साधना जलद गतीने होण्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन
१. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यावर साधनेत जलद प्रगती होणे
अ. ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेविना साधनेतील अडथळे न्यून होत नाहीत.
आ. व्यष्टी साधना हा समष्टी साधनेचा पाया आहे. व्यष्टी साधनेविना समष्टी साधना व्यवस्थित होत नाही.
इ. स्वयंसूचना घेतल्या की, लगेच स्वभाव पालटला, असे होत नाही. काही महिने, वर्षे लागू शकतात. भावनाशीलता दूर होण्यास १० – १२ वर्षेसुद्धा लागू शकतात. ४० – ५० प्रसंगांवर सूचना घेतल्या की, दोष न्यून होतो.
ई. दुसर्या साधकांचे ऐकल्यावर मनोलय होतो आणि देवाशी एकरूप व्हायला साहाय्य होते.
उ. ६० टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यावरच मन मायेत अडकत नाही.
ऊ. आश्रमात राहून साधना, सत्सेवा आणि स्वभावदोषांचे निर्मूलन व्यवस्थित होते; म्हणून आश्रमात राहिल्यावर मनाची स्थिरता वाढून जलद प्रगती होते.
ए. शरणागतभाव वाढल्यावर गुरुकृपा होऊन अधिक आनंद अनुभवता येतो.
ऐ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करूनच साधक संत होतात.
२. सत्सेवा हे व्यष्टी आणि समष्टी साधना जलद होण्याचे साधन !
अ. सत्सेवा केल्यावर प्रगती लवकर होते.
आ. सत्सेवेत दायित्व स्वीकारले की, जलद प्रगती होते.
इ. सत्सेवा वाढली की, भावनाशीलता न्यून होते.
ई. ‘देवच सत्सेवा करून घेतो’, असा भाव ठेवला की, अहं वाढत नाही.
उ. साधक सत्सेवेला जातात. तेव्हा देव त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतो.
३. मायेतून अलिप्त झाल्यावरच साधनेला गती मिळते.
४. जे आई-वडील मुलांवर साधनेचे संस्कार करतात, तेच खरे आई-वडील !
५. ‘कुटुंबातील सदस्य सांगूनसुद्धा साधना करत नाहीत, तर ते त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे आहे’, असे समजावे.
६. साधकाकडून सकारात्मकता शिकायला मिळणे
एक साधक आश्रमात आले असतांना त्यांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली नाही. त्यामुळे त्यांना वाईट वाटले. नंतर त्यांच्या मनात विचार आला, ‘हा आश्रम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रतिमा आहे आणि आश्रमाचे दर्शन, म्हणजेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन !’ त्या वेळी मला साधकाचा सकारात्मक भाव लक्षात आला.
७. व्यष्टी साधना केली, तरच वाणीत चैतन्य येऊन समष्टी साधना व्यवस्थित होणे
एका साधकाने त्याची समस्या सांगितली, ‘माझी समष्टी साधना पुष्कळ होते; पण व्यष्टी साधना होत नाही. काय करू ?’ त्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘व्यष्टी साधना हा समष्टी साधनेचा पाया आहे. ती व्हायलाच पाहिजे, तरच वाणीत चैतन्य येऊन समष्टी साधना व्यवस्थित होईल.’’
– डॉ. रूपाली भाटकार (वय ५८ वर्षे), फोंडा, गोवा.