फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरिणीच्या जत्रोत्सवात मुसलमानांना दुकानांसाठी अनुमती न देण्याचा ठराव
गोमंतक मंदिर महासंघाने दिले होते श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थान समितीला निवेदन
पणजी, १५ डिसेंबर – श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानच्या जत्रोत्सवाला यंदा ३१ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर गोमंतक मंदिर आणि धार्मिक महासंघ अन् हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांनी १५ डिसेंबरला देवस्थान समितीच्या पदाधिकार्यांना अन्य धर्मियांना दुकाने थाटण्यास अनुमती न देण्याविषयी निवेदन दिले. धार्मिक संस्था महासंघाचे सर्वश्री सज्जन जुवेकर, रोहित धामसेकर, गोविंद लोलयेकर आणि सौ. शैला श्रीकांत देसाई यांनी हे निवेदन श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानचे अध्यक्ष श्री. दिवाकर देसाई यांना दिले. या वेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानच्या महाजनांच्या बैठकीत मुसलमानांना जत्रेत दुकाने थाटण्यास अनुमती देऊ नये, असा विषय पुढे आला. महाजनांच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मुसलमानांना दुकानांसाठी अनुमती न देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात अधिक माहितीसाठी देवस्थानचे अध्यक्ष दिवाकर नाईक देसाई यांना विचारले असता, त्यांनीही या माहितीला दुजोरा दिला.