मारकडवाडीच्या (जिल्हा सोलापूर) नावे पुरोगाम्यांचा घटनाद्रोह !
‘कम्युनिस्टांचा (साम्यवाद्यांचा) राज्यघटनेला विरोध आहे, तो ‘ही राज्यघटना कामगारांच्या अहिताची आहे म्हणून नव्हे ! तर ही राज्यघटना संसदीय लोकशाहीच्या आधारावर उभी आहे’, म्हणून. कम्युनिस्टांना भारतात हुकूमशाही हवी आहे आणि या हुकूमशाहीला अनुसरून त्यांना राज्यघटना हवी आहे. दुसरे आणि महत्त्वाचे कारण, म्हणजे साम्यवाद्यांना राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांवर निर्बंध नको आहेत, जेणेकरून संसदीय मार्गाने ते सत्तेवर येऊ शकले नाहीत, तर या अनिर्बंध हक्कांचा वापर करून ते राज्य उलथवू शकतील आणि भारतात हुकूमशाही आणू शकतील.’ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (साभार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे)
१. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांचे आरोप आणि निवडणूक आयाेगाचा खुलासा
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर हे माळशिरस मतदासंघामध्ये हे विजयी झाले आहेत; मात्र त्यानंतर ‘मारकडवाडी या गावातून अपेक्षित मते मिळाली नाहीत’, असा दावा त्यांनी केला. केवळ दावा करण्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी मारकडवाडी गावापुरते मतपत्रिकेद्वारे खासगीरित्या मतदान घेण्याची सिद्धता केली होती. त्यासाठी त्यांनी नेहमीप्रमाणे ‘इ.व्ही.एम्.’वर (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन – इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर) खापर फोडले; मात्र निवडणूक आयोगाने जानकर यांच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकवाडीमध्ये प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष रितीनेच पूर्ण करण्यात आली आहे’, असे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी विजया भांगळालकर यांनी एका अधिकृत पत्रकाद्वारे दिले आहे.
‘मारकडवाडी येथे मतदान केंद्र क्र. ९६ ते ९८ अशी ३ केंद्रे येतात. या तीनही मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या प्रक्रियेत कोणतीही विसंगती आढळलेली नाही. मतदानाच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर उमेदवारांचे ‘मतदान प्रतिनिधी’ उपस्थित होते आणि त्यांच्याकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. त्याचप्रमाणे मतमोजणीच्या वेळीही उमेदवाराचे ‘मतमोजणी प्रतिनिधी’ उपस्थित होते. त्यांच्याकडूनही मतमोजणीच्या वेळी किंवा नंतरही कोणताही आक्षेप नोंदवण्यात आलेला नाही, तसेच फेरमतमोजणीची कोणतीही मागणी झाली नाही. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पारदर्शकपणे पार पडल्यानंतरच निकाल घोषित झाला आहे’, असे निवडणूक आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
२. …या निमित्ताने उपस्थित होणारे प्रश्न
जानकर यांच्या खासगीरित्या मतदान घेण्याच्या प्रयत्नास प्रशासनाने हाणून पाडले आहे. त्यामुळे तूर्तास तरी त्यांनी माघार घेतली आहे; मात्र त्यांच्या मागचा ‘बोलाविता धनी कोण ?’, हे शोधण्याची आवश्यकता आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
अ. केंद्रीय निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थेला धाब्यावर बसवून जानकर यांनी अशा प्रकारे खासगी मतदान घेण्याचा घटनाद्रोही निर्णय घेतला, त्यास त्यांच्या पक्षाचा आणि पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचाही पाठींबा होता का ?
आ. ‘इ.व्ही.एम्.’विरोधात अफवा पसरवूनही पुरोगामी ‘इकोसिस्टम’ला (यंत्रणेला) यश मिळालेले नाही. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगास आव्हान देण्याचा प्रयत्न म्हणून खासगीरित्या मतपत्रिकेवर मतदान घेण्याची नवी पद्धत पुरोगाम्यांनी जन्मास घातला आहे का ?
इ. पुरोगामी मंडळींकडून न्यायव्यवस्थेवरही अनेकदा संशय व्यक्त करण्यात येतो. आपल्या मनाप्रमाणे निकाल न लागल्यास न्यायाधीशांनाही लक्ष्य करण्यात येते. या पार्श्वभूमीवर खासगी मतदानाप्रमाणेच भविष्यात खासगी न्यायालये अथवा नक्षलवाद्यांप्रमाणे ‘कांगारू न्यायालये’ चालवण्याचा पुरोगाम्यांचा इरादा आहे का ?
ई. विशिष्ट गावातून अपेक्षित मते न मिळाल्याचा दावा करून संबंधित गावातील मतदारांना धमकी देण्याची नवी व्यवस्था चालू करण्याचा मनसुबा आहे का ?
उ. एरव्ही रा.स्व. संघ आणि भाजप यांवर ‘भारतीय राज्यघटना पालटणार’, असा अपप्रचार करणारे पुरोगामी प्राध्यापक, पत्रकार, लेखक आणि सामाजिक वगैरे कार्यकर्ते आमदार जानकरांच्या वरील घटनाद्रोही कृत्यावर शांत बसले होते. अनेकांनी तर त्यास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठींबाही दर्शविल्याचे दिसते. त्यामुळे जानकर यांच्यामागे हेच लोक होते का ?
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुरोगामी किंवा साम्यवादी असो, यांनी वर्ष २०१४ पासून घटनात्मक आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला नाकारले आहे; मात्र त्यासाठी त्यांचे ‘इ.व्ही.एम्.’वर आरोप ते कथित आंदोलनांच्या मागून अराजकता पसरवण्याचे उपायही अपयशी ठरले आहेत.
३. साम्यवाद्यांचा अराजकता पसरवण्याचा उद्देश
त्याचे कारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतियांना दिलेली राज्यघटना. राज्यघटनेने घटनात्मक संस्थांची मजबूत चौकट उभी केल्यानेच पुरोगामी अराजकतावादी वारंवार अपयशी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर ‘खासगी मतदानाप्रमाणे उद्या खासगी राज्यघटना सिद्ध करून स्वतःचा ‘अजेंडा’ (कार्यसूची) रेटण्याची सिद्धता तर पुरोगामी ‘इकोसिस्टम’कडून होत नाही ना ?’, असा अतिशय गंभीर प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे. त्यामुळेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साम्यवाद्यांविषयी जे लिहून ठेवले आहे, ते किती समर्पक आहे, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे.
– पार्थ कपोले, नवी देहली (४.१२.२०२४)