नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे दत्त जन्मसोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !
कोल्हापूर, १४ डिसेंबर (वार्ता.) – श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात सायंकाळी ५ वाजता जन्मकाळ भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दत्त जयंतीच्या निमित्ताने १३ डिसेंबर पासूनच कर्नाटक आणि महाराष्ट्र येथील भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली, मिरज येथील आगारांमधून थेट नृसिंहवाडीसाठी जास्त गाड्यांची सोय करण्यात आली होती.
नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेले ग्रंथप्रदर्शन | नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील मंदिराच्या परिसरात दत्तजन्माचा देखावा सिद्ध करण्यात आला होता |
सांगली – सांगलीवाडी येथे नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी स्थापन केलेल्या दत्त मंदिरात भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी दर्शन घेतले. या प्रसंगी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी श्री. केदार खाडिलकर, श्री. नितीन खाडिलकर, तसेच अन्य उपस्थित होते.
सांगलीवाडी (सांगली) येथील दत्त मंदिरात आरती करतांना भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ | सांगलीवाडी (सांगली) येथील दत्त मंदिरात भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांचा सत्कार करतांना मंडळाचे पदाधिकारी |
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात दत्त जयंती साजरी !
अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ यांचे मूळ स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. या निमित्ताने लाखो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. पहाटे ५ वाजता काकडआरती झाल्यावर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी ११.३० वाजता नैवेद्य आरती पार पडली. दत्त जयंतीच्या निमित्ताने कोकण, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर यांसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यातून पायी दिंडी आणि पालख्या आल्या होत्या. त्यातील भक्तांनीही स्वामींचे दर्शन घेतले.
‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा’च्या समर्थ महाप्रसाद सेवेला ३ वर्षे पूर्ण !
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्तजयंती निमित्त सकाळी विविध धार्मिक कार्यक्रमानंतर सहस्रो स्वामीभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. न्यासाकडून चालू असलेल्या समर्थ महाप्रसाद सेवेला ३ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून २२२ लाभार्थ्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत सतरंजी वाटप करण्यात आले.
न्यासाच्या वतीने प्रतिदिन २२२ निराधार, दिव्यांगांना २ वेळचा ‘समर्थ महाप्रसाद’ डबा घरपोच दिला जातो. या वेळी आमदार शिवाजीराव पाटील यांचा सत्कार न्यासाच्या वतीने कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते ‘श्रीं’ची मूर्ती कृपावस्र आणि श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. राज्यातून विविध जिल्ह्यांतून आलेल्या पालख्यांचे स्वागत अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.