बांगलादेश संकट : चीनच्‍या अदृश्‍य हाताचा प्रभाव !

अलीकडच्‍या काळात इस्‍लामी जिहादी कारवायांमध्‍ये चीनचा सहभाग वाढला आहे. या पालटामुळे चीन केवळ राज्‍य करणार्‍या घटकांशी संवाद साधण्‍याऐवजी विदेशातील आतंकवादी गटांना आश्रय देण्‍याकडे वळला आहे. या धोरणात्‍मक पावलाचे भारतावर व्‍यापक परिणाम होत आहेत. बांगलादेशाच्‍या तत्‍कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्‍या त्‍यागपत्राच्‍या एक मास आधी त्‍यांचे चीनशी असलेले संबंध बिघडत होते. परिणामी हसीना यांचे चीनमध्‍ये थंड स्‍वागत झाले आणि त्‍यामुळे त्‍यांचा दौरा थोडक्‍यात झाला, हे त्‍या वेळी प्रसिद्ध झालेल्‍या विविध वृत्तांवरून लक्षात येते. यावरून चीनकडे हसीना यांच्‍या विरोधात येणार्‍या सत्तापालटाची गुप्‍त माहिती होती आणि त्‍याचा थेट कट रचण्‍यात त्‍याचा सहभाग होता, असे सूचित होऊ शकते. याविषयीचा ऊहापोह या लेखात करत आहोत.

प्रतीकात्मक चित्र

१. बांगलादेशातील राजकीय उलथापालथ आणि त्‍यात लष्‍कराचा सहभाग

बांगलादेशातील अराजकतेच्‍या घटनेनंतर शेख हसीना ढाका सोडून भारतात पळून गेल्‍या; कारण जमावाने त्‍यांच्‍या घरात प्रवेश करण्‍यासाठी सुरक्षेचा भंग केला होता. त्‍यानंतर बांगलादेशाच्‍या लष्‍कराने अंतरिम सरकारची घोषणा केली. तेथील लष्‍करप्रमुखांनी त्‍यांच्‍याच नेत्‍यांविरुद्ध परदेशी शक्‍तींची बाजू घेतली. आपल्‍या देशाविरुद्ध परदेशी शक्‍तींशी हातमिळवणी करणार्‍या लष्‍करप्रमुखांच्‍या उदाहरणांनी बंगालचा इतिहास भरलेला आहे. यामुळे बांगलादेशाचे लष्‍करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान चीनची बाजू घेत आहेत का ? असा प्रश्‍न उपस्‍थित होतो.

२. चीनच्‍या दक्षिण आशियातील धोरणात्‍मक हालचाली

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

पाकिस्‍तानची ‘आय.एस्.आय.’ या गुप्‍तचर संघटना आणि मुसलमानांशी चांगले संबंध असलेल्‍या इतर घटकांच्‍या सहकार्याने बांगलादेशात चीनने थेट हस्‍तक्षेप करणे, हे एक सुनियोजित पाऊल आहे. भारताचा प्रतिकार करण्‍यासाठी या प्रदेशात पाकिस्‍तानच्‍या साहाय्‍याने चीनचा सहभाग चालू झाला आहे. पाकिस्‍तानने चीनला उत्तरेकडून हिंद महासागरात प्रवेश दिला. यासह आतंकवादी गटांना चीनकडून देण्‍यात येणारा पाठिंबा लक्षणीयरीत्‍या वाढला आहे. यामध्‍ये काश्‍मीरमधील पाकिस्‍तान पुरस्‍कृत आतंकवाद्यांना सहकार्य करणे, ‘इसिस-के’ आणि पूर्व तुर्किस्‍तानमधील सशस्‍त्र बंडखोरांना दडपण्‍यासाठी तालिबानला मान्‍यता देणे, अशा गोष्‍टींचा समावेश आहे. सरकारी कर्मचार्‍यांना गुंतवण्‍यापासून आतंकवादी गटांना पाठिंबा देण्‍यापर्यंतचे हे पालट चीनच्‍या धोरणातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

३. बांगलादेशावर झालेले परिणाम

बांगलादेशाचे संस्‍थापक शेख मुजीबर रहमान यांची मुलगी शेख हसीना या ‘जमात-ए-इस्‍लामी बांगलादेश (जमात)’ आणि त्‍याची विद्यार्थी शाखा ‘छात्रशिबीर’ यांसारख्‍या गटांविरुद्धच्‍या त्‍यांच्‍या भूमिकेमुळे इस्‍लामवाद्यांमध्‍ये लोकप्रिय नव्‍हत्‍या. या गटांचे ‘मुस्‍लिम ब्रदरहुड’शी (इस्‍लामी राष्‍ट्रांशी) दृढ संबंध आहेत. त्‍यांनी विरोधी पक्ष ‘बांगलादेश नॅशनलिस्‍ट पार्टी (बी.एन्.पी.)’ आणि बहुधा सशस्‍त्र दले यांमध्‍ये घुसखोरी केली आहे.

४. भारतासाठी भू-राजकीय परिणाम

हसीना यांच्‍यावर अविश्‍वास बाळगणार्‍या चीनला ढाका येथील कठपुतली सरकार पसंत आहे; कारण हे सरकार त्‍याला भारताविरुद्ध धोरणात्‍मक लाभ मिळवून देईल. बांगलादेशातील ही राजकीय अस्‍थिरता आणि म्‍यानमारमध्‍ये चालू असलेला संघर्ष यांमुळे ‘बिमस्‍टेक (बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्‍ह फॉर मल्‍टिसेक्‍टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कार्पोरेशन)’ आणि ‘आय.एम्.ई.सी. (इंडिया मिडल ईस्‍ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर)’ यांसारख्‍या भारताच्‍या प्रादेशिक उपक्रमांना धोका निर्माण झाला आहे.

५. चीनची मोठी रणनीती

जागतिक स्‍तरावर इस्‍लामी संघटनांशी चीनचे संबंध हे प्रारंभीला त्‍याच्‍या उघुर मुसलमान संबंधीच्‍या धोरणांवरील टीकेला दूर करण्‍यासाठीची एक युक्‍ती होती, जी आता आतंकवादी संघटनांशी युती करण्‍यामध्‍ये विकसित झाली आहे. लोकशाही विस्‍कळीत करणे आणि भूराजकीय पालटांना गती देणे हा, या धोरणाचा उद्देश आहे. तथापि ‘मुस्‍लिम ब्रदरहुड’ आणि तत्‍सम गट अनपेक्षित असू शकतात, हे चीनने समजून घेतले पाहिजे.

६. बांगलादेशातील तणावाच्‍या पार्श्‍वभूमीवर भारताने ढाकाशी संवाद साधणे का आवश्‍यक आहे ?

६ अ.  एका युगाचा अंत : शेख हसीना यांनी अचानक दिलेले त्‍यागपत्र आणि त्‍यांचे बांगलादेशातून पलायन हा त्‍या देशाच्‍या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे. हसीना यांचे वडील बंगबंधू यांच्‍या पुतळ्‍यावर आक्रमण करणार्‍या आंदोलकांची स्‍पष्‍ट भूमिका, म्‍हणजे ज्‍या युगात त्‍यांनी त्‍यांचा वारसा जतन करण्‍याचा प्रयत्न केला, त्‍या युगाच्‍या समाप्‍तीचे प्रतीक आहे.

६ आ. बांगलादेशामधील स्‍थितीमुळे भारतावर झालेले परिणाम : भारताच्‍या सुरक्षेसाठी, विशेषतः ईशान्‍येकडील देशांच्‍या सुरक्षेसाठी बांगलादेशातील स्‍थैर्य महत्त्वाचे आहे. संकटात सापडलेल्‍या हिंदु निर्वासितांच्‍या संभाव्‍य आगमनासाठी भारताने सिद्धता केली पाहिजे. गेल्‍या दशकभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या सरकारने बांगलादेशाशी मैत्रीपूर्ण संबंध यशस्‍वीरित्‍या प्रस्‍थापित केले आहेत आणि ते चालूच राहिले पाहिजेत.

६ इ. भारताचा पुढे जाण्‍याचा मार्ग : भारताने ढाका येथील सर्व राजकीय शक्‍तींशी संवाद साधला पाहिजे आणि बांगलादेशी सैन्‍याशी दृढ संबंध ठेवले पाहिजेत. बांगलादेशातील नवीन सरकारची रचना काहीही असो, विकासात्‍मक भागीदारी बळकट करणे आणि लोकांमधील परस्‍पर संबंध वाढवणे, ही भारताची चांगली सेवा असेल. बांगलादेशातील राजकीय अस्‍थिरता या प्रदेशातील भारताच्‍या सहभागाचे आणि सतर्कतेचे महत्त्व अधोरेखित करते. ढाकामधील सर्व भागधारकांशी संबंध जोपासून, भारत त्‍याच्‍या जवळच्‍या शेजारी देशात स्‍थैर्य आणि सुरक्षा सुनिश्‍चित करण्‍यास साहाय्‍य करू शकतो.

६ ई. बांगलादेशाकडून संभाव्‍य शत्रूत्‍व : जर ‘जमात-ए-इस्‍लामी’ आणि ‘बांगलादेश नॅशनलिस्‍ट पार्टी (बी.एन्.पी.)’ यांसारखे विरोधी गट सत्तेत आले, तर भारताचे बांगलादेशाशी संबंध बिघडू शकतात. त्‍यामुळे आधीच तणावग्रस्‍त असलेल्‍या दक्षिण आशियाई प्रदेशात शेजारी आणखी एक शत्रू जोडला जाऊ शकतो. बांगलादेशात मैत्रीविरहित राजवटीची शक्‍यता, म्‍हणजे भारत चारही बाजूंनी वैमनस्‍यपूर्ण शेजार्‍यांनी वेढलेला असू शकतो, अशी परिस्‍थिती निर्माण होऊ शकते.

६ ए. बांगलादेशातील धर्मनिरपेक्षता विरोधी शक्‍ती : शेख हसीना यांचा मुख्‍य राजकीय विरोधी पक्ष जमात-ए-इस्‍लामी आणि नॅशनलिस्‍ट पार्टी हे बांगलादेशच्‍या धर्मनिरपेक्ष पायाभरणीच्‍या विरुद्ध इस्‍लामी अस्‍तित्‍वाचे समर्थन करतात. बांगलादेश नॅशनलिस्‍ट पार्टीचेे संस्‍थापक झिया उर रेहमान यांनी बांगलादेशाच्‍या राज्‍यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्‍द काढला. यातून त्‍यांची वैचारिक भूमिका प्रतिबिंबित होते. दोन्‍ही गट ऐतिहासिकदृष्‍ट्या धर्मनिरपेक्षता विरोधी राहिले आहेत आणि त्‍यांना लोकसंख्‍या एकत्रित करण्‍यासाठी अन् पाकिस्‍तानच्‍या ‘आय.एस्.आय.’कडून निधी प्राप्‍त करण्‍यासाठी लक्षणीय पाठिंबा मिळत आहे.

७. बांगलादेशाच्‍या राजकीय स्‍थितीमध्‍ये अमेरिकेचा सहभाग

बांगलादेशामधील राजकीय स्‍थितीमध्‍ये अमेरिकेचा सहभाग हा विविध प्रश्‍न उपस्‍थित करतो. शेख हसीना यांनी अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांच्‍या प्रशासनाने त्‍यांच्‍या सरकारला असलेल्‍या तीव्र विरोधाचा हवाला देत अमेरिकेवर बांगलादेशाच्‍या कारभारात हस्‍तक्षेप केल्‍याचा आरोप केला आहे. अनेकदा लोकशाहीला चालना देण्‍याच्‍या नावाखाली, आपल्‍या धोरणात्‍मक हितसंबंधांची पूर्तता करण्‍यासाठी शासनामध्‍ये पालट घडवून आणण्‍याचा अमेरिकेचा इतिहास आहे. बांगलादेशात ‘इंडो-पॅसिफिक’मधील (हिंद-प्रशांत महासागरामधील) चीनच्‍या प्रभावाचा प्रतिकार करणे आणि त्‍याचा वेगवान विकास रोखण्‍यासाठी भारतावर दबाव आणणे, हे अमेरिकेचे उद्दिष्‍ट आहे.

८. धोरणात्‍मक भागीदारी बळकट करणे

आपल्‍या सीमेवरील संभाव्‍य शत्रूत्‍व लक्षात घेता भारताने सर्वसमावेशक धोरणात्‍मक भागीदारी बळकट करण्‍याचे मार्ग शोधले पाहिजेत आणि आग्‍नेय आशिया, ‘इंडो-पॅसिफिक’ शक्‍ती आणि मध्‍यपूर्वेसह आपल्‍या विस्‍तारित शेजार्‍यांशी व्‍यापार तीव्र केला पाहिजे. ऐतिहासिकदृष्‍ट्या भारत एक मजबूत, आर्थिक आणि सांस्‍कृतिक राजधानी राहिला आहे अन् देशाची समृद्धी सुरक्षित करण्‍यासाठी त्‍याच्‍या भौगोलिक स्‍थितीचा आणि सागरी व्‍यापाराचा लाभ घेत आहे.

भारत आता सर्व क्षेत्रांमध्‍ये आधुनिकीकरण करण्‍याच्‍या आणि जागतिक मागणी पूर्ण करण्‍यासाठी त्‍याचा स्‍वतःचा विकास करण्‍याच्‍या मार्गावर आहे. भारताची विस्‍तारवादी नसलेली ओळख आणि आदर्शवादी एकात्‍मता यामुळे तो बहुतांश जगाचा, विशेषतः जागतिक दक्षिण भागाचा मित्र बनला आहे.

८ अ. व्‍यापार आणि धोरणात्‍मक संबंधांचा विस्‍तार : सागरी मार्गाने व्‍यापारी मार्ग उघडणे, भागीदार देशांशी संबंध दृढ करणे, विस्‍तारवादी शक्‍तींचा सामना करण्‍यासाठी लष्‍करी शक्‍तीची निर्यात करणे आणि प्राचीन ज्ञानाचा प्रसार करणे यांमुळे भारताला त्‍याच्‍या शेजार्‍यांच्‍या शत्रूत्‍वाचा सामना करण्‍यास साहाय्‍य होऊ शकते. व्‍यापार आणि धोरणात्‍मक संबंध वाढवून भारत स्‍वतःची स्‍थिती मजबूत करू शकतो आणि या प्रदेशात स्‍थिरता सुनिश्‍चित करू शकतो.

९. बांगलादेशामध्‍ये उलथापालथ होत असतांना भारताने सक्रीय रहाण्‍याची आवश्‍यकता

बांगलादेशामधील राजकीय उलथापालथ भारताने सतर्क आणि सक्रीय रहाण्‍याची आवश्‍यकता अधोरेखित होते. ढाकामधील सर्व राजकीय शक्‍तींशी संवाद साधून, बांगलादेशी सैन्‍याशी संबंध वाढवून आणि धोरणात्‍मक भागीदारी बळकट करून भारत संभाव्‍य शत्रूत्‍व असलेल्‍या शेजार्‍यांनी निर्माण केलेल्‍या आव्‍हानांचा सामना करू शकतो.  वाढत्‍या अस्‍थिर प्रदेशात भारताचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्‍यासाठी ऐतिहासिक शक्‍तीचा लाभ घेणे, व्‍यापार आणि राजनैतिक संबंधांचा विस्‍तार करणे, हा भारताचा पुढील मार्ग असावा.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.

संपादकीय भूमिका 

बांगलादेशातील अराजकतेमध्‍ये चीनचा सहभाग लक्षात घेता त्‍याची विस्‍तारवादी वृत्ती रोखण्‍यासाठी भारताने सिद्धता करायला हवी !