प्रत्येक कृतीचा सूक्ष्मातून आणि व्यापक विचार करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘रामनाथी आश्रमाचे बांधकाम झाल्यानंतर आम्ही आश्रमात प्रथमच राक्षोघ्न इष्टि करण्याचे ठरवले होते. प.पू. डॉक्टरांना तसे सांगितल्यावर त्यांनी विचारले, ‘‘यज्ञ कुठे करणार ?’’ त्या वेळी यज्ञ करण्यासाठी आजच्यासारखी वेगळी जागा नव्हती. तेव्हा गुरुदेवांनीच आम्हाला याविषयी मार्गदर्शन करून सूक्ष्मातून यज्ञाची जागा ठरवून दिली. रामनाथी आश्रमाच्या मध्यभागी जो चौक आहे, तेथे ध्यानमंदिराच्या जवळ कोपर्यात एक जागा त्यांनी निवडून दिली आणि तेथे हवनकुंड बनवण्यास सांगितले. यावरून लक्षात आले की, गुरुदेव प्रत्येक गोष्टीचा किती बारकाईने विचार करतात. ‘यज्ञात निर्माण होणार्या दैवी ऊर्जेचा केवळ आश्रमालाच नव्हे, तर सार्या ब्रह्मांडाला कसा लाभ होईल’, हा गुरुदेवांचा त्यामागील व्यापक उद्देश होता.
हा यज्ञ संपन्न झाल्यानंतर गुरुदेवांनी आम्हाला यज्ञाची फलनिष्पत्ती ३० टक्के मिळाली, असे सांगून आमच्या सेवेचे कौतुक करून आम्हा सर्वांना प्रसाद दिला.
(कलियुगात ३० टक्के फलनिष्पत्ती म्हणजे १०० टक्के फलनिष्पत्ती मिळण्यासारखे आहे. सत्ययुगात १०० टक्के, त्रेतायुगात ७० टक्के, द्वापरयुगात ५० टक्के आणि कलियुगात ३० टक्के एवढीच प्रत्येक गोष्टीची फलनिष्पत्ती असते, असे गुरुदेव सांगत असत. कलियुगात अनिष्ट शक्तींचा प्रकोप वाढल्याने सत्ययुगापेक्षा क्रमाने फलनिष्पत्तीचे प्रमाण अल्प होत गेले, हे त्यामागचे कारण आहे. – संकलक)
बरीच वर्षे आम्ही गुरुदेवांनी नेमून दिलेले हवनकुंड तसेच झाकून ठेवले होते. याच हवनकुंडात नंतर गायत्री यज्ञही झाला. जेव्हा नवीन हवनकुंडाची निर्मिती झाली, तेव्हा आम्ही हे यज्ञकुंड विसर्जित केले.
यावरून गुरुदेव प्रत्येक गोष्टीचा स्थुलातून, तसेच सूक्ष्मातूनही कसा अभ्यास करत असत, हे शिकायला मिळाले. येथे गुरुदेवांनी यज्ञकुंडाची जागा सूक्ष्मातून निवडून तेथील भूमीचा चैतन्याच्या संदर्भातील प्रक्षेपणशक्तीचाही विचार केला, असे मला वाटले.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, कांचीपूरम्, तमिळनाडू. (४.१२.२०२४)
|