कुणी सत्य बोलले, तर तो गुन्हा आहे का ? – उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांचे नाव न घेता समर्थन
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एक गोष्ट सांगितली. ‘समान नागरी कायदा असायला हवा आणि जगात बहुसंख्य समाजाच्या भावनांचा प्रत्येक परिस्थितीत आदर केला जातो’, असे ते म्हणाले होते. जगात असे घडते, जर कुणी ते सत्य बोलले, तर तो गुन्हा आहे का ? या लोकांनी (विरोधकांनी) न्यायमूर्तींच्या विरोधात महाभियोगाची (महाभियोग म्हणजे कोणत्याही पदावर असलेल्या व्यक्तीला त्या पदावरील सर्व अधिकार आणि दायित्व काढून टाकण्याची प्रक्रिया) नोटीसही दिली आहे. विरोधकांना राज्यघटनेचा गळा दाबून देश चालवायचा आहे, अशा शब्दांत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांचे नाव न घेता समर्थन केले. न्यायमूर्ती यादव यांनी काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयातील सभागृहात विश्व हिंदु परिषदेच्या कार्यक्रमात ‘देश बहुसंख्यांकांच्या विचारांनुसार चालणार’ असे विधान केले होते. त्यावरून विरोधी पक्षांनी महाभियोग चालवण्याची मागणी संसदेत केली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, हे लोक स्वत:ला लोकशाहीवादी म्हणवतात; मात्र त्याच्या विरोधात वागतात. त्यांना याची अजिबात लाज वाटत नाही.