समर्थ संप्रदाय यांचा प्रसार करणारे प.प. भगवान श्रीधरस्वामी !
परमहंस परिव्राजकाचार्य (प.प.) भगवान श्रीधरस्वामी यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…
समर्थांची मूर्ती पुनरपि जगी ही प्रगटली ।
जनोद्धारासाठी सतत फिरली दिनीतली ।
जयांच्या वास्तव्ये वरद नगरी होय वरदा ।
मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा ॥
१. प.प. भगवान श्रीधरस्वामी यांचा जन्म आणि समर्थ रामदासस्वामींचे दर्शन
प.प. भगवान श्रीधरस्वामी यांचा जन्म गाणगापूर येथील लाड चिंचोळी येथे वर्ष १९०८ मध्ये दत्त जयंतीच्या दिवशी झाला. स्वामींनी एकदा त्यांच्या प्रवचनात उल्लेख केला होता, ‘आम्ही मूळ गाणगापूर येथीचे असे.’ स्वामींच्या माता आणि पिता यांनी भगवान दत्तात्रेय यांची खडतर तपश्चर्या करून दत्तात्रेय यांचा मिळालेला प्रसाद, म्हणजे प.प. श्रीधरस्वामी यांचा जन्म.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी स्वामी पुण्यात आले, तेव्हा अध्यात्माची ओढ आणि आवड लहानपणापासूनच होती. तीच ओढ स्वामींना सज्जनगडला घेऊन आली. आध्यात्मिक साधनेसाठी स्वामींचे वर्ष १९२७ मध्ये गडावर आगमन झाले. सज्जनगडावर स्वामीजींनी साधनेसह समर्थ रामदासस्वामींची सेवा चालू केली. सज्जनगडावर साधनेसह सेवेलाही विलक्षण महत्त्व आहे. योगीराज कल्याणस्वामींनी समर्थांच्या सान्निध्यात सेवा करून चंदनाप्रमाणे स्वतःचा देह सद्गुरूंच्या चरणी झिजवला, त्यांच्या सेवेची आठवण पुन्हा श्रीधरस्वामी महाराजांनी करून दिली. ज्याप्रमाणे कल्याणस्वामींना समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन दर्शन दिले, त्याचप्रमाणे अवघ्या ३ वर्षांच्या सेवेत स्वामींना समर्थांनी वर्ष १९३० च्या दासनवमी दिवशी सगुण दर्शन देऊन दक्षिण भागात समर्थ विचारांचा प्रचार करण्याची आज्ञा केली. त्यांच्या आज्ञेप्रमाणे स्वामी पुढे कर्नाटकात गेले आणि पुढे पूर्ण कर्नाटकात स्वामींनी समर्थ संप्रदाय वाढवला. शिगेहल्ली येथे स्वामींनी संन्यास ग्रहण केला.
२. भारतभर हिंदु धर्म आणि समर्थ संप्रदाय यांचा प्रसार
मधल्या कालखंडात एक प्रकारचे ग्लानित्व आणि औदासीन्य संप्रदायाला आले होते. समर्थांचे समाधीस्थान सज्जनगड, त्याचप्रमाणे चाफळ, शिवथरघळ, तसेच समर्थांचे जन्मगाव जांब या ठिकाणांचाही विकास घडवून आणणे आवश्यक होते. प.प. श्रीधरस्वामी महाराज यांनी संपूर्ण भारत भ्रमण करून हिंदु धर्म आणि समर्थ संप्रदाय यांचा प्रसार अन् प्रचार केला. यासह समर्थांच्या वरील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास केला. स्वामींनी अनेक ग्रंथ, स्तोत्र रचना केली. वर्ष १९७३ मध्ये वरदहळ्ळी (वरदपूर, जिल्हा शिमोगा, कर्नाटक) येथे महासमाधी घेतली.
(साभार : ‘दत्त महाराज’ संकेतस्थळ)