शेवगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथे दत्त जयंती उत्साहात साजरी !
दर्शनासाठी भाविक-भक्तांची अलोट गर्दी
शेवगाव (जिल्हा अहिल्यानगर) – सुप्रसिद्ध अष्टांग योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेवगावच्या वैशंपायननगर येथील दत्तभूमीत दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आकर्षक पाना-फुलांनी दत्तगुरूंचे मंदिर आणि मूर्ती सजवली होती. श्री दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी भाविक-भक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. रात्री विलंबापर्यंत गर्दीचा ओघ कायम होता. ‘दिगंबरा, दिगंबरा..’ च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
श्री दत्त मंदिरामध्ये गुरुचरित्र पारायण, ५१ श्री सत्यदत्त पूजा, तसेच दत्तगुरूंच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. साधकांच्या हस्ते श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीवर पंचसूक्त पवमान, तसेच प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या मूर्तीवर लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. कर्जत येथील बालाजी देवस्थानाचे ह.भ.प. दयानंद महाराज कोरेगावकर यांचे श्री दत्त जन्माविषयी कीर्तन झाले.
योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे चिरंजीव पू. शरद वैशंपायन, सून सौ. ललिता वैशंपायन, साधक श्री. रवींद्र पुसाळकर, सौ. वृषाली पुसाळकर, श्री. मोहनीराज चिटणीस, सौ. सुचित्रा चिटणीस, सनातनचे साधक श्री. अतुल पवार इत्यादी या वेळी उपस्थित होते. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी ‘गुरुदत्त सामाजिक संस्थे’चे अध्यक्ष श्री. अर्जुन फडके, सचिव श्री. फुलचंद रोकडे यांच्या नेतृत्वाखाली तेथील साधक वर्गाने पुष्कळ परिश्रम घेतले.