पुणे येथील ‘ससून रुग्णालया’तील औषधांची पडताळणी होणार !
पुणे – ‘ससून रुग्णालया’ला औषध पुरवठा करणारी आस्थापने वेगळी असली, तरी पुरवठादार एकच आहे. ‘विशाल एंटरप्रायजेस’कडून ‘ससून रुग्णालया’ला औषधांचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे रुग्णालयात ठेकेदारांकडून आलेल्या औषधांची चाचणी ‘अन्न आणि औषध प्रशासना’कडून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती ‘ससून’चे वैद्यकीय अधीक्षकांनी दिली. (रुग्णालयांमध्ये येणार्या औषधांची नियमित पडताळणी यंत्रणा कायमस्वरुपी असायला हवी, हे प्रशासनाला आतापर्यंत का समजले नाही ? – संपादक)
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील ‘स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालया’मध्ये बनावट औषधे पुरवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. (रुग्णांच्या जिवाशी खेळणार्या संबंधित ठेकेदारांवर कडक कारवाई होऊन त्यांना शिक्षा होणे अपेक्षित आहे ! – संपादक) त्यानंतर ‘ससून रुग्णालया’च्या प्रशासनाने काळजीचा उपाय म्हणून वरील निर्णय घेण्यात आल्याचे समजते. औषधांचा साठा, त्याची पडताळणी यांविषयी १० डिसेंबर या दिवशी आयुक्तांसह ऑनलाईन चर्चा करण्यात आली. या वेळी स्थानिक स्तरावर खरेदी केली जाणारी औषधे, पुरवठादार, संबंधित आस्थापने यांची माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार ‘ससून’ प्रशासनाने माहिती संकलित करून कार्यवाहीला प्रारंभ केल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.