परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे धाकटे बंधु सुहास बाळाजी आठवले यांनी शालेय जीवनात लिहिलेला निबंध : भारतीय शेतकरी
‘शेतकर्याचे जीवन, म्हणजे नम्र प्रयत्नवादाचे शिक्षण !’ – विनोबा भावे
शेती हे भारताचे प्रधान अर्थकारण (धंदा) आहे. बरेचसे लहानमोठे व्यवसाय शेतीशी निगडित आहेत; म्हणून शेतकरी हा भारताचा कणा आहे. तो कणा ताठ आणि मजबूत असणे अत्यावश्यक आहे.
डोक्यास मुंडासे, पायांत फाटक्या-तुटक्या वहाणा, अनेक छिद्रे असलेली बंडी, कमरेपासून गुडघ्यापर्यंत जाडेभरडे धोतर आणि खांद्यावर घोंगडे हा शेतकर्याचा पेहराव. दारिद्र्य सदैव त्याच्या पाठीस हात धुवून लागलेले असते. अवर्षण आणि अतिवर्षण हे त्याचे शत्रू. ‘शेतात राबूनही पोटापुरते पीक होईल’, याची निश्चिती नाही; म्हणूनच त्यास दैवावर आणि देवावर विसंबून रहावे लागते. सावकार अव्वाचे सव्वा करून (मूळ रकमेपेक्षा पुष्कळ अधिक वाढवून) त्याला लुबाडतो. शिक्षणाशी त्याचा छत्तीसचा आकडा (तीव्र वैर) आहे. अनेक जीर्ण रुढींनी (कालबाह्य प्रथांमुळे) तो ग्रस्त आणि त्रस्त झाला आहे.
भारतीय शेतकरी अशिक्षित असला, तरी अडाणी अजिबातच नाही. त्यास ‘शिष्टाचाराने कसे वागावे ?’, हे समजते. कुणी ओळखीचा गृहस्थ कधी काळी मिळाला, तर ‘रामराम दादा !’ हे प्रेमोद्गार तो काढतोच काढतो. आलेल्या अतिथींचे तो मोठ्या प्रेमाने स्वागत करतो. तो कुणास फसवीत नाही. त्याची प्रगती होणे अत्यावश्यक आहे. त्यास लिहिणे आणि वाचणे शिकविणे सुशिक्षितांनी आपले कर्तव्य मानले पाहिजे. सरकारने त्यांच्या उन्नतीकरिता प्रयत्न केलेच पाहिजेत. खुद्द त्याच्यातही ‘उद्धरेदात्मनात्मानम् ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ६, श्लोक ५) म्हणजे ‘स्वतःच स्वतःचा संसारसमुद्रातून उद्धार करून घ्यावा’, ही भावना उत्पन्न झाली पाहिजे. त्याच्या मुलाबाळांना शिक्षण मिळाले पाहिजे. शेतकी प्रदर्शनाद्वारे आणि शेतकी अधिकार्यांकडून त्यास शेतीविषयी उपयुक्त माहिती मिळाली पाहिजे.
सध्या सरकार आणि जनता शेतकर्यांच्या उन्नतीकरिता आटोकाट प्रयत्न करीत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. रेडिओवर खेडुतांसाठी विशेष कार्यक्रम ठेवण्यात येतात. शेतकी प्रदर्शने भरविण्यात येतात. ‘कष्टाचे काम करणे कमी प्रतीचे आहे’, हा बरेच दिवसांपासून लोकांत रूढ झालेला समज नष्ट होत आहे. पू. विनोबा यांच्यासारखे पुढारी श्रमाची प्रतिष्ठा वाढविण्याचे प्रयत्न करत आहेत. भारतीय शेतकर्यांची सर्वांगिण प्रगती झाल्यास ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी’, अशी परिस्थिती निर्माण होण्यास काहीच उशीर लागणार नाही.’
– सुहास बाळाजी आठवले