US Clean Chit To Pakistan : अमेरिकेच्या जागतिक आतंकवादाच्या संदर्भातील अहवालात पाकिस्तानचे नाव नाही !

नवी देहली : अमेरिकेच्या प्रतिवर्षी सादर होणार्‍या ‘कंट्री रिपोर्ट ऑफ टेररिझम’ या जागतिक आतंकवादाविषयीच्या अहवालामध्ये पाकिस्तानचे नाव वगळण्यात आले आहे. यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भारत सरकारने अनेकदा पाकिस्तानवर आतंकवाद्यांना प्रशिक्षण, पैसा आणि साहाय्य करण्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानने आतापर्यंत भारतावर अनेक आतंकवादी आक्रमणे केली आहेत. अमेरिकेच्या आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये असे अनेक पाकिस्तानी आतंकवादी आहेत, ज्यांना अजून अटक झालेली नाही.

१. या अहवालामध्ये गेल्या काही दशकांपासून इराणला ‘आतंकवादाला प्रोत्साहन देणारा देश’ म्हणून सांगितले जात आहे. हिजबुल्ला, हमास आणि हुती या जिहादी आतंकवादी संघटनांना इराणचे सर्व प्रकारचे समर्थन असल्याने हे नाव घेतले जात आहे.

२. इराणव्यतिरिक्त सीरिया, उत्तर कोरिया आणि क्युबा यांसारख्या अन्य देशांनाही ‘आतंकवादाला प्रोत्साहन देणारे देश’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. इराणने अनेक आतंकवादी गटांना पैसा, प्रशिक्षण, शस्त्रे आणि उपकरणे पुरवली आहेत. त्यातून अनेक आतंकवादी आक्रमणे करण्यात आली. हमासकडून ७ ऑक्टोबर २०२३ ला इस्रायलवर आक्रमण करण्यात आला. त्यानंतर इराण समर्थित गटांनी त्यांचा उद्देश पुढे नेण्यासाठी संघर्षाचा लाभ उचलला असे यात म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

यातून अमेरिका किती विश्‍वासघातकी आहे, हे पुन्हा एकदा लक्षात येते ! एकीकडे ‘जगातील आतंकवादाच्या विरोधात आम्हीच तारणहार आहोत’, असे दाखवायचे आणि दुसरीकडे आतंकवादाला प्रोत्साहन देणार्‍या पाकला सोयीस्कररित्या पाठीशी घालायचे, असा दुटप्पीपणा अमेरिका करत आहे. अशा अमेरिकेसमवेत भारताने सतर्क रहाणेच आवश्यक आहे !