UP CM Adityanath Slams Opposition : संभल (उत्तरप्रदेश) येथे ४६ वर्षांपूर्वी हिंदूंच्या नरसंहारांवर विरोधक चर्चा का करत नाहीत ? – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रश्न
लक्ष्मणपुरी ( उत्तरप्रदेश) – ४६ वर्षांपूर्वी संभलमध्ये नरसंहार करणार्या गुन्हेगारांना आजपर्यंत शिक्षा का झाली नाही? याविषयी चर्चा का होत नाही ? मृत हिंदूंचा काय दोष होता ?, असे प्रश्न उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात उपस्थित केले. संभल येथे १४ डिसेंबर या दिवशी मुसलमानबहुल भागात गेल्या ४६ वर्षांपासून बंद असलेले मंदिर सापडले. त्यावरून ते बोलत होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, काल संसदेत राज्यघटनेवर चर्चा होत होती. त्या वेळी संभलमध्ये झालेल्या गोळीबारात मुसलमानांचा मृत्य झाल्याचे सूत्र उपस्थित केले जात होते; मात्र विरोधकांच्या सरकारच्या काळात म्हणजे ४६ वर्षांपूर्वी बंद पडलेल्या मंदिराविषयी चर्चा झाली नाही. यातून विरोधकांची मानसिकता सर्वांसमोर आली. संभलमधील ते प्राचीन मंदिर प्रशासनाने रातोरात बांधले का ? तेथे मूर्ती आपोआप आली का ? जो कुणी सत्य बोलते, त्यांना धमकावले जाते, त्यांचा आवाज दाबला जातो. असे करणारी माणसे राज्यघटनेविषयी बोलतात, हा दुटप्पीपणा आहे. त्यामुळेच कुंभमेळ्याविषयीही असाच अपप्रचार करण्याचा प्रयत्न हे लोक करतील.
देशात समान नागरी कायदा नको का ?
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी भारतात समान नागरी कायदा हवा’, असे विधान केले होते. तसेच त्यांनी देशात बहुसंख्यांकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे, असे विधान केले होते. असे असतांना विरोधक त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी करणे चुकीचे आहे का ?
संभल येथे सापडलेल्या मंदिरात झाली आरती
संभल येथे ४६ वर्षांनंतर सापडलेल्या मंदिरात १५ डिसेंबरला सकाळी पूजा आणि आरती करण्यात आली. सध्या मंदिराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली असून विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिका
भारतात हिंदूंना कोणताही मानवाधिकार नाही, हे गेल्या अनेक दशकांपासून दिसून आले असल्याने या प्रश्नाचे उत्तर विरोधक कधीच देणार नाहीत. असा प्रश्न भविष्यात उपस्थित होणार नाही, यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे ! |