गुरुनिष्ठेची प्रेरणा देणारी नाथांची दत्तभक्ती ! – प्रवचनकार मिलिंद चवंडके
नाना महाराज मठातील २३२ वा दत्त जयंती सोहळा
नगर – भगवान विष्णूंच्या आदेशावरून नवनारायणांनी नवनाथ म्हणून अवतार धारण करत केलेली दत्तभक्ती ही गुरुनिष्ठेची प्रेरणा देणारी, गुरुनिष्ठेचा आदर्श उभा करणारी, गुरुनिष्ठेशी समरस कसे व्हावे, याचा कृतीशील संदेश देणारी आहे, असे प्रतिपादन नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार मिलिंद चवंडके यांनी केले. देहली गेटजवळील नाना महाराज मठात चालू असलेल्या २३२ व्या अखंड हरिनाम सप्ताहातील प्रवचन सोहळ्याचे द्वितीय पुष्प गुंफतांना ‘नाथांची दत्तभक्ती’ या विषयावर ते बोलत होते.
श्री. चवंडके पुढे म्हणाले की, आदिनाथ भगवान शंकर परमात्म्याकडून मिळालेले ज्ञान मच्छिंद्रनाथांनी भगवान श्रीदत्तात्रेयांच्या अनुग्रहानंतर नाथ संप्रदायाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या पुढ्यात ठेवले. गुरु गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना आणि गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना हेच आत्मज्ञान प्रदान केले. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आज घराघरात हे ज्ञान पोचले. हे ज्ञान म्हणजे नाथांच्या दत्तभक्तीमधून प्रगटलेले दिव्यदर्शनच होय. आदिनाथ भगवान शंकर परमात्म्यापासून ज्ञान आणि भगवान श्रीदत्तात्रेयांचा उपदेश ही ज्ञानोत्तर भक्ती होय. गुरुभक्ती, योगसाधना आणि ज्ञान यांचा त्रिवेणी संगम ‘नवनाथ भक्तीसार’ ग्रंथात झाला आहे. श्रीनृसिंह सरस्वतींच्या चमत्कारांची गाथा म्हणजे श्रीगुरुचरित्र आणि नवनाथांनी केलेल्या चमत्कारांची गाथा म्हणजे ‘नवनाथ भक्तीसार’ ग्रंथ आहे.
क्षणचित्रे
१. ‘दत्तजयंती सोहळ्यात प्रथमच ‘नाथांची दत्तभक्ती’ या विषयावर प्रवचन ऐकायला मिळाले’, असे श्रोत्यांनी सांगितले.
२. प्रवचनाच्या वेळी चवंडके यांनी उच्च स्वरात केलेला नाथांच्या नावांचा गजर वातावरण मंत्रमुग्ध करून टाकणारा आणि उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभा करणारा ठरला !
श्री. मिलिंद चवंडके पुढे म्हणाले की, आपल्या देहाच्या साहाय्याने परमपदाची प्राप्ती करून घ्यायची असल्याने देहाचे उत्तम रक्षण करावे. आरोग्य सांभाळावे. देह शुद्ध ठेवण्यासाठी शुद्ध शाकाहारी आणि निर्व्यसनी असावे. शुद्ध आचरण आणि चारित्र्यसंपन्नता आपणास भगवंतापर्यंत घेऊन जाते. सद़्गुरु भेटले की, अध्यात्म मार्गावर चालण्याचा मार्ग प्रशस्त होत जातो. आपण परगावी जाण्याची जशी जय्यत तयारी करतो तशी तयारी भगवंताकडे पोचण्यासाठी केली पाहिजे. गुरुभक्तीने ही सिद्धता घडते, असे त्यांनी विविध दाखले देत निरूपण करतांना सांगितले.
प्रवचन सोहळ्यास सर्वश्री भगवान देशमुख, सी.ए. संजय देशमुख, अविनाश धर्माधिकारी, पद्माकर देशमुख, वैद्य विलास जाधव, रणजित रासकर, राजेंद्र भागानगरे, राजेंद्र परदेशी, गोविंदराव मिसाळ, सर्वोत्तम क्षीरसागर, सोन्याबापू मुदळ, सौ.सोनाली चवंडके, सुनंदा पानसरे, सौ. राणी भागानगरे यांच्यासह शहराच्या उपनगरातील भाविक आणि नाथभक्त उपस्थित होते. सामुदायिक पसायदानाने प्रवचन सोहळ्याची सांगता करण्यात आली.