देवाभाऊंचे त्रिवार अभिनंदन ! पण सावधान, खरा धोका पुढे आहे !!
‘मी पुन्हा येईन’चा (वर्ष २०१९ मध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या वेळी दिलेली घोषणा) अध्याय एका ‘ब्रेक’नंतर ‘मी पुन्हा आलो’मध्ये रूपांतरित झाला आहे. ५ डिसेंबर २०२४ पासून ‘पुन्हा केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’, असे चित्र निर्माण झाले आहे.
देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी तिसर्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि समस्त पुरोगामी, जातीवादी, अराजकतावादी कंपूंना ४२० ‘व्होल्ट’चा धक्का मतदारांनीच दिला. ज्या विरोधकांनी ‘राज्यघटना धोक्यात आहे’, असे खोटे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) ठरवत लोकसभेत हिंदुत्वनिष्ठ पक्षांना थोडे मागे सारले होते. त्या काँग्रेसी महाआघाडीला मतदारांनी विधानसभा निवडणुकीत त्यांची खरी जागा दाखवली आणि हिंदुत्वाचा नारा देणार्या देवेंद्र फडणवीसांच्या महायुतीला स्वप्नवत बहुमत देत सत्तेवर आणत लोकसभा निवडणुकीच्या वेळी फसवणुकीतून झालेली घोडचूक सुधारली. खरेतर त्यामुळेच प्रचारात ‘देवाभाऊ’ म्हणून गाजलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे दायित्व अधिक वाढले.
१. वर्ष २०१९ ची राजकीय स्थिती आणि आताची स्थिती
लोकांनी आता ‘हिंदुत्वाचा चेहरा’ म्हणून देवाभाऊंकडे पहाण्यास प्रारंभ केले आहे. वर्ष २०१४ मध्ये फडणवीस यांना भाजपने मुख्यमंत्रीपद देऊन त्यांच्या क्षमतेला वाव दिला होता. वर्ष २०१९ मध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी मतदारांनी महायुतीला दिलेल्या कौलाला नाकारत आणि हिंदुत्वाला दूर सारत मुख्यमंत्रीपद घेतले अन् फडणवीसांना जनतेने दिलेल्या मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवले होते. २५ वर्षे सत्तेत रहाण्याचा दावा करणार्यांना २५ मासानंतरच एकनाथ शिंदेंसारख्या बाळासाहेबांच्या मुशीत सिद्ध झालेल्या हिंदुत्वनिष्ठ शिवसैनिकाने ४० आमदारांना समवेत घेऊन धडा शिकवला आणि महाविकास आघाडीला सत्तेतून खाली खेचले. अर्थात् त्या वेळी देवेंद्र फडणवीस राजकीय तडजोडीतून उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतरचा अडीच वर्षांचा काळ तसा कसोटीचाच राहिला. लोकसभेत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्याचे संपूर्ण उत्तरदायित्व घेत फडणवीसांनी त्यागपत्र देण्याची घोषणाही केली; परंतु पक्षाने विश्वास दाखवत नव्या लढ्याची स्फूर्ती दिली आणि त्यांनी विधानसभेत जनतेच्या आशा पुनरुज्जीवित करत महाकाय असा विजय संपादित केला. त्याचे फळ म्हणूनच आता त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आड येण्याचा कुणी किती प्रयत्न केला, तरी ते शक्य झाले नाही.
परंतु देवाभाऊ, ‘आता खरा धोका पुढे आहे’, हे तुम्ही जाणून असालच, तरी तुम्हाला सावध करण्याचे दायित्व तमाम हिंदुत्वनिष्ठ मतदारांच्या वतीने आमचे आहे, असे समजतो. आजवर तुमच्यावर विरोधकांनी अत्यंत हीन पातळीचे आरोप केले. तुमची पत्नी, शरीर यांवरून नको नको त्या टीका झाल्या. जातीवरून तर तुम्ही कायमच लक्ष्य राहिला, तरी तुम्ही कधीच डगमगला नाही आणि तुमची पातळी कधी सुटली नाही, हेच तुमचे उच्च संस्कार आहेत. त्या सर्वांना आता तुमच्या वतीने लोकांनीच बहुमतरूपी उत्तर दिले आहे.
२. खरे शकुनी ओळखा !
महाराष्ट्रात कपटी राजकारणाचे मेरूमणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांना आजवर न भेटलेला खेळाडू तुमच्या रूपाने भेटला. तुम्ही त्यांचे साडेतीन जिल्ह्याचे राजकारण आता बारामती लोकसभा मतदार संघापुरते मर्यादित केले आहे. जेमतेम १० आमदारांवर आलेला पक्ष पुरता गळपटला, असे जरी वाटले, तरी काळजी घ्याच. कारगिल युद्धावर आधारित ‘लक्ष्य’ या चित्रपटात सैन्यातील आचार्याची भूमिका वठवतांना अभिनेते ओम पुरी यांचा एक संवाद आहे. तो आचारी अभिनेते हृतिक रोशनला सांगतो, ‘पाकडे घाबरून पळून गेले, तरी नंतर पुन्हा वळून येतात आणि भ्याड आक्रमण करतात, हे लक्षात ठेव.’ त्याप्रमाणे हृतिक रोशन काळजी घेतो आणि फिरून आलेल्या पाकड्यांना गोळ्या घालत शिखर पादाक्रांत करतो’, असे चित्रपटात दाखवले आहे. हा संवाद तुम्हीही लक्षात ठेवा, ‘तुमच्या अवतीभोवती ‘पाकडे’ नाहीत; पण ‘पवार’ आहेत, याचे भान ठेवा.’
३. जातीवादाचे ‘टूलकिट’
(टीप : टूलकिट : एखाद्या प्रकरणात मोठ्या स्वरूपाची आंदोलने करतांना त्याचा एक कृती कार्यक्रम सिद्ध केला जातो. आंदोलन आणखी पुढच्या टप्प्यावर नेणे वा तीव्र करणे यांच्या उद्देशाने हा कार्यक्रम सिद्ध केला जातो, त्याला ‘टूलकिट’ असे म्हटले जाते.)
खरेतर तुम्ही मराठा जातीच्या लोकांना न्यायालयात टिकलेले आरक्षण दिले होते. राजकीय स्वार्थात माखलेल्या विरोधी नेत्यांच्या खोट्या कथानकाला फसलेल्या भोळ्या मराठा समाजाच्या गैरसमजापोटी तो प्रश्न आजही चिघळत पडला आहे. आता पुन्हा जरांगेसदृश्य प्रवृत्ती जुन्याच ‘गॉडफादरां’च्या (पालकत्वांच्या) आशीर्वादाने उचल घेतील. आमरण (कधीही न मरणारे) उपोषण, आंदोलनांसह तुम्हाला ‘टार्गेट’ (लक्ष्य) करण्याचे ‘टूलकिट’ सक्रीय होईल. मराठासह ओबीसी, धनगर, आदिवासी आदी समाजातही धुसफूस वाढवण्याचे उद्योग होतील. त्याची योग्य ती काळजी तुम्ही घ्यालच. त्यासाठी तुमच्यासह असलेल्या २ मराठा उपमुख्यमंत्र्यांचेही साहाय्य होईलच, तरी हा मुद्दा तुमच्यासाठी ‘गले की हड्डी’ बनणार नाही, एवढे बघा !
४. विकासविरोधकांचे आव्हान
महायुतीच्या नव्या प्रकल्पांना विविध कारणांपोटी विरोधाचे राजकारण वाढेलच. त्यात वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, ऊर्जा प्रकल्प, रस्ते-उड्डाण पूल आदी सर्व प्रकल्प रडारवर आहेत आणि रहातीलच. तुमच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे निघालेला लाल झेंड्याच्या नेतृत्वाखालचा शेतकरी मोर्चा आठवत असेलच. शेतकर्यांच्या नावाखाली तसे प्रयत्न पुन्हा होतील, हे काही वेगळे सांगायला नको. आता तर हरलेल्या सहकारसम्राटांनी दुधाचे भाव पाडून त्याची पेरणीही चालू केली आहे, हे लक्षात घ्या. ‘शेतमालाच्या भावावरूनही पुन्हा आंदोलने चालू झाली, तर नवल नाही; पण खर्या शेतकर्यांना लाभ मिळतील, विमा मिळेल’, याचे दायित्व शासनाचेच आहे आणि तुम्ही शासकीय झारीतील शुक्राचार्यांचाही बंदोबस्त कराल आणि पुढे वाट काढाल, अशी खात्री आहे; मात्र या सर्वांतून तुम्ही घोषणापत्रात दिलेली आश्वासने पूर्ण करणे अजिबात विसरू नका. अन्यथा लाडक्या बहिणींची ओवाळणी भारी पडू शकते आणि इतर योजना बंद न होता उर्वरित काळासाठी सुखनैव चालू राहतील, याची काळजी घ्या. राज्यावरील कर्जाचे दाखले देत दिवाळे काढले वगैरे आरोप तर होतीलच; परंतु ‘कर्ज असणे, हे वाढत्या क्षमतेचेच लक्षण असते’, असे अर्थशास्त्रच सांगते, हे जनतेला पटवून द्यावे लागेल. अर्थात् या सर्व योजना फलदायी ठरवण्यासाठी निधी लागणार आणि तो परदेशी, इतर गुंतवणुकींच्या माध्यमातून आणणे अशक्य नाही.
५. हिंदुत्ववाद विसरू नका !
यंदा लाडक्या बहिणींसह समस्त हिंदुत्वनिष्ठ मतदारांनी निवडून दिले आहे, हे कधीही विसरू नका. काळजीवाहू सरकारच्या काळात वक्फ बोर्डाला निधी देण्याचा शासन आदेश काढणार्यांच्या संगतीत तुम्ही आहात, हेही लक्षात ठेवा. यांच्यासारख्या घरभेद्यांना वेळीच शोधून, ठेचून तुम्हाला हिंदुत्वनिष्ठ मतदारांच्या मनातील निर्णय घ्यायचे आहेत. ‘कितीही विरोध झाला, कान भरण्याचा प्रयत्न झाला, तरी तुम्ही योग्य रस्ता सोडणार नाही’, अशी आमची अपेक्षा आहे. ‘हिंदुत्वनिष्ठ म्हटले की जातीयवादी’, हे खोटे कथानक पहिल्यांदा खोडून काढून यापुढे ‘हिंदुत्ववाद हाच खरा राष्ट्रवाद आहे’, असे ठासून सांगायला लागा. त्यासाठी अनेक संघटना, संस्था आपापल्या परीने कार्य करत आहेत. त्यांच्या पाठीवर थाप द्या. अनेकदा आर्थिक साहाय्य शक्य नसले, तरी केवळ सहकार्याची भूमिका घेतली पुरेसे होते. या संस्था, संघटना राष्ट्रवादाचा प्रसार, प्रचार अधिक प्रखरतेने करत असतात, त्यांचा वापर चांगल्या कार्यासाठी निश्चितपणे करून घ्या !
६. भाटांना सांभाळा !
राज्यशकट हाकतांना राजाच्या दरबारात सर्व प्रकारची मंडळी आवश्यक असतात. त्यात स्तुतीपाठकांपासून विदुषकांपर्यंत सर्वांचा समावेश होतो. राजेशाही संपून लोकशाही आली असली, तरी हे प्रकार वेगळ्या स्वरूपात कायम आहेतच. त्यामुळे खरे हितचिंतक कोण ?, हे तुम्ही ओळखालच. तरी वर्ष २०१४ च्या अनुभवांतून तुम्ही धडा घेऊन वर्ष २०२४ च्या सत्तेच्या टप्प्याचा प्रारंभ धडाकेबाजपणे कराल, हेच अभिप्रेत आहे ! (९.१२.२०२४)
– श्री. स्वप्नील सावरकर, संपादक, साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’.
(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’, मराठी)
संपादकीय भूमिकामहाराष्ट्रातील नव्या सरकारने ‘हिंदुत्ववाद हाच खरा राष्ट्रवाद आहे’, असे ठासून सांगत हिंदूहिताचे राजकारण करणे आवश्यक ! |