श्रीसंत बाबा महाराज आर्वीकर यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !
१. ‘आपल्या अंतर्यामी श्री गुरुदेवांचे पूर्ण अवतरण होणे’, हेच साधनेचे स्वरूप आहे आणि त्यासाठी प्रयत्न करत रहाणे, उद्योग करत रहाणे, याचेच नाव ‘साधना’ आहे.
२. साधनेची भूक आपल्याला सहज लागली पाहिजे. झाडाला जशी पाने फुटतात, तशी साधकाला साधना फुटली पाहिजे. त्याच्या अंगाअंगातून साधना क्रियाशील झाली पाहिजे.
३. साधकाच्या प्रत्येक लहानसहान कृतीतून माणसातला देवच प्रगट झाला पाहिजे.
४. साधकाचा स्वभावच मुळात साधनात्मक असला पाहिजे.
५. ‘भारतीयता’ ही जशी एक जीवननिष्ठा आहे, तशी ‘साधकत्व’ हीसुद्धा एक जीवननिष्ठाच आहे.
६. अशी सहजगतिक साधना आपल्या जीवनातून साकार व्हावी आणि साधनेचा स्वभावच आपल्यामध्ये घडावा’, अशी जिज्ञासा अन् तळमळ आर्त जिवांना लागायला हवी.’
सकाळी उठल्यानंतर साधनेच्या संदर्भात करावयाच्या कृती !
१. प्रातःस्मरण : ‘प्रभाती (पहाटे) उठल्यानंतरचा उत्प्रयोग (स्मरण किंवा आचरण) म्हणजे ‘प्रातःस्मरण’ होय.
२. ध्येयचिंतन : प्रभातीनंतर सकाळ चालू होते. सकाळ, म्हणजेच कालमापनाच्या आपल्या जाणिवेला आवाहन देणारी वेळ होय. ‘आपण जी धडपड करणार आहोत, ती कशासाठी ?’, या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेऊन तेथे वृत्ती स्थिर करणे, म्हणजे ‘ध्येयचिंतन’ होय.’
– श्रीसंत बाबा महाराज आर्वीकर (साभार : ‘साधक विहार सूत्रे’)