सिंधुदुर्ग आरोग्य विभागाला अल्प दर्जाच्या गोळ्यांचा पुरवठा झाल्याचे उघड
गोळ्यांच्या दर्जाविषयी समजल्यानंतर त्या परत केल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण
सिंधुदुर्ग – शासकीय रुग्णालये सर्वसामान्य रुग्णांसाठी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत आणि येथे केल्या जाणार्या उपचारांवर जनता विश्वास ठेवून असते; मात्र आता जिल्हा परिषद आरोग्य विभागाला अल्प दर्जाच्या औषधांचा पुरवठा झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. ही औषधे आरोग्य विभागाने त्वरित संबंधित आस्थापनाला परत केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असले, तरी जिल्ह्यातील आरोग्य सेवेविषयी अप्रसन्न असलेल्या जनतेच्या मनात शासकीय रुग्णालयातून देण्यात येणार्या औषधांविषयी संभ्रम निर्माण झाल्यास तो दूर कसा करणार ? हा प्रश्न आहे.
‘कोल्हापूर येथील ‘विशाल एंटरप्रायझेस’ हे आस्थापन राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या रुग्णालयांना औषधांचा पुरवठा करत आहे. या आस्थापनाने सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाला पुरवठा केलेल्या Tab Azithromycin या गोळ्यांपैकी २७ सहस्र ७३० गोळ्या बनावट असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली.
याविषयी बोलतांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी सांगितले की, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत मिळालेल्या निधीतून निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर ‘विशाल एंटरप्रायझेस’ या आस्थापनाने Tab Azithromycin (500mg) या ३४ सहस्र ९९९ गोळ्यांचा पुरवठा १७ नोव्हेंबर २०२३ या दिवशी केला होता. ‘पुरवठा केलेल्या या गोळ्यांमध्ये काही त्रुटी असल्याने त्या परत कराव्यात’, असे पत्र ‘विशाल एंटरप्रायझेस’ने पाठवले होते. ते आम्हाला १८ जुलै २०२४ या दिवशी प्राप्त झाले. त्यामुळे या गोळ्या त्यांना परत करण्यात आल्या आहेत. याची माहिती सहसंचालक, खरेदी कक्ष, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांना पत्राद्वारे दिली आहे.