महर्षींच्‍या आज्ञेने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी दीप प्रज्‍वलित करून हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी शिवाला केली प्रार्थना !

तिरूवण्‍णामलई (तमिळनाडू) येथे साजरा करण्‍यात आला कार्तिक दीपोत्‍सव !

अरुणाचलेश्‍वर मंदिराचा मनोहारी परिसर

तिरुवण्‍णामलई (तमिळनाडू) – १३ डिसेंबर २०२४ या दिवशी सायंकाळी ६ वाजता येथील अरुणाचलेश्‍वर पर्वतावर कार्तिक दीप लावण्‍यात आला. प्रतिवर्षी तिरुवण्‍णामलई येथील अरुणाचलेश्‍वर शिव मंदिरात आणि तेथील अरुणाचल पर्वतावर सुंदर असा एक मोठा दीप प्रज्‍वलित केला जातो अन् त्‍यानंतर कार्तिक दीपोत्‍सव साजरा केला जातो. महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्‍या माध्‍यमातून सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या एक आध्‍यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना ‘कार्तिक दीपम्’च्‍या दिवशी तमिळनाडू येथील तिरूवण्‍णामलई येथे अरुणाचलेश्‍वर पर्वताजवळ रहावे, तसेच कार्तिक दीपम्‌च्‍या दिवशी अरुणाचल पर्वतावर संध्‍याकाळी तुपाचा दिवा लावल्‍यावर गावातील सर्व भक्‍तगण त्‍यांच्‍या घरावर दिवे लावून अरुणाचलेश्‍वर पर्वताला प्रार्थना करतात, त्‍याचप्रमाणे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या आरोग्‍यासाठी अन् हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी दिवा लावून भगवान शिवाला प्रार्थना करावी’, असे सांगितले होते. त्‍याप्रमाणे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तुपाचा दिवा लावून भगवान शिवाला ‘हे शिवशंकरा, आम्‍हाला दैदीप्‍यमान हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी बळ दे आणि या दिव्‍याप्रमाणे तेज प्रदान कर, तसेच सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दीर्घायुष्‍य अन् आरोग्‍य लाभू दे’, अशी प्रार्थना केली. या वेळी तिरुवण्‍णामलई येथील उद्योजक श्री. मुत्तू कुमार आणि श्री. जगन यांचीही उपस्‍थिती होती.

तिरुवण्‍णामलई (तमिळनाडू) येथे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस भावपूर्ण वातावरणात साजरा !

अरुणाचलेश्‍वर मंदिराच्या बाहेर उभ्या असलेल्या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

तिरुवण्‍णामलई (तमिळनाडू) – सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या एक आध्‍यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस १४ डिसेंबर या दिवशी, म्‍हणजेच दत्तजयंतीच्‍या दिवशी तिरुवण्‍णामलई येथे भावपूर्ण वातावरणात साजरा करण्‍यात आला. सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्‍यांच्‍या समवेत असणारे साधक तिरुवण्‍णामलई येथील कार्तिक दीपम् उत्‍सवासाठी गेले होते. १४ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजता श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांच्‍या समवेत दौर्‍यावर असणारे साधक सर्वश्री स्नेहल राऊत, विनीत देसाई आणि विनायक शानभाग यांनी त्‍यांचे औक्षण केले अन् त्‍यानंतर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पाठवलेली भेटवस्‍तू दिली.

काय म्‍हणाले सप्‍तर्षी ?

सप्‍तर्षींनी आधीच सांगितले होते, ‘या वर्षी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्‍यांच्‍या वाढदिवसाला तिरुवण्‍णामलई येथे असावे आणि त्‍या दिवशी अरुणाचलेश्‍वर शिवाच्‍या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन यावे.’ सप्‍तर्षींच्‍या आज्ञेप्रमाणे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १४ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता अरुणाचलेश्‍वर शिवाच्‍या मंदिरात गेल्‍या. आदल्‍या दिवशी कार्तिक दीपम् उत्‍सव झालेला असल्‍याने मंदिराच्‍या बाहेर दर्शनाला सहस्रो लोकांची गर्दी होती. जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍यासाठी मंदिरात दर्शनाची विशेष सोय केली होती. महर्षींच्‍या कृपेमुळे शिवाच्‍या अग्‍नितत्त्वाशी संबंधित शिवलिंगाचे सुंदर दर्शन झाले.

कार्तिक दीपम्‌च्‍या वेळी तुपाचा दिवा प्रज्‍वलित करतांना श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

वैशिष्‍ट्यपूर्ण

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ या अरुणाचलेश्‍वर मंदिरात प्रवेश करत असतांना आणि तेथून बाहेर येत असतांना काही पोपट आवाज करत उडाले. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ सध्‍या कांचीपूरम् येथे निवास करतात. पोपटाला कांचीच्‍या श्री कामाक्षीदेवीचे संदेशवाहक मानले जाते. दर्शनाला जातांना आणि दर्शन पूर्ण झाल्‍यावर पोपटांचा थवा दिसणे, त्‍यांचा आवाज ऐकू येणे या माध्‍यमातून अरुणाचलेश्‍वर शिवाच्‍या दर्शनाला देवी कामाक्षीने आशीर्वाद दिल्‍याचे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांना जाणवले.

१. कसा केला जातो ‘कार्तिक दीपम्’ ?

जो मोठा दीप लावला जातो, त्‍यास जवळजवळ साडेतीन सहस्र किलोंहून अधिक तूप आणि १ सहस्र मीटर कापड वातीसाठी वापरले जाते. त्‍याआधी पहाटे ४ वाजता अरुणाचलेश्‍वर मंदिरात कार्तिक दीप प्रज्‍वलित केला जातो आणि नंतर तोच दीप पुजारी अन् गावकरी एकत्रितपणे पर्वतावर घेऊन जातात. सायंकाळी ठीक ६ वाजता ‘कार्तिक दीपम्’ लावला जातो. या दीपोत्‍सवाचे थेट प्रसारण दूरचित्रवाहिन्‍यांद्वारे केले जाते. ते प्रसारण जगभरातील १४ कोटी तमिळ भाषा बोलणारे हिंदू ‘कार्तिक दीपम्’चा उत्‍सव पहातात आणि प्रत्‍येक जण ‘कार्तिक दीपम्’ लावून एक प्रकारे या उत्‍सवात सहभागी होतात.

‘कार्तिक दीपम्’

२. अरुणाचल पर्वत म्‍हणजेच ‘लिंगोद़्‍भव’ शिवाचे प्रत्‍यक्ष रूप !

तिरुवण्‍णामलईमध्‍ये अरुणाचल, म्‍हणजेच अण्‍णामलई पर्वत आहे, ज्‍याला ‘लिंगोद़्‍भव’ शिवाचे प्रत्‍यक्ष रूप समजले जाते, तसेच हे अग्‍निक्षेत्र म्‍हणूनही प्रसिद्ध आहे. येथे ‘अरुणाचलेश्‍वर’ किंवा ‘अण्‍णामलैयार’ म्‍हणून भगवान शिवाची आणि त्‍यांची पत्नी पार्वतीची ‘उन्‍नामलाई अम्‍मन’ म्‍हणून पूजा केली जाते. येथे दीपप्रज्‍वलनाला फार महत्त्व आहे. ‘कैलास यात्रा करून मोक्ष मिळतो; पण अण्‍णामलाईचे स्‍मरण करून मुक्‍ती मिळते’, असे म्‍हणतात.

३. अरुणाचल पर्वताविषयीची कथा

हिंदु पौराणिक कथेनुसार एकदा माता पार्वतीने कैलास पर्वतावर भगवान शंकराचे डोळे बंद केले होते. त्‍यामुळे ब्रह्मांडात अंधार पसरला होता. भगवान शिव अरुणाचल पर्वताच्‍या शिखरावर अग्‍निस्‍तंभाच्‍या रूपात प्रकट झाले आणि त्‍यांनी पुन्‍हा प्रकाश प्रदान केला, तसेच पार्वतीसह अर्धनारीश्‍वराचे रूप धारण केले. दुसर्‍या एका आख्‍यायिकेनुसार ब्रह्मदेव आणि विष्‍णु यांच्‍यात श्रेष्‍ठत्‍वावरून वाद झाला. तेव्‍हा भगवान शिव अग्‍निस्‍तंभाच्‍या रूपात प्रकट झाले आणि त्‍या दोघांना अग्‍निस्‍तंभाचा उगम शोधण्‍याचे आव्‍हान दिले. ब्रह्मदेवाने हंसाचे रूप धारण करून अग्‍निस्‍तंभाच्‍या शिखरावर जाण्‍याचा प्रयत्न केला, तर भगवान विष्‍णु वराहाचे रूप घेऊन त्‍याचा तळ शोधण्‍यासाठी गेले. याला ‘लिंगोद़्‍भव’ असे म्‍हटले जाते. हे दृश्‍य शिवमंदिरांच्‍या गर्भगृहाच्‍या पश्‍चिमेकडील भिंतीवर चित्रित केले आहे. ब्रह्मदेव आणि विष्‍णु दोघांनाही या स्‍तंभाचा उगम मिळू शकला नाही.

त्‍यानंतर विष्‍णूने ते अयशस्‍वी झाल्‍याचे मान्‍य केले; परंतु ब्रह्मदेवाने खोटेच सांगितले की, त्‍याने स्‍तंभाचा वरचा भाग पाहिला आहे. या असत्‍यामुळे भगवान शिवाने ब्रह्मदेवाचे ५ वे मस्‍तक कापले. हा अग्‍निस्‍तंभ अत्‍यंत तेजस्‍वी होता. त्‍यामुळे भगवान शिवाने अरुणाचल पर्वताचे रूप धारण केले आणि म्‍हणाले, ‘जसा चंद्र सूर्यापासून प्रकाश घेतो, त्‍याचप्रमाणे इतर तीर्थक्षेत्रांनाही अरुणाचलापासून त्‍यांचे पावित्र्य प्राप्‍त होईल. हे स्‍थान सर्वांत पवित्र आहे. मी प्रतिवर्षी कार्तिक मासात या पर्वताच्‍या शिखरावर शांती आणि प्रकाशरूपी दीपाच्‍या रूपात प्रकट होत राहीन.’

कार्तिक दीपम् | तिरुवन्नामलई अरुणाचल पर्वत की दिव्य यात्रा | Arunachala Karthigai Deepam

सौजन्य : सनातन संस्था 

४. अप्रतिम आणि मनोहारी अरुणाचलेश्‍वर शिव मंदिर

९ व्‍या शतकात चोल राजाने बांधलेल्‍या या अग्‍निक्षेत्रात अरुणाचलेश्‍वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. पूर्वी हा परिसर पल्लवांच्‍या अधिपत्‍याखाली होता. भगवान शिवाच्‍या पंचमहाभूत मंदिरांपैकी एक असलेल्‍या अग्‍निक्षेत्राच्‍या या मंदिरात शिवलिंगामध्‍ये तेजरूपी अग्‍नीची शक्‍ती आहे. ज्‍या दिवशी अण्‍णामलई पर्वतावर कार्तिक दीप प्रज्‍वलित केला जातो, त्‍या दिवशी शिव त्‍याच्‍या रूपात दिव्‍य तेजाची मशाल धारण करतो आणि ही ज्‍योती सनातन धर्माच्‍या कार्याला ऊर्जा अन् शक्‍ती प्रदान करते.

रात्रीच्‍या वेळी या पर्वतावरून अरुणाचलेश्‍वर मंदिराचे अप्रतिम आणि मनोहारी दृश्‍य पहाता येते. अरुणाचलच्‍या पायथ्‍याशी पूर्वाभिमुख अरुणाचलेश्‍वर मंदिर २५ एकरात पसरलेले आहे. मंदिराला ४ गोपुरम् (प्रवेशद्वार) आहेत. त्‍यातील सर्वांत उंच पूर्वेकडील राजगोपूरम् आहे. त्‍याचे बांधकाम राजा कृष्‍णदेवरायाने चालू केले आणि १६ व्‍या शतकात सेवाप्‍पा नायकाने पूर्ण केले. मंदिरात ५ परिक्रमा क्षेत्र आहेत. त्‍या प्रत्‍येकामध्‍ये नंदीची विशाल मूर्ती आहे.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक