भक्‍तीयोग जाणून घेतांना…

‘ब्रह्मज्ञान जाणून घेण्‍यास अत्‍यंत कठीण आहे. त्‍यासाठी विशिष्‍ट प्रकारची मानसिक, बौद्धिक क्षमता असावी लागते. सर्वसामान्‍य लोकांना ब्रह्मज्ञान सहजासहजी जाणून घेता येत नाही’, हे लक्षात घेऊन गीतेने ‘भक्‍तीयोगा’चे माहात्‍म्‍य सांगून सर्वसामान्‍य मानवी समाजाला मोठा दिलासा दिला आहे. ईश्‍वरप्राप्‍ती करण्‍यासाठी भक्‍तीमार्ग अत्‍यंत सुलभ आहे. भगवान श्रीकृष्‍ण भगवद़्‍गीतेच्‍या ‘विभूतीयोग’ या १० व्‍या अध्‍यायात सांगतात…‘यज्ञानां जपयज्ञोऽस्‍मि’, म्‍हणजे ‘सर्व प्रकारच्‍या यज्ञांमध्‍ये जपयज्ञ मी आहे.’  ज्ञानाचा विचार केला, तर ज्ञानप्राप्‍तीसाठी बुद्धीवर अवलंबून रहावे लागणार आहे. सामान्‍य माणसांना तेजस्‍वी बुद्धी लाभलेली असतेच, असे नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍यासाठी ज्ञानमार्ग हा खडतर आणि अशक्‍य ठरतो.

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘कर्मयोग आणि भक्‍तीयोग यांतील भेद, भक्‍तीमार्गाविषयी आद्यशंकराचार्य आणि लोकमान्‍य टिळक यांचे उद़्‍गार, जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज आणि लोकमान्‍य टिळक यांच्‍या दृष्‍टीने भक्‍तीभाव, समर्थ रामदासस्‍वामी यांना भक्‍तीभावामुळे विठ्ठलात रामाचे दर्शन होणे अन् ‘गीता धर्मा’चा सिद्धांत’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/863006.html

१०. मोक्ष किंवा मुक्‍ती प्राप्‍त करवून घेण्‍यासाठी स्‍वतःच प्रयत्न करणे आवश्‍यक !

भक्‍तीयोग जाणून घेतांना एक गोष्‍ट इथे निश्‍चितपणे जाणून घेणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. गुरु आणि भगवंत दोघेही श्रेष्‍ठ आहेत, यात वाद नाही; पण या दोघांपैकी कुणीही आपल्‍या शिष्‍याला किंवा भक्‍ताला मुक्‍ती, मोक्ष देऊ शकत नाहीत, हे पक्‍के लक्षात घेतले पाहिजे. मुक्‍ती कशी प्राप्‍त करायची, याचे मार्गदर्शन दोघेही करू शकतात, त्‍यासाठी साहाय्‍य करू शकतात; पण ते मोक्ष देऊ शकत नाहीत.

गीतेत भगवान श्रीकृष्‍ण सांगतात…

‘उद्धरेदात्‍मनात्‍मानं नात्‍मानमवसादयेत् ।
आत्‍मैव ह्यात्‍मनो बन्‍धुरात्‍मैव रिपुरात्‍मनः ॥

– श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय ६, श्‍लोक ५

अर्थ : स्‍वतःच स्‍वतःचा संसारसमुद्रातून उद्धार करून घ्‍यावा आणि स्‍वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये; कारण हा मनुष्‍य स्‍वतःच स्‍वतःचा मित्र आहे आणि स्‍वतःच स्‍वतःचा शत्रू आहे.’

याचा अर्थ प्रत्‍येक चांगल्‍या गोष्‍टी प्राप्‍त करण्‍यासाठी आपल्‍या स्‍वतःलाच प्रयत्न करावे लागणार आहेत. मुक्‍ती प्राप्‍त करण्‍यासाठी गुरु मार्गदर्शन करतील; पण मुक्‍ती देऊ शकत नाहीत.

आद्यशंकराचार्य ‘विवेक चुडामणी’मध्‍ये सांगतात, ‘पिता मुलाने घेतलेले कर्ज फेडून मुलाची कर्जातून सुटका करू शकतो; पण संसाराच्‍या बंधनातून पिता मुलाची सुटका करू शकणार नाही. मुलालाच स्‍वतःला स्‍वतःची सुटका करून घ्‍यावी लागेल.’

एखाद्याच्‍या मस्‍तकावर असलेले ओझे हलके करण्‍यासाठी दुसरा कुणीतरी त्‍याचे ओझे स्‍वतःच्‍या डोक्‍यावर ठेवून त्‍याचा भार हलका करील; पण भुकेचे दुःख कुणीही कमी करू शकत नाही. मुलगा जेवला म्‍हणून पित्‍याचे पोट भरत नाही किंवा पत्नी जेवली म्‍हणून पतीचे पोट भरत नाही. स्‍वतःचे पोट भरण्‍यासाठी स्‍वतःलाच जेवावे लागते. धनवानाची पत्नी आजारी पडली आहे. तिला कडू औषध खावे लागू नये; म्‍हणून त्‍या धनवानाने त्‍याची पत्नी बरी व्‍हावी, यासाठी तिचे ते कडू औषध पिण्‍यासाठी एखाद्या व्‍यक्‍तीची नियुक्‍ती केली. म्‍हणून त्‍या व्‍यक्‍तीने औषध घेतले, तरीही त्‍या धनवानाच्‍या पत्नीचे स्‍वास्‍थ्‍य सुधारणार नाही.

जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज याविषयी सांगतात,

श्री. दुर्गेश परुळकर

‘नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे । आणूनि निराळे द्यावे हाती ॥
इंद्रियांचा जय साधूनिया मन । निर्विषय कारण असे तेथे ॥

उपास पारणी अक्षरांची आटी । सत्‍कर्मा शेवटी असे फळ ॥
आदरे संकल्‍प वारी अतिशय । सहज ते काय दुःख जाण ॥

स्‍वप्‍नीच्‍या धाये विवळसी वाया । रडे रडतियासवे मिथ्‍या ॥
तुका म्‍हणे फळ आहे मुळापाशी । शरण देवासी जाय वेगी ॥’

भावार्थ : मोक्षाचे गाठोडे भगवंत आपल्‍याला आणून देत नाही. त्‍यासाठी आपल्‍यालाच प्रयत्न करावे लागतात. आपल्‍याला आपल्‍या इंद्रियांवर विजय मिळवायचा आहे. मनावर नियंत्रण ठेवून मनातील सर्व वासना काढायच्‍या आहेत, म्‍हणजेच मन निर्विषय करायचे आहे. तहान, भूक यांसारख्‍या गोष्‍टींना बाजूला सारून एकाग्रतेने अखंडपणे साधना करावी लागणार आहे. हे संपूर्ण जग मिथ्‍या असून अशा जगासाठी रडत बसणे योग्‍य नाही. सत्‍कर्मावाचून अन्‍य कोणत्‍याही गोष्‍टीचा विचार करायचा नाही. प्रयत्नांची पराकाष्‍ठा करून मोक्ष प्राप्‍त करायचा आहे. बसल्‍या जागी कुणीही आपल्‍याला मोक्ष देणार नाही.

११. ईश्‍वराला अनन्‍य भावाने शरण जाणे, हा तरणोपाय !

थोडक्‍यात भक्‍तीमार्ग कितीही सोपा वाटला, तरी तो साधा, सरळ आणि सोपा नाही. त्‍यासाठी भक्‍ताला परिश्रम करावे लागतातच. ज्ञानी मार्गावरून वाटचाल करणारा भगवंताचा भक्‍त बुद्धीच्‍या द्वारे ज्ञान प्राप्‍त करतो, योग मार्गावरून वाटचाल करणारा भगवंताचा भक्‍त योगसाधनेद्वारे ज्ञानप्राप्‍त करतो. कर्ममार्गावरून वाटचाल करणारा भगवंताचा भक्‍त कर्मफळाचा त्‍याग करून ज्ञानप्राप्‍त करतो, तर भक्‍ती मार्गावरून वाटचाल करणारा भक्‍त श्रद्धेद्वारे ज्ञान संपादन करतो; म्‍हणून गीतेत भगवंताने ‘ज्ञानासारखी या भूतलावर अन्‍य कोणतीही गोष्‍ट पवित्र नाही’, असे सांगितले आहे, तसेच ‘ज्ञान संपादन केल्‍यानंतर कर्म फळाचा नाश होतो’, असेही म्‍हटले आहे.

ज्ञान, भक्‍ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम मानवी जीवनात झाला की, मानवी जीवन यशस्‍वी होते; पण त्‍यासाठी ईश्‍वराला अनन्‍य भावाने शरण गेल्‍यावाचून अन्‍य कोणताही उपाय नाही. (समाप्‍त)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ लेखक आणि व्‍याख्‍याते, डोंबिवली. (९.१२.२०२४)