प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारण्यात येणारे शिवछत्रपतींचे स्मारक भव्य असावे ! – डॉ. सुरेश चव्हाणके, सुदर्शन
वाई, १४ डिसेंबर (वार्ता.) – प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारण्यात येणारे शिवछत्रपतींचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे, तसेच या ठिकाणी बसवण्यात येणारी मूर्ती ही गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीहून मोठी असावी, असे मत ‘सुदर्शन’ वाहिनीचे मुख्य संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी व्यक्त केले.
वाई (सातारा) येथील ‘प्रतापगड उत्सव समिती’च्या वतीने महागणपति घाटावर ३६५ वा ‘शिवप्रतापदिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी पालघर येथील स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती. महाराजांच्या हस्ते डॉ. चव्हाणके यांना ‘वीर जीवा महाले पुरस्कार’, तसेच उच्च न्यायालयाचे अधिवक्ता नीलेश आंधळे यांना ‘पंताजी काका बोकील अधिवक्ता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. चव्हाणके पुढे म्हणाले, ‘‘बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी देशात वाढत आहे. हिंदु अल्पसंख्यांक होत आहेत. या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रिया (एन्.आर्.सी.) सरकारने लवकरात लवकर लागू करावा. यासाठी प्रत्येक नागरिकाने रडणार नाही, तर लढणार ही भूमिका घेऊन आपले राष्ट्र आणि धर्मप्रेम जागृत ठेवण्याची आवश्यकता आहे. ‘शिवप्रतापदिन’ हा केवळ प्रतापगड, वाई किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित न रहाता, तो संपूर्ण देशामध्ये साजरा झाला पाहिजे, तरच संपूर्ण हिंदु समाज राष्ट्र आणि धर्माच्या संरक्षणासाठी जागृत अन् कृतीशील होईल.