हँगर’, ‘वात्‍सल्‍य ट्र्‌स्‍ट’ यांच्‍या प्रतिनिधींचा प.पू. सरसंघचालकांच्‍या हस्‍ते गौरव करण्‍यात आला. कार्यक्रमात विनय खटावकर यांना पहिल्‍या ‘दिव्‍यांग मित्र’ पुरस्‍काराने गौरवण्‍यात आले.

दिव्‍यांग (अपंग) सैनिकांचा सन्‍मान 

भारतीय सैन्‍यात सेवा बजावलेले सैनिक ज्‍यांनी पॅराऑलिंपिक खेळात विशेष कामगिरी बजावली आहे. अशा सैनिकांचा सन्‍मान या वेळी करण्‍यात आला. यामध्‍ये विजयकुमार कारकी, चार सुवर्ण पदक विजेते ‘व्‍हिलचेअर बास्‍केट बॉल चॅम्‍पियन’ मीन बहाद्दूर थापा आणि एअरक्राफ्‍ट्‌समन मृदूल घोष यांचा प.पू. सरसंघचालकांनी सन्‍मान केला.

‘गिनिज बुक रेकॉर्ड’चा प्रयत्न !

दिव्‍यांगांना (अपंगांना) एका शिबिरात आतापर्यंत ७१० कृत्रिम पाय बसवण्‍याचा विश्‍वविक्रम आहे. तो मोडीत काढत १ सहस्र २०० दिव्‍यांगांना मॉड्युलर पाय बसवण्‍याचा विक्रम ‘भारत विकास परिषदे’च्‍या वतीने करण्‍यात येत आहे. त्‍यासाठी आवश्‍यक नोंदणी झाली असून मार्च २०२५ मध्‍ये १ सहस्र २०० कृत्रिम पाय बसवण्‍यात येणार आहे. त्‍यानंतर ‘गिनिज बूक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्ड’मध्‍ये नोंद होणार आहे.