पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेला हवालदार अमित नाईक याचा ‘फिनाईल’ पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न
म्हापसा, १५ डिसेंबर (वार्ता.) – भूमी बळकावल्याच्या प्रकरणातील आरोपीला साहाय्य केल्यामुळे पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेला हवालदार अमित नाईक याने ‘फिनाईल’ हे जंतूनाशक पिऊन आमहत्या करण्याचा प्रयत्न केला. १५ डिसेंबर या दिवशी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे जुने गोवे पोलिसांच्या लक्षात आले. यासंबंधी उपलब्ध माहितीनुसार १५ डिसेंबर या दिवशी सकाळी संशयित अमित नाईक याने स्वच्छतागृहात जाण्याचा बहाणा करून तिथे स्वच्छतेचे काम करणार्या महिलेच्या हातातून फिनाईलची बाटली हिसकावून घेऊन फिनाईल पिऊन टाकले. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी उपचारासाठी त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेले. तिथे त्याच्यावर उपचार चालू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल आणि उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन त्याची चौकशी केली. भूमी घोटाळ्यातील आरोपी सिद्दीकी उपाख्य सुलेमान खान याला अमित नाईक याने पोलीस कोठडीतून पळून जाण्यास साहाय्य केले होते. १३ डिसेंबरच्या रात्री नाईक हुब्बळ्ळी पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर
१४ डिसेंबर या दिवशी जुने गोवे पोलिसांनी त्याला अटक केली होती.