थोडक्यात महत्त्वाचे !
नवी मुंबई विमानतळाची धावपट्टी सिद्ध !
नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवर वैमानिकांना विमान उतरवतांना धावपट्टीचा अचूक अंदाज मिळावा, यासाठी धावपट्टीवरील दिव्यांच्या मार्गाची अचूक सूचना देणार्या यंत्रणेची चाचणी एका लहान विमानाच्या साहाय्याने सकाळी ८.३० वाजता घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने सांगितले.
शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणे प्रलंबित !
रायगड – रायगड जिल्ह्यातील २ सहस्र ५२८ शाळांमध्ये ३० सहस्र रुपयांचे सीसीटीव्ही युनिट बसवण्यासाठी साडेसहा कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे सादर केला आहे; मात्र विधानसभा निवडणुकीमुळे त्याला मान्यता मिळालेली नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन आहे.
संपादकीय भूमिका : ही प्रक्रिया लवकरात लवकर व्हायला हवी !
धान्य वितरणात अडचणींमुळे ग्राहक त्रस्त !
अलिबाग – धान्य वितरणात येणारी अडचण लक्षात घेऊन पुन्हा ऑफलाइन धान्य वितरणाला राज्य सरकारने अनुमती द्यावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. धान्य वितरणात अडथळे येत असल्याने लाभार्थी त्रस्त्र झाले आहेत. ‘सर्व्हर’ डाऊन असल्याने ‘इ-पॉस’ यंत्र संथ गतीने चालते. कधी कधी पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे ग्राहकांना ताटकळत थांबावे लागत आहे.
नालासोपारा येथील कुख्यात गुंड कारागृहात स्थानबद्ध !
वसई – नालासोपारा येथील कुख्यात गुंड राजकुमार गुप्ता उपाख्य राजू बैल (वय ३६ वर्षे) याच्यावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करून त्याला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. अमली पदार्थांची तस्करी, मारामारी, शस्त्र बाळणे आदी विविध गुन्ह्यांत त्याच्यावर १३ हून अधिक गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
बस खांबावर आदळून ३१ जण घायाळ !
धरणगाव (जळगाव) – दोनगाव परिसरात स्मशानभूमीजवळ भरधाव बसवरील नियंत्रण सुटल्याने बस इलेक्ट्रिक खांबावर जाऊन आदळली. यात शालेय विद्यार्थी आणि प्रवासी असे ३१ जण घायाळ झाले आहेत.
कल्याण येथे गोमांसाची वाहतूक करणारे २ धर्मांध अटकेत !
कल्याण – गायी आणि वासरे यांची बेकायदेशीर कत्तल करून रिक्शातून ३० सहस्र रुपयांच्या मांसासह एकूण १ लाख ३० सहस्र रुपयांचा माल नेणारा रिक्शाचालक अफझल अकबर कुरेशी (वय ३३ वर्षे) आणि कमरू अब्दुल करीम यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका : गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही कधी होणार ?