दैवी बालसाधकांचे त्यांची आध्यात्मिक प्रगल्भता दर्शवणारे दृष्टीकोन !
१. कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १३ वर्षे)
१ अ. ‘देव साधकांच्या माध्यमातून चुकांची जाणीव करून देऊन घडवत असणे, म्हणजेच साधनेत परिपक्व होण्यासाठी तो आपल्याला साहाय्यच करत असणे’ : ‘कुंभार मातीचे मडके बनवत असतांना वरून त्याला थापत आणि मारत असतो. त्याच वेळी तो त्या मडक्याला दुसर्या हाताने आतून आधारही देत असतो. त्यामुळेच ते मडके परिपक्व बनते. त्याप्रमाणेच आपल्याला देवाचा आधार आहेच. देव साधकांच्या माध्यमातून आपल्याला चुकांची जाणीव करून देऊन घडवत आहे, म्हणजेच साधनेत परिपक्व होण्यासाठी तो आपल्याला साहाय्यच करत आहे.’ (२३.११.२०२२)
१ आ. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत असतांना आपण स्वभावदोष आणि अहं यांच्याशी लढून देवाच्या चरणी जाण्याचा संघर्ष आनंदाने केला, तर आपण लवकरच देवाच्या चरणी जाणार आहोत.’ (२५.११.२०२२)
२. कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे)
२ अ. ‘एखाद्या साधकाला साधनेत साहाय्य करतांना आपण त्याला कोणत्या टप्प्यापर्यंत साहाय्य करू शकतो’, हे तारतम्याने पहायला हवे : ‘एखाद्या साधकाला साधनेत साहाय्य करतांना आपण त्याला कोणत्या टप्प्यापर्यंत साहाय्य करू शकतो’, हे तारतम्याने पहायला हवे. ‘आपण त्याला प्रसंगामध्ये साहाय्य करावे कि त्याचे दायित्व असलेल्या साधकाला साहाय्य करण्यास सांगावे ?’, यांपैकी योग्य काय ?’, ते आपल्या लक्षात यायला हवे.’ (२३.११.२०२२)
२ आ. ‘परात्पर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) साधकाला उपजतच गुण दिले आहेत. प्रत्येक साधकामध्ये ते गुण आहेत. साधकांनी त्या गुणांना केवळ प्रयत्नांचे खतपाणी घालून ते वृद्धींगत करायचे आहेत.’ (२५.११.२०२२)
३. कु. सायली देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १५ वर्षे)
३ अ. साधकांना साधनेत साहाय्य करण्याच्या संदर्भात ठेवायचा दृष्टीकोन : ‘प्रत्येक व्यक्ती साधनेत कधी येणार ? ती व्यक्ती साधनेत किती वर्षे टिकून रहाणार ? त्या व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती कधी होणार ?’, हे देवाने निश्चित केले आहे. आपण त्याचा विचार करायला नको. आपण आपले क्रियमाण म्हणून निरपेक्षपणे साधकांना साहाय्य करायचे आहे.’ (२३.११.२०२२)
पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्यातील शिकण्याची वृत्ती
‘पू. (सौ.) अश्विनी पवार (सनातनच्या ६९ व्या संत) नेहमी शिकण्याच्या स्थितीत असतात. त्या निर्जीव वस्तूंकडूनही शिकत असतात. एकदा त्यांनी एका साधकाला सांगितले, ‘‘माझी चूक व्हायला नको’, असे वाटणे’, हीसुद्धा एक स्वेच्छाच आहे. आपण पटलाकडून शिकू शकतो. आपण पटलावर कितीही साहित्य ठेवतो, तरीही ते सर्व स्वीकारते. कधी कधी त्या पटलाला आपला पाय लागतो, तरीही ते सर्व काही स्वीकारते. आपल्यालाही तसेच प्रयत्न करायचे आहेत.’’
– कु. सायली देशपांडे (२५.११.२०२२)