‘प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) सर्वज्ञ आणि आदर्श आध्यात्मिक गुरु आहेत’, याविषयी त्यांच्या सत्संगांत मिळालेली शिकवण !
‘मागील प्रति रविवारी झालेल्या ३ भागांत मी ‘माझ्याकडून साधना चालू होणे आणि आतापर्यंत मी साधनेत टिकून रहाणे’, यांचे कारण म्हणजे प.पू. बाबांच्या संबंधीची मला वाटलेली मूलभूत सूत्रे थोडक्यात मांडली आहेत. त्यासोबत ‘काही प्रसंग, उदाहरणे, तसेच मनात झालेली प्रक्रिया मांडली, तर ‘ती सूत्रे स्पष्ट होणे साहाय्यभूत ठरेल’, असे मला वाटते. प.पू. बाबांच्या देहत्यागानंतरही त्यांच्या उपदेशांचे कधी कधी माझ्याकडून चिंतन होते आणि त्यातून केवळ साधनेसाठी प्रयत्न करायला उभारी येते, असे नव्हे, तर कधी कधी त्या सूत्रांतून एखादा नवा बोध आपोआप मिळतो. त्यामुळे पुढील लिखाण करत आहे.
या लेखमालेच्या अंतिम भागात ‘अध्यात्मात तत्त्व एकच असणे ’ ‘गुरु’ या विषयावर प.पू. बाबांनी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे, व्यावहारिक आशीर्वाद देत नसणे आणि प.पू. बाबांनी सांगितलेल्या उणिवा हे विषय येथे पाहूया.
१४. प.पू. बाबांनी म्हटलेले वाक्य अनेक वर्षांनी प.पू. डॉक्टरांनीही उद्गारणे आणि ‘तत्त्व एकच आहे’, असे सांगणे
‘तुम्हाला काही हवे ते मागा’, असे प.पू. बाबांनी विचारण्याचा प्रसंग झाल्यानंतर काही काळानंतर प.पू. बाबा म्हणाले, ‘‘तुम्ही या देहाचे डॉक्टर आहात, तर मी तुमच्या आत्म्याचा डॉक्टर आहे !’’ हे वाक्य मी कुणाला सांगितले नव्हते. काही वर्षांनी रामनाथी, गोवा येथील आश्रमात प.पू. डॉक्टरांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ते मला हेच वाक्य म्हणाले. त्या वेळी मी त्यांना प.पू. बाबांनी म्हटलेले वाक्य सांगितले. यावर प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘तत्त्व एकच आहे !’’
१५. ‘गुरु’ या विषयावर बोलतांना प.पू. बाबांनी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
अ. एकदा मी गप्प असतांना अकस्मात् प.पू. बाबा म्हणाले, ‘‘गुरु नको’, असे म्हणणार्यांना ‘गुरूंची आवश्यकता नाही’, हे कुणाकडून तरी कळावे लागतेच ना ?’’ त्या वेळी त्यांनी मला हे दोनदा सांगितले.
आ. एकदा प.पू. बाबांच्या सान्निध्यात असतांना माझ्या मनात ‘खर्या गुरूंची लक्षणे कोणती ? ती यांच्यात आहेत का ?’, असे विचार आले होते. तेव्हा प.पू. बाबा म्हणाले, ‘‘आमच्या गुरूंच्या कृपेने आम्ही कोणत्याही क्षणी परीक्षेला सिद्ध आहोत. तुम्ही ६ मासांतून किंवा वर्षातून एकदा परीक्षेला बसता. आमची कधीही परीक्षा घ्या, आम्ही सिद्ध आहोत !’’
हे ऐकल्यावर ‘गुरूंची लक्षणे पहाणे’ हा विचार माझ्या मनातून निघून गेला. त्यांच्या या वाक्याने मला नेहमी स्वामी विवेकानंद यांनी प.पू. रामकृष्ण परमहंस यांच्या बिछान्याखाली एक रुपया ठेवून केलेला प्रयोग स्मरायचा.
(विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांची घेतलेली परीक्षा ! : रामकृष्ण परमहंसांनी प्रथम भेटीतच विवेकानंदांच्या डोक्यावर हात ठेवून ‘त्यांचे भान हरपून जाईल’, अशी अनुभूती त्यांना दिली होती. त्यानंतर विवेकानंद त्यांच्या गुरूंकडे नियमित जाऊ लागले. एकदा रामकृष्ण म्हणाले, ‘‘मला धनाची ‘ॲलर्जी’ आहे. मी त्याला स्पर्शसुद्धा करू शकत नाही.’’ विवेकानंदांनी परीक्षा घेण्याकरता गुरूंच्या अपरोक्ष एक रुपया त्यांच्या बिछान्याखाली ठेवला. नंतर गुरु बिछान्यावर बसले, तर लगेच त्यांना वेदना होऊ लागल्या. ते अस्वस्थ झाले आणि ओरडू लागले. त्यांनी बिछाना बाजूला केला, तर खाली रुपयाचे नाणे होते. त्यांनी ‘हे येथे कुणी ठेवले ?’ असे विचारले. तेव्हा विवेकानंदांनी कारण सांगितले. त्यावर रामकृष्ण परमहंस म्हणाले, ‘‘नरेंद्र, तू योग्य केलेस. कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास ठेवू नका, परीक्षा घ्यावी !’’)
१६. कुणाला मार्गदर्शन करतांना साधकाला प.पू. बाबांचे नित्य स्मरण होणे
एकदा प.पू. बाबा म्हणाले, ‘‘तुम्ही ‘गुरु’ बनायचा प्रयत्न करू नका, ‘शिष्य’ बना !’’ (हे सांगितल्यावर प्रसारात अथवा अन्यत्र कुणाला काही मार्गदर्शन करण्यासाठी प.पू. बाबांच्या कृपेने त्या आसंदीवर बसल्यावर मला प.पू. बाबांचे स्मरण नित्य होत राहिले.)
१७. प.पू. बाबांनी ‘तू शेवटपर्यंत प.पू. डॉक्टरांच्या समवेत रहा’, असे सांगणे आणि त्यांच्या या सांगण्याचा पूर्णकालीन साधक होण्याच्या निर्णयात मोठा वाटा असणे
अ. प्रथम दर्शनाच्या वेळी प.पू. बाबा बोलता बोलता म्हणाले, ‘‘तू शेवटपर्यंत डॉक्टरांच्या सोबत रहा !’’
आ. प.पू. बाबा त्यांच्या देहत्यागाच्या आधी ९.११.१९९५ ला गोव्यात आले होते. आम्ही सर्व सांगलीहून गोव्यात आलो. परत जातांना ते एकटेच विमानाने गेले. आम्ही त्यांच्या सोबत विमानतळावर गेलो. तेथे एका मर्यादेच्या पुढे आम्ही कुणी जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे सर्व जण तेथेच थांबलो. जवळपास ५० मीटर अंतर प.पू. बाबा आणि प.पू. डॉक्टर प्रवेशद्वाराच्या दिशेने गेले. अकस्मात् प.पू. बाबा परत आले आणि माझ्या समोर उभे राहिले. मला इथपर्यंतचेच स्मरते. नंतर मी भानावर आलो. तेव्हा प.पू. बाबा प्रवेशद्वारातून आत जात होते. ‘त्या वेळी काय घडले ?’, ते सौ. नंदिनीने नंतर मला सांगितले. ती म्हणाली, ‘‘तुमचे लक्ष कुठे होते ? नुसते मख्ख उभे होतात. प.पू. बाबा तुमच्या समोर आले आणि तुम्हाला म्हणाले, ‘‘शेवटपर्यंत डॉक्टरांच्या सोबत रहा !’’
प.पू. बाबांच्या या सांगण्याचा माझ्या पूर्णकालीन होण्याच्या निर्णयात मोठा वाटा आहे.
१८. प.पू. बाबांनी पहिल्या दर्शनभेटीच्या वेळीच ‘ते कसलेही व्यावहारिक आशीर्वाद देत नाहीत अन् त्यांना चमत्कार करता येत नाहीत’, असे स्पष्टपणे सांगणे
प.पू. बाबांनी पहिल्या दर्शनभेटीच्या वेळीच दर्शनार्थींना स्पष्टपणे सांगितले होते, ‘‘मी कसलेही व्यावहारिक आशीर्वाद देत नाही. मला चमत्कार करता येत नाहीत. माझ्या हातातून उदी निघत नाही. तुम्ही तसल्या काही इच्छा बाळगून माझ्याकडे आला असाल, तर येथे येऊन उगाच वेळ घालवू नका.’’ हे सूत्र प.पू. बाबांनी पुढील प्रसंगांत अधिक सुस्पष्ट केले.
१८ अ. एका शेतकर्याने व्यावहारिक कामांसाठी पुनःपुन्हा आशीर्वाद मागितल्यावर प.पू. बाबांनी त्याचे न ऐकता त्याला ‘जा’ म्हणून सांगणे : एकदा कुरुंदवाड (जि. कोल्हापूर) येथून प.पू. बाबांना भेटायला एक शेतकरी आला होता. त्याने प.पू. बाबांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला. चरण न सोडता तो प.पू. बाबांना म्हणाला, ‘‘तुमच्या कृपेमुळे न्यायालयात माझ्या बाजूने निकाल होऊन दुसर्याने घेतलेली अडीच एकर भूमी मला परत मिळाली.’’ प.पू. बाबा म्हणाले, ‘‘छान आहे.’’ त्यावर तो पुढे म्हणाला, ‘‘तुम्ही चार वर्षांपूर्वी ‘काम होईल’, असे सांगितले होते. त्यामुळे तुमच्या आशीर्वादामुळे हे झाले.’’ प.पू. बाबा म्हणाले, ‘‘छान आहे.’’ तो पुढे म्हणाला, ‘‘बाबा, अजून माझी साडेतीन एकर भूमी अडकलेली आहे. ‘ती मिळेल’, असा मला आशीर्वाद द्या !’’ तेव्हा प.पू. बाबा त्याचे काही न ऐकता त्याला ‘जा’ म्हणून सांगू लागले. ‘तो आपला हट्ट सोडत नाही’, हे पाहून प.पू. बाबा त्याच्यावर चिडले. त्याला त्यांनी शिव्या घातल्या. मग बाकीच्या भक्तांनी त्याला बाहेर नेले.
१८ आ. व्यावहारिक कामांसाठी आशीर्वाद मागायला आलेल्यांना प.पू. बाबांनी ‘हो’ म्हणणे, म्हणजे ‘तुमचे प्रारब्ध भोगून संपवा’, असे सांगणे आणि ईश्वरप्राप्तीची तळमळ असलेल्या व्यक्तीची तळमळ मात्र त्यांनी वाढवणे : या प्रसंगात मी प.पू. बाबांच्या पाठीमागे उभा होतो. ते रागावलेले दिसत होते. तो माणूस बाहेर जाताच ते शांत झाले आणि मागे वळून माझ्याकडे पहात म्हणाले, ‘‘असले आशीर्वाद मागायला माझ्याकडे प्रतिदिन शेकडो माणसे येतात. मी सगळ्यांना ‘हो’ म्हणतो. माझा ‘हो’ म्हणजे ‘तुमचे प्रारब्ध भोगून संपवा’, असे म्हणतो. निदान या जन्मात जे प्रारब्ध घेऊन आला आहात, ते तरी भोगून संपवा, म्हणजे पुढचा जन्म जरा अधिक सोपा होईल ! बाकी मी असले आशीर्वाद देत नाही; मात्र एक, समोर आलेल्यांमध्ये ‘काही धुगधुगी आहे का ?’ ते मी पहातो. ‘धुगधुगी’ असेल, तर मात्र मी फुंकर घालतो. ते माझं काम आहे.’’ येथे ‘धुगधुगी’ याचा अर्थ मी ‘ईश्वरप्राप्तीची इच्छा किंवा तळमळ’ असा घेतला.
यातून ‘प.पू. बाबांच्या समोर जातांना मनात काय असायला हवे ?’ हे त्यांनीच सांगितल्यामुळे मला पुन्हा समजले. असे वाटले की, ‘आपल्यातील ईश्वरप्राप्तीची तळमळ विझू नये, यासाठी प.पू. बाबा किती करतात; परंतु साधनेत प्रगती करायची असेल, तर स्वतःलाच प्रयत्न करायला हवेत !’
१९. ‘साधकांच्या मनातील अयोग्य विचार दूर करणे’, हे गुरूंचे काम असून ‘ते करायला सद्गुरु फिरतात’, असे प.पू. बाबांनी सांगणे
तिसर्या भेटीच्या वेळी प.पू. बाबा म्हणाले, ‘‘नाम घेणे चालू केले की, त्याचे विष चढते आणि तुमच्यासारख्यांच्या मनात ‘प्रपंच सोडूया’, असे विचार येतात. ‘असे विष कसे उतरवायचे’, हे आम्ही सद्गुरुच जाणतो आणि त्यासाठी मी फिरतो.’’
प.पू. बाबा मला आध्यात्मिक स्तरावरील काही सांगत होते; पण मी ते समजू शकत नव्हतो. काही वेळाने ते म्हणाले, ‘‘माझ्या गाडीत पहा, सगळेच साहित्य असते. पिठापासून ते मिठापर्यंत सर्व असते ! मी सगळा संसार घेऊनच फिरतो.’’
प.पू. बाबांच्या प्रथम भेटीच्या वेळी मी त्यांना विचारले होते, ‘‘मी आता नामजप करत आहे. नामजप चालू केल्यापासून ‘बाकी प्रपंच कशासाठी करायचा ? आता सर्व सोडावे’, असे मला वाटत आहे, तर मी काय करावे ?’’ यावर प.पू. बाबा म्हणाले, ‘‘संसारात राहून साधना करा !’’ एकूण ‘लवकर प्रगती व्हायला हवी’, हा माझा उतावीळपणाचा विचार आणि ‘प्रपंच चालवायचा त्रास नको’, ही भावना यातून स्पष्ट झाली असावी. नामजपामुळे शांतपणा अनुभवल्यानंतर ‘आता सांसारिक त्रास नको’, अशी एकूण प्रपंचाविषयी काहीशी नकारात्मकता माझ्या मनात निर्माण झाली होती. त्याला उद्देशून प.पू. बाबा ‘असे म्हणाले असावेत’, असे मला वाटते.
२०. प.पू. बाबांनी साधकाला त्याच्यामधील उणिवा सांगणे
२० अ. प.पू. बाबांनी ‘तुमच्यात श्रद्धा नाही, वरवरची जिज्ञासा आहे’, असे साधकाला सांगणे : प.पू. बाबांच्या सान्निध्यात असतांना मनात नाम सोडून काही विचार आला आणि तो अधिक वेळ मनात राहून नाम खंडित झाले, तर प.पू. बाबा लगेच त्या विकल्पावर बोट ठेवायचे. हा अनुभव मला १ – २ वेळा आला. ५ – ६ भेटी झाल्यानंतर प.पू. बाबांनी माझ्यातील आणखी एक उणीव सांगितली. ते म्हणाले, ‘‘तुमच्यात श्रद्धा नाही, तर वरवरची जिज्ञासा आहे.’’
२० आ. प.पू. बाबांची अनुमती न घेता विवाहासाठी गेल्यावर त्यांनी ‘लग्न-मुंजी अशा कार्यक्रमांना जाण्यापेक्षा जेथे गुरु असतील, तेथेच जायचे असते’, असे सांगणे : प.पू. बाबांच्या एका भक्ताच्या मुलीचा विवाह कराड येथे झाला. त्या विवाहासाठी आम्हाला, तसेच अन्य साधकांना निमंत्रण होते. प.पू. बाबाही त्यासाठी इंदूरहून येणार होते. तसे ते रात्री येऊन ईश्वरपूर (सांगली) येथे थांबले. ‘ते नंतर कराड येथे येतील’, असे सगळ्यांनाच वाटत होते. आम्ही सांगलीहून कराडला गेलो. मुहूर्त झाला आणि प.पू. बाबांचा निरोप आला, ‘सांगलीच्या डॉक्टरांनी लगेच ईश्वरपूरला यावे.’ आम्ही चार घास खाऊन मिळेल ती गाडी पकडून ईश्वरपूर येथे थेट प.पू. बाबांकडे गेलो. तेथे आणखीही काही जण होते.
प.पू. बाबा कंबरेला लुंगी गुंडाळलेल्या अवस्थेत आतल्या खोलीतून बाहेर आले आणि माझ्यावर मोठ्या आवाजात ओरडू लागले, ‘‘तुम्हाला लग्नाला जायला कुणी सांगितले ? येथेच यायचे. तिकडे तुमचे काय काम ? गुरु आले की, तेथेच जायचे असते. मी काय लग्न-मुंजी करायला फिरतो का ? त्यासाठी इंदूरहून येत असतो का ?’’ माझी बोलतीच बंद झाली. ‘आम्ही कराडला जाण्यापूर्वी किमान ईश्वरपूर येथे उतरून प.पू. बाबांची अनुमती घेऊन जायला हवे होते’, हे लक्षात आले. मी त्यांची क्षमा मागितली.’ (समाप्त)
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०२४)