राजकोट (मालवण) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नव्याने उभारणार

पुतळा उभारण्याचे काम राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा.लि. करणार

मुंबई – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट, मालवण येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला होता. त्या ठिकाणी राज्य सरकारने आता ६० फूट उंचीचा पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या ‘राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि.’ या आस्थापनाला दिले आहे. या आस्थापनाला यापूर्वी गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्याचे काम मिळाले होते.

नौदल दिनानिमित्त राजकोट, मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबर २०२३ या दिवशी या पुतळ्याचे लोकार्पण केले होते; मात्र २६ ऑगस्ट २०२४ या दिवशी हा पुतळा कोसळला होता. त्यामुळे शिवसैनिकांसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर नव्याने शिवपुतळा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया चालू करण्यात आली होती. त्यानुसार राज्यशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल अन् दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. यासाठी २ आस्थापनांनी निविदा भरली होती. त्यांतील ‘राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि.’ या आस्थापनाची निवड करण्यात आली. हे काम त्यांना ६ महिन्यांत पूर्ण करावे लागणार आहे. निविदेनुसार १०० वर्षे टिकेल, असा पुतळा बांधण्याची अट घातली गेली आहे, तसेच पुतळ्याची देखभाल आणि दुरुस्ती १० वर्षे करण्याची अट कंत्राटदार आस्थापनाला घालण्यात आली आहे. प्रारंभी ३ फूट उंचीचे ‘फायबर मॉडेल’ बनवले जाईल. कला संचालनालयाने मान्यता दिल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम केले जाईल.