पिंपरी-चिंचवडमध्ये (पुणे) बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्रे देणार्या टोळीला अटक !
पिंपरी (पुणे) – बनावट (खोटी) पोलीस पडताळणी प्रमाणपत्र (चारित्र्य सर्टिफिकेट) देणार्या टोळीचे कारनामे पिंपरी-चिंचवड आतंकवादविरोधी शाखेने समोर आणले आहेत. मध्यस्थ संदीप बनसोडे, सुनील रोकडे आणि त्याच्या साथीदारांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. ही टोळी आस्थापनांमध्ये काम करणार्या कामगारांकडून पैसे घेऊन त्यांना बनावट (खोटी) पोलीस पडताळणी प्रमाणपत्र पाठवत होती. (अशी खोटी प्रमाणपत्रे सहजरित्या उपलब्ध होणे हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे ! – संपादक)
पिंपरी-चिंचवड आतंकवादविरोधी शाखेचे पोलीस कर्मचारी सरकारी, सैन्य, तसेच खासगी आस्थापनांमध्ये काम करणार्या व्यक्तींची माहिती गोळा करत आहेत. दिघी येथील टी.सी.एल्. आस्थापनामध्ये काम करणारे वाहनचालक, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचार्यांची पोलीस पडताळणी प्रमाणपत्रांची पडताळणी करत होते. तेव्हा कामगारांकडे बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्रे आढळली. अशी ४१ प्रमाणपत्रे सापडली आहेत.
कामगार संबंधित आरोपींच्या भ्रमणभाषवर संपर्क करत होते. त्यांना आवश्यक कागदपत्रे भ्रमणभाषवरून पाठवीत. त्यानंतर १५ दिवसांमध्ये कामगाराच्या भ्रमणभाषवर पोलीस पडताळणी प्रमाणपत्र येत असे. ही प्रमाणपत्रे १ सहस्र २०० ते १ सहस्र ६०० रुपयांमध्ये मिळाली असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले. वर्ष २०२१ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीमध्ये आरोपींनी हा प्रकार केल्याचे समजते. (गेली ४ वर्षे हा प्रकार चालू असतांना पोलीस यंत्रणेच्या लक्षात कसे आले नाही ? पोलीस यंत्रणा झोपली होती का ? असा प्रश्न उपस्थित होतो. – संपादक)