राजकीय गुंडांना आश्रय देणार्या सरकारच्या चहापानाला जाण्यात अर्थ नाही ! – विजय वडेट्टीवार, नेते, काँग्रेस
विरोधकांचा चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार !
नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात कायदा-सुव्यवस्था पूर्णत: उद्ध्वस्त झालेली आहे. एका सरपंचांना उचलून नेऊन त्यांचा खून केला जातो. त्या प्रकरणात राजकीय आरोपी आहेत. सरपंचांचा खून करणार्यांना पाठबळ असणार्या नेत्याला मंत्रीपदाची शपथ दिली जाणार असल्याची चर्चा आहे. राजकीय गुंडांना आश्रय देणारे सरकार असेल, तर चहापानाला जाण्यात काय अर्थ आहे ?, असे सांगून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘सत्ताधार्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घातला आहे’, असे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
नागपूर येथे १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवशन चालू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे १५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी सत्ताधार्यांकडून चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांची नागपूर येथे बैठक पार पडली. या बैठकीत सत्ताधार्यांच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
विजय वडेट्टीवार सत्ताधार्यांवर टीका करतांना म्हणाले की, महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे. शेतकरी प्रतिदिन आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्रातील बेरोजगारांना रस्त्यावर फिरण्याची वेळ आली आहे. उद्योगधंदे बाहेर गेले आहेत. राज्यात गुंतवणूक येत नाही. गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्राविषयी अनास्था निर्माण झाली आहे. असे असतांना दुसरीकडे पाठ थोपटण्याचे काम चालू झाले आहे. सरकारने आश्वासनांची पूर्तता करावी.