संपादकीय : तालतपस्वी अनंतात विलीन !
उस्ताद झाकीर हुसेन यांच्या जाण्याने भारतीय संगीतात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून न येणारी आहे. त्यांनी तबलावादनावर जे प्रभुत्व प्राप्त केले, ते पहाता ‘उस्ताद’ ही पदवी त्यांच्यासाठी काहीच नाही. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणी कला सादर केली आणि १२ व्या वर्षी तबलावादनासाठी ते दौर्यावर जाऊ लागले. यावरून त्यांच्यात उपजत असलेल्या देणगीची आपल्याला जाणीव होईल. कलेची उपजत देणगी असणे आणि स्वतःची साधना अन् तपश्चर्या यांद्वारे त्या कलेला दैवी स्पर्श आणणे, असे करणारे कलाकार पुष्कळ दुर्मिळ आहेत. त्यांतीलच एक उस्ताद झाकीर हुसेन होय ! त्यांच्या वादनात एक प्रकारची अवीट गोडी होती; मात्र त्याही पुढे जाऊन श्रोत्यांना स्वरांच्याही पलीकडे नेऊन दैवी नादाची अनुभूती देण्याचे सामर्थ्य त्यात होते. त्यांच्या तबल्यातून निघणारा डमरूचा स्वर ऐकतांना श्रोत्यांना ध्यानस्थ शिव कैलासावर विराजमान असतांना जसे वातावरण असते, तशा वातावरणाची अनुभूती येत असे. संगीत हे ईश्वराशी जोडणारे, त्याच्याशी एकरूप करणारे हवे. झाकीरभाई यांच्या तबलावादनाने श्रोते ही अनुभूती घेत. हे शक्य झाले त्यांनी घेतलेले अथक परिश्रम आणि संगीत साधना यांमुळे !
घराघरांत तबला पोचवणारे झाकीरभाई !
तबला हे चर्मवाद्य ! अन्य वाद्यांपेक्षा ते शिकणे, जरा कठीणच; मात्र झाकीरभाईंनी त्याला लोकाभिमुखता प्राप्त करून दिली. झाकीरभाईंच्या आधीही मोठमोठे तबलावादक होऊन गेले; मात्र बहुतांश जणांचे तबलावादन हे एका पठडीतले होते. ज्यांना संगीताची माहिती आहे किंवा जे या क्षेत्रातील तज्ञ आहेत, तेच त्याचा आस्वाद घेऊ शकत होते. झाकीरभाईंनी मात्र श्रोत्यांसमोर कधीही चौकटीबद्ध वादन केले नाही. सर्वसामान्य माणसाला, तसेच ज्याला संगीत किंवा वाद्य यांविषयी काहीही कळत नाही, त्यांनाही तबलावादनातून निर्भेळ आनंद कसा देता येईल ? या दृष्टीने समोरच्याची नस पकडून ते तबला वाजवत. याच कारणामुळे घंटोन्घंटे चालणार्या त्यांच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित श्रोत्यांना त्यांचे तबलावादन ऐकून कधी कंटाळा आला नाही. त्यांचे तबलावादन हे सहजसुंदर आणि उत्स्फूर्त असे. यातून झाकीरभाई आणि श्रोते यांच्यामध्ये स्वरांचा एक बंध निर्माण होत असे. श्रोत्यांसाठी खर्या अर्थाने ती मर्मबंधातली एक ठेवच होती. याचा परिणाम असा झाला की, तबला घराघरांत पोचला. त्यांच्या वादनातून प्रेरणा घेऊन तबला शिकणार्यांच्या संख्येत वाढ झाली. केवळ भारतीयच नव्हे, तर विदेशांतही त्यांच्या तबलावादनाची लोकांवर भुरळ पडली. भारतीय संगीत सातासमुद्रापार नेणार्या कलावंतांमध्ये झाकीरभाई यांचा सिंहाचा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही.
…अन् तबला बोलका झाला !
एखादे वाद्य बोलके करणे, यात त्या वादकाचा खरा कस असतो. कुणालाही झाकीरभाईंचे एका शब्दात वैशिष्ट्य सांगायला सांगितल्यास ‘त्यांनी तबला बोलका केला’, असेच ऐकायला मिळते. तबल्यासारख्या चर्मवाद्यामध्ये किमान प्रावीण्य मिळवायला एक तप तरी जावे लागते. त्यातही तबला आणि डग्गा सुरात लावणे, हे भल्या भल्या तबलजींनाही जमत नाही. झाकीरभाईंचे वैशिष्ट्य म्हणजे तबला आणि डग्गा यांतून ते स्वर काढत असत. मोठमोठ्या कार्यक्रमात ते डमरू, शंखनाद, घोड्यांच्या टापांचा आवाज काढत असत. त्यांनी तबल्यावर हात जरी मारला, तर त्यातून निघणारा स्वर हा श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेत असे. चर्मासारख्या कडक आणि टणक गोष्टींपासून बनवलेल्या वाद्यातून स्वर काढणे, हे मोठे दिव्य आहे. ते झाकीरभाईंनी लिलया पार पाडले. ही त्यांनी कठोर साधनेतून मिळवलेली दैवी सिद्धी होय ! त्यांचे वादन हे समोरच्याला मोहून टाकायचे. विविध ताल वाजवून ते समेवर आणतांना कसलेल्या तबलजींचीही दमछाक होते. झाकीरभाई मात्र तबल्यातील अत्यंत क्लिष्ट तालही सहजतेने वाजवून समेवर येत असत. तबलजींच्या भाषेत सांगायचे, तर झाकीरभाईंनी तबल्याशी कधी ‘कुस्ती’ केली नाही. त्यांच्या तबलावादनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे वादन उत्तरोत्तर फुलत जात असे. त्यातून वातावरण निर्माण होऊन त्या स्वरांमध्ये श्रोते मनसोक्त भिजत असत.
व्रतस्थ साधक !
‘तबलावादनातून स्वतः आनंद घ्यायचा आणि इतरांनाही तो भरभरून द्यायचा’, हे सूत्र झाकीर हुसेन यांनी पहिल्यापासून पाळले. ते स्वतः सरस्वतीचे उपासक असल्याचे सांगत असत. झाकीरभाईंच्या घराण्यात मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या कानात प्रार्थना म्हणण्याची परंपरा आहे. झाकीरभाई जन्माला आल्यानंतर त्यांचे वडील उस्ताद अल्लारखॉँ यांनी झाकीर यांच्या कानात तबल्याचे काही ताल म्हटले होते. याविषयी विचारल्यावर ‘संगीत ही माझी आध्यात्मिक साधना आहे आणि ताल माझ्या मुलासाठी माझी प्रार्थना आहे’, असे त्यांनी सांगितले. वडिलांनी दिलेल्या या शिकवणीचे झाकीरभाईंनीही व्रतस्थ साधकाप्रमाणे पालन केले. झाकीरभाईंनी संगीतक्षेत्रातील अनेक यशोशिखरे पादाक्रांत करूनही शेवटपर्यंत ते शिकण्याच्या भूमिकेत राहिले. वादन करतांना काही शंका आल्यास ते कोणतीही प्रतिमा न बाळगता इतरांना सहजतेने विचारत असत. यातून त्यांची अहंशून्यता दिसून येते. झाकीरभाईंनी तबलावादनाला आरंभ केल्यावर ते उत्तररात्री ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत रियाज करत असत. कठोर परिश्रम घेऊन त्यांनी तबलावादनात उत्तरोत्तर प्रगती केली आणि यशाची अनेक शिखरे गाठली. तबलावादनात त्यांचे काही शिकायचे राहून गेले, असे काही उरले नव्हते. तरीही ते शेवटपर्यंत विद्यार्थी राहिले. हल्ली बरेच कलाकार संगीतात एक ठराविक उंची गाठल्यावर रियाजाला (सरावाला) अल्प वेळ देतात. त्याचा परिणाम त्यांच्या कलेवर होतो. झाकीरभाईंसाठी तबला हेच त्यांचे जीवन होते, तो त्यांचा श्वास होता. कलाकार त्याच्या कलेशी तादात्म्य पावतो, म्हणजे नेमके काय असते ? हे झाकीरभाईंकडून शिकायला मिळते. ते तहान-भूक विसरून तबला वाजवत. ते तबला वाजवायला बसले की, त्यांना वेळेचेही भान रहायचे नाही. तबला हीच त्यांच्यासाठी विश्रांती होती. कुठल्याही कार्यक्रमात ते तबला आणि डग्गा यांना नमन करून त्यांच्या कार्यक्रमाला आरंभ करत. ‘संगीत साधना हा ईश्वराकडे नेणारा मार्ग आहे’, याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. त्यामुळे तबलावादन ही त्यांच्यासाठी संगीत साधनाच होती. आपल्याकडे जे आहे, ते इतरांनाही भरभरून देण्यासाठी झाकीरभाई शेवटपर्यंत झटले.
संगीतासाठी स्वतःचे आयुष्य वेचून व्रतस्थ साधना करणारे झाकीरभाई यांच्यासारखे तबलावादक युगातून एकदाच जन्माला येतात. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन संगीतक्षेत्रात असे शेकडो व्रतस्थ साधक निर्माण झाले, तर तीच उस्ताद झाकीर हुसेन यांना खरी श्रद्धांजली असेल !
संगीतक्षेत्रात उस्ताद झाकीर हुसेन यांच्याप्रमाणे व्रतस्थ साधक निर्माण झाल्यास भारतीय संगीताचा नक्कीच उत्कर्ष होईल ! |