रिंगरोडसाठी भूमीमालकांनी १५ डिसेंबरपर्यंत स्वेच्छेने भूमी दिल्यास बाजारभावाच्या ५ पट मोबदला !

पुणे – रिंगरोडसाठी (बाह्य वळण रस्त्यासाठी) आवश्यक २०६ हेक्टर क्षेत्राचे संपादन अद्याप शेष आहे. त्यासाठी आणि यापूर्वीच्या निवाड्याचा मोबदला देण्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. ती पूर्ण करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य रस्ते विकास महामंडळाकडे केली आहे. या संपादनात १५ डिसेंबरपूर्वी स्वेच्छेने भूमी देणार्‍यांना पाचपट मोबदला देण्यात येणार असून अशा भूमीमालकांनी भूसंपादन अधिकार्‍यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. १५ डिसेंबरनंतर केल्या जाणार्‍या सक्तीच्या भूसंपादनापोटी चौपट मोबदला दिला जाईल, असेही स्पष्ट केले आहे. संपादनाविषयी संबंधित तालुक्याच्या भूसंपादन अधिकार्‍यांना बैठकीत सूचना देण्यात आल्या आहेत.

या रिंगरोडसाठी १ सहस्र ७४० हेक्टर भूमीची आवश्यकता आहे. त्यापैकी अनुमाने १७० हेक्टर सरकारी भूमी आहे, तर पूर्व भागातील ४७ गावांमधून ८५८.९६ हेक्टर, तर पश्चिम भागातील ३६ गावांतील ६४४.११ हेक्टर असे १५०३.०७ हेक्टर भूमीचे संपादन करण्याचे उद्दिष्ट आहे.

त्यातील अनुमाने १ सहस्र ३०० हेक्टर क्षेत्र संपादित झाले आहे, तर पूर्व भागातील १४३ आणि पश्चिम भागातील ६३ हेक्टर म्हणजेच २०६ हेक्टर क्षेत्राचे संपादन शिल्लक आहे.