पुणे येथील सनातनचे १२५ वे संत पू. अरविंद सहस्त्रबुद्धे (वय ७७ वर्षे) यांचा देहत्याग !

पू. अरविंद सहस्रबुद्धे

पुणे, १४ डिसेंबर (वार्ता.) – परिपूर्ण सेवा करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या सतत अनुसंधानात रहाणारे, आनंदी, स्थिर अन् प्रेमभाव हा स्थायीभाव असणारे पुणे येथील सनातन संस्थेचे १२५ वे संत पू. अरविंद सहस्त्रबुद्धे (वय ७७ वर्षे) यांनी १४ डिसेंबर या दत्तजयंतीच्या दिवशी पहाटे ३.३९ वाजता देहत्याग केला. अल्पशा आजारामुळे ते रुग्णाईत होते. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती मंगला सहस्त्रबुद्धे, १ मुलगी, जावई, २ नातवंडे असा परिवार आहे. देहत्यागानंतर पू. काकांचा तोंडवळा पुष्कळ तेजस्वी दिसत होता. वातावरणातही अधिक प्रमाणात चैतन्य आणि शांतता जाणवत होती. पू. काकांच्या देहत्यागाच्या वेळी त्यांचे नातेवाईक, तसेच सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक आणि सनातन संस्थेचे अनेक साधक उपस्थित होते.

१. सतत आनंदी असणार्‍या पू. काकांनी वर्ष २०१३ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. ६ जुलै २०२३ या दिवशी पू. अरविंद सहस्त्रबुद्धे संतपदी विराजमान झाले होते.

२. पू. काकांच्या पत्नी श्रीमती मंगला सहस्त्रबुद्धे याही सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असून त्यांनी ६७ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.

३. पू. काका मागील १७ वर्षांपासून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ची सेवा अखंडपणे करत होते. पूर्वी पू. काकांच्या घरी अनेक संत आणि साधक अनेक वेळा वास्तव्याला राहिले आहेत. काका-काकूंमधील प्रेमभावामुळे ते साधकाचे आदरातिथ्य पुष्कळ आपलेपणाने करत असत.