लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात सक्षम कायदा करणार ! – नितेश राणे, मंत्री, महाराष्ट्र
नागपूर – ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांच्या विरोधात ५ वर्षांत सक्षम कायदा करणार आहोत. तसे आमच्या घोषणापत्रात नमूद केलेले आहे. यापूर्वी भाजपने ३७० कलम हटवणे, राममंदिर बांधणे आदी गोष्टी करण्याचे आश्वासन घोषणापत्राद्वारे दिले होते. ते पूर्ण करण्यात आले आहे. त्याप्रमाणे धर्मांतरविरोधी कायदाही केला जाईल. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (इ.व्ही.एम्.च्या) विरोधातील विरोधी पक्षांच्या आंदोलनाला काहीही महत्त्व नाही; कारण ‘व्होट जिहाद’ला विधानसभा निवडणुकीत हिंदु समाजाने दिलेल्या झटक्यामुळे विरोधी पक्षांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राविषयी संशय येऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ‘व्होट जिहाद’ करून विरोधी पक्षांनी महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण केले होते, त्याला उत्तर म्हणून हिंदु समाजाने विधानसभा निवडणुकीत विरोध पक्षांना झटका दिला आहे. विरोधी पक्षांनी हिंदु समाजाला नेहमी गृहीत धरले. त्यांना भगव्याचे महत्त्व लक्षात आले नाही. ते महत्त्व हिंदु समाजाने या निवडणुकीतून विरोधी पक्षांना दाखवून दिले. त्यांचा झालेला पराभव हा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे झालेला नसून हिंदु समाजाने दिलेली मोठी चपराक आहे, असे भाजपचे कणकवली मतदारसंघाचे आमदार आणि नवनियुक्त मंत्री नितेश राणे यांनी येथे सांगितले. मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नागपूर येथे अधिवेशनासाठी आलेले असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.