‘ऑनलाईन’ फसवणुकीविरुद्ध सावध व्हा !
ऑनलाईन फसवणूक आणि त्यातही सध्या डिजिटल अरेस्ट (आभासी अटक) याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामध्ये सर्वसामान्यांपासून ते अगदी उच्चभ्रू वर्गातील लोकही फसवले जात आहेत. अगदी व्यावहारिक क्षेत्रात मोठ्या पदावर असलेले प्राध्यापक, अभियंता, डॉक्टरही यात फसवले जात आहेत. ‘डिजिटल अरेस्ट’ ही एक व्यापक संकल्पना धरली, तर अन्य अनेक प्रकारेही फसवण्याचे प्रकार वाढत आहेत. मुख्य म्हणजे यामध्ये व्यक्ती फसवली गेल्यानंतर, त्याविषयी पोलिसांकडे तक्रार करणे, हानीभरपाई मिळवणे या पुष्कळ मोठ्या प्रक्रिया आहेत. त्यापूर्वीच या घटनांच्या संदर्भात कशा प्रकारे जागरूक राहू शकतो ? हे मी स्वत: घेतलेल्या अनुभवांतून येथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
१. ऑनलाईन खरेदी केल्यावर बक्षीस मिळाल्याचा संपर्क
एकदा मी ‘फ्लिपकार्ट’ या ‘ऑनलाईन शॉप’वरून काही वस्तूंची खरेदी केली होती. त्यानंतर ४ दिवसांनी फ्लिपकार्ट येथूनच एक संपर्क आला आणि ‘फ्लिपकार्ट कस्टमर लकी ड्रॉ’ या स्पर्धेत तुमचा क्रमांक लागला आहे. तुम्हाला स्कॉर्पियो गाडी बक्षिस मिळाली आहे’, असे सांगितले. संबंधित व्यक्तीने त्वरितच गाडीचे छायाचित्र पाठवून दिले आणि ‘केवळ ७० सहस्र रुपये ‘आर्.टी.ओ. पासिंग (उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रमाणपत्र)’ आणि वाहन आणण्या-नेण्याचा व्यय पाठवा’, असे सांगितले. संबंधित व्यक्तीचे मला तिचे फ्लिपकार्ट आस्थापनाचे ओळखपत्रही पाठवले. तेव्हा अचानक आलेल्या या संपर्कामुळे मी प्रथम गोंधळलो; कारण त्याने सांगितलेली माहिती काही प्रमाणात सत्य होती. नंतर मी प्रथम फ्लिपकार्टच्या ग्राहक कक्षाला संबंधित ‘आयडी’ (ओळखपत्र) पाठवून ते खरे कि खोटे, याची निश्चिती केली. त्या वेळी ते ओळखपत्र बनावट असल्याचे समजले.
त्यानंतर संबंधिताला मी ‘गाडी घेण्यासाठी (बेंगळुरू येथून पाठवणार असल्याने) स्वत: विमानाने आताच बेंगळुरूला येतो’, असे सांगितले. तेव्हा त्या व्यक्तीने ‘नको, तुम्हाला आर्.टी.ओ पासिंगला अडचण येईल.’ त्या व्यक्तीला मी ‘माझे नातेवाईक बेंगळुरू येथेच आहेत, मला काही अडचण येणार नाही. मला तुम्ही त्वरित शोरूमचा पत्ता व्हॉट्सॲप करा, माझी कागदपत्रे सिद्ध करा, आता निघतोच’, असे सांगितले, तेव्हा त्या व्यक्तीने संपर्क कट (बंद) केला.
२. आधारकार्ड ‘लिंक’ केल्यानंतर संपर्क
मी माझे आधारकार्ड भ्रमणभाष क्रमांकाशी ‘लिंक’ (जोडले) केले. त्यानंतर साधारण २-३ दिवसांत माझे ‘ए.टी.एम्.’ (अधिकोषातील पैसे काढण्यासाठीचे एक कार्ड) ज्या अधिकोषाचे आहे, त्या अधिकोषातून मला संपर्क आला. त्यांनी मला ‘तुमच्या खात्याला काही अडचण आली आहे. तुम्हाला ‘केवायसी’ (नो युवर कस्टमर – ग्राहकाची सत्यता पडताळणीची पद्धत) करावे लागेल आणि आता मी पाठवत असलेल्या लिंकवर अन् सांगितल्याप्रमाणे ते करावे लागेल’, असे सांगितले. मला काहीतरी गडबड वाटली; कारण मी आधारकार्ड भ्रमणभाष क्रमांकाशी जोडले आणि अधिकोषातून संपर्क आल्याने मी व्यक्तीला थेट सांगितले, ‘‘ठीक आहे, मी पोलिसांना संपर्क करतो आणि त्यांना तुमचा क्रमांक देतो, जेणेकरून मला तुम्ही योग्य असल्याचे निश्चिती होईल.’’ असे बोलल्यावर तो शिव्या देऊ लागला. ‘तुला बघून घेऊ’, असे सांगून त्याने संपर्क कट केला. यातून तो एक बनावट अधिकोष कर्मचारी होता आणि त्याने माझ्याकडे थेट खात्याचा तपशील मागून त्याला खात्यातून पैसे काढायचे होते, हे माझ्या लक्षात आले.
३. आधारकार्डचा पत्ता पालटल्यावर त्या कार्डमध्ये गडबड झाल्याचे सांगणे
मी माझ्या आधारकार्डचा जुना पत्ता पालटून नवीन पत्ता पालट करून घेतला. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी मला एक संपर्क आला. ती व्यक्ती म्हणाली, ‘तुम्ही सुरेश सावंत ना ? तुमचे कार्ड अद्ययावत् करण्याची ‘रिक्वेस्ट’ मिळाली आहे, तुम्हाला सहकार्य करायचे आहे. तुमच्या प्रक्रियेत काहीतरी गडबड झाली आहे. ते नीट करावे लागेल. तुमच्या खात्याच्या तपशील पाठवा.’ तेव्हा हा काहीतरी फसवणुकीचा प्रकार आहे, हे माझ्या लक्षात आले. त्यांना ‘मी सुरेश सावंत नाही, ‘राँग नंबर’ (चुकीचा संपर्क) आहे’, असे सांगून तो संपर्क ठेवला.
४. ‘डिजिटल मार्केटींग’ आस्थापनाकडून संपर्क
एकदा एक संपर्क आला. तेव्हा समोरील महिलेने ‘मी एका डिजिटल मार्केटींग आस्थापनाची व्यवस्थापक आहे. तुमचे विविध ठिकाणांना भेटी दिल्यावर गूगलवर चांगला अभिप्राय (रिव्ह्यू) देता. (आपण देशात, विदेशात कुठे प्रवासाला गेल्यावर भेट दिलेल्या ठिकाणाचे (‘लाेकेशन’चे) ‘गूगल’ संकेतस्थळाच्या यंत्रणेमुळे त्यांना कळते. त्या ठिकाणची माहिती आपली इच्छा असेल, तर गूगलकडून उपलब्ध करण्यात असलेल्या ऑनलाईन आवेदनामध्ये आपण भरू शकतो आणि संबंधित जागेच्या ठिकाणी सुविधा, सोयी यांनुसार या जागेला ‘वाईट ते पुष्कळ चांगले’, असे काही मानांकन आपण देऊ शकतो. आपला अभिप्राय आणि त्या ठिकाणची अन्य सविस्तर माहिती अनेक स्थळे, ठिकाणे यांसाठी दिल्यावर गूगलकडून आपल्याला पुढच्या पुढच्या टप्प्याचा ‘बॅज’ (श्रेणी) दिला जातो.) आमचाही हॉटेलचा ‘ग्रुप’ आहे. तुम्ही असे अभिप्राय आमच्या हॉटेलच्या साखळीसाठी दिले, तर तुम्हाला सहस्रो रुपये देऊ’, असे सांगितले. असे संपर्क काही महिन्यांआड ‘व्हॉट्सॲप’ संदेश आणि ‘टेलिग्राम’ सामाजिक माध्यम यांद्वारे येऊ लागले. एकदा नेमकी ही काय भानगड आहे ? तिचा शोध घेऊया म्हणून मी एकाला त्यांच्यासोबत काम करण्याचे मान्य केले.
एक ‘डिजिटल मार्केटिंग’ आस्थापन ‘ॲमेझॉन’साठी (ऑनलाईन शॉप) काम करते. त्यांचे एकूणच संकेतस्थळावरील स्वरूप काही प्रमाणात योग्य वाटल्याने मी त्यांना होकार कळवला. त्यात त्यांनी काही ‘टास्क’ (पूर्ण करायची कामे) दिल्या होत्या. त्या एकदम सोप्या वाटल्या. त्या मी सहज करून पाहिल्या आणि त्यांनी त्वरित पैसे पाठवले, म्हणजे या टप्प्यापर्यंत काही गडबड वाटली नाही. त्यांच्या टेलिग्रामच्या चॅनेलमध्ये माझ्याप्रमाणे अनेक लोक कार्यरत असल्याचे ऑनलाईन दिसले. नंतर त्यांनी पुढच्या टप्प्याचे काम सांगितले. त्यात मला काही गडबड आणि संशय वाटत होता. ते काम असे होते, ‘ॲमेझॉनच्या डिलरला मोठी खरेदी करण्यासाठी काही पैसे गुंतवा आणि गुंतवलेल्या रकमेनुसार पैसे काही मिनिटांत दुप्पट, तिप्पट करून मिळवा.’ हे ‘टास्क’ काही मिनिटांसाठी म्हणजे ५ मिनिटांत पूर्ण करायचे होते. या ‘टास्क’मध्ये मात्र मी सावध होऊन २ दिवस सहभागी झालो नाही. यामध्ये सहभागी अन्य व्यक्ती त्यांनी पैसे गुंतवल्यावर त्यांना किती रक्कम दुप्पट, तिप्पट या प्रमाणात पैसे मिळाले, असे त्यांनी टेलिग्रामच्या गटावर कळवले. एखादा ‘एवढे झटपट पैसे मिळतात, तर त्वरित मोठी रक्कम गुंतवूया, असा विचार करून गुंतवेल’, अशी त्यामध्ये वातावरण निर्मिती केलेली असते. या कोण व्यक्ती आहेत ? आणि एवढ्या लाखो रुपयांचा व्यवहार कसा सहज करत आहेत ? याचा शोध घेऊ लागलो. त्यांचे प्रोफाईल (म्हणजे व्यक्तीची माहिती) पडताळली, तेव्हा व्यक्ती संशयास्पद वाटू लागल्या. या सर्व व्यक्तींसह मी एका ‘ग्रुप’मध्येच होतो. त्या ग्रुपवर त्या व्यक्तींशी या टास्क खर्या कि खोट्या, हे मी विचारू शकत नव्हतो. त्यामुळे प्रत्येकाला वैयक्तिक ‘मेसेज’ करून (संदेश पाठवून) नेमके त्या कोण व्यक्ती आहेत ? याची चाचपणी करू लागलो, तेव्हा त्यांच्याकडून काही प्रतिसाद नव्हता.
आस्थापनाचे बोधचिन्ह (लोगो) वगैरे नीट निश्चिती केल्यावर ते ‘ॲमेझॉन’चे असले, तरी ते संशयास्पद वाटले. त्यातील सहभागी लोक आणि अन्य सर्वच संशयास्पद वाटू लागले आणि त्यांच्यात नंतर सहभागी होण्याचे टाळले. या डिजिटल आस्थापनाची व्यवस्थापक मला वारंवार ‘तुम्ही या ‘टास्क’मध्ये सहभागी व्हा, अन्यथा तुम्हाला या ग्रुपमधून काढतील’, असे सांगत होती. तरी मी तिला काही कारणे सांगून सहभागी होण्याचे टाळले. नंतर लक्षात आले की, २ दिवसांत तो पूर्ण ‘टेलिग्राम’ माध्यमाचा गटच दिसेनासा झाला, म्हणजे तो गट आणि आस्थापन बनावट होते, असे त्यातून लक्षात आले.
ऑनलाईन घोटाळा करणार्यांची मोठी टोळी कार्यरत असून लोकांना फसवण्यासाठी एकत्रित मिळून ‘ट्रॅप’ (फसवण्याची योजना) करतात, असे लक्षात आले. ही फसवणूक डिजिटल स्वरूपात असते. असे गट प्रारंभी तुम्ही केलेल्या छोट्या कामांचे पैसे देतात, नंतर त्यावर विश्वास ठेवून लोक त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृती करू लागतात आणि जेव्हा त्वरित मोठ्या परताव्यासाठी मोठी रक्कम गुंतवतात, तेव्हा ती रक्कम घेऊन आस्थापनाचा गट व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम या माध्यमांवर दिसेनासा होतो. त्यामुळे कुणाविरुद्ध तक्रार करण्याचीही काही सुविधा नाही; कारण नावे, आस्थापन, त्यांची प्रक्रिया हे सर्वच बनावट असते. हासुद्धा घोटाळा करण्याचा नवीन प्रकार आहे. देवाच्या कृपेने हा एक मोठा प्रकार लक्षात आला आणि संबंधितांच्या जाळ्यात जाऊन सुखरूपपणे त्यांच्या कोणत्याही आमिषाला न भुलता अनुभव घेऊन बाहेर आलो.
५. बँक खाते जोडण्यासाठी बँकेकडून संदेश
एकदा माझ्या वडिलांना खात्याची सत्यता पडताळण्यासाठी बँकेकडून काही संदेश आले होते. तेथे एक ‘लिंक’ देऊन त्यावर माहिती अद्ययावत् करण्यासाठी त्याद्वारे सांगण्यात आले होते. ‘ही लिंक काय आहे ? बँकेतून असा संदेश का पाठवला आहे ?’, हे विचारण्यासाठी जेव्हा आम्ही बँकेत गेलो, तेव्हा ‘बँकेने ती लिंक आम्ही पाठवली नाही’, असे सांगितले. तो संदेश मी पाहिला नव्हता, तो जेव्हा प्रत्यक्ष पाहिला, तेव्हा तो बनावट संदेश असल्याचे माझ्या पूर्वानुभवातून लक्षात आले.
६. अधिकोष आणि अन्य तपशील यांसाठी येणार्या संपर्काविषयी सावधगिरी बाळगणे !
अधिकोष आणि अन्य आस्थापने यांच्याकडून आलेल्या प्रत्येक संपर्काकडे संशयाने पाहिल्याविना तेवढी सावधगिरी बाळगली जात नाही. मुख्य म्हणजे आपण जे काही काम अधिकोष, आपली विविध ओळखपत्रे यांच्या संदर्भात केलेली असतात, त्याला धरून हे संपर्क येतात. त्यामुळे आपली त्याविषयी निश्चिती होते. फसवणार्या व्यक्तींचा एक समूह यामागे कार्यरत असतो, तसेच गूगलद्वारे आपला ठावठिकाणा त्यांना आढळतो. बँक व्यवहार किंवा अन्य ऑनलाईन व्यवहार यांविषयी संबंधित आस्थापनाने कितीही सुरक्षेची हमी दिली, तरी हे व्यवहार किंवा आपला संपर्क यांवर ‘डिजिटल’ चोर किती लक्ष ठेवून असतात, हे वर दिलेल्या उदाहरणांतून लक्षात येते. सध्या भाजी खरेदीपासून ते जेवण मागवणे, पैशांचे व्यवहार ऑनलाईनच करण्याकडे लोकांचा कल अधिक आहे, त्यामुळे ऑनलाईन मार्गात असे चोर दबा धरून बसलेले असतात. ते तुम्हाला संपर्क करून किंवा संदेश पाठवून खडा टाकून पहातात की, तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकत आहात कि नाही ? असा प्रयत्न ते २-३ वेळा करतात आणि तरी तुम्ही नाही सापडलात, तर पुढची व्यक्ती निवडतात.
असे संपर्क येतात किंवा संदेश येतात, तेव्हा व्यक्ती वेगळ्या मानसिकतेत, तिच्या कामात असते. त्यामुळे आवश्यक तो संशय घेतला जात नाही आणि सावधगिरीही बाळगली जात नाही. त्यामुळे व्यक्ती त्यामध्ये अडकते.
यामध्ये पूर्वी ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ नावाचा ऑनलाईन खेळ होता, त्यावर आता बंदी घालण्यात आली असली, तरी हा खेळ म्हणजे विविध धोकादायक ‘टास्क’ (लक्ष्य) देऊन ते पूर्ण करण्यासाठी मुलांना प्रवृत्त केले जाते. स्वत:ची इच्छा नसूनही या खेळामध्ये अशा प्रकारे वातावरण निर्मिती केलेली असते की, व्यक्ती त्यात अडकत जाऊन ते धोकादायक ‘टास्क’, उदा. ‘रात्री १२ वाजता घराबाहेर पडून फिरून या’, ‘उंच इमारतीच्या गच्चीच्या भिंतीवरून चाला’ इत्यादी पूर्ण करण्याच्या मागे लागते आणि त्यात जीव गमावून बसते.
येथे ऑनलाईन फसवणुकीचे विविध प्रकार नेमके कसे असतात ? ते लक्षात येण्यासाठी काही उदाहरणे दिली आहेत. यात ‘डिजिटल अरेस्ट’चा एक मोठा प्रकार नव्याने सहभागी झाला आहे. याविषयी विस्ताराने लवकरच जाणून घेऊया.
७. साधनेच्या अंगाचे महत्त्व
एकूणच ही सर्व फसवणूक ‘डिजिटल’ म्हणजेच सूक्ष्म स्तरावरची आहे. त्या ठिकाणी मन, बुद्धी शाबूत ठेवून असे विषय हाताळण्यासह आध्यात्मिक अंग, म्हणजे सूक्ष्म स्पंदने जाणवणे, हा मोठा भाग आहे; कारण समोर व्यक्ती कोण आहे ? बनावट कि खरी आहे ? कुणाशी बोलतो अथवा व्यवहार करतो, हे काहीच कळायला मार्ग नसतो. अशी सूक्ष्म स्पंदने जाणवणे, हे केवळ साधनेनेच शक्य आहे. साधना केल्यावर अशा प्रसंगांमध्ये आधीच काहीतरी गडबड आहे, असे जाणवले की, नंतर ती गडबड कशी आहे ? काय आहे ? हे समजून घेण्यासाठी मन-बुद्धीचे प्रयत्न चांगल्या प्रकारे करता येतात. एकूणच सध्याच्या या फसवणुकीच्या नवनवीन प्रकारांत अडकण्यापासून वाचण्यासाठी भगवंताचे साहाय्य घेणे आवश्यक आहे.
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (११.१२.२०२४)
संपादकीय भूमिका‘ऑनलाईन’ फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार आणि पोलीस यांनी तात्काळ कठोर पावले उचलणे आवश्यक ! |
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |