दादर रेल्‍वेस्‍थानकाबाहेरील हनुमान मंदिर तोडण्‍यासाठी रेल्‍वेकडून मंदिर विश्‍वस्‍तांना नोटीस !

मुंबई – दादर (पूर्व) रेल्‍वेस्‍थानकाच्‍या बाहेर असलेले श्री हनुमान मंदिर रेल्‍वेच्‍या जागेत असून ते अवैध असल्‍यामुळे तोडून टाकावे, अशी नोटीस मध्‍य रेल्‍वे प्रशासनाकडून मंदिराच्‍या विश्‍वस्‍तांना धाडण्‍यात आली आहे. मंदिर न तोडल्‍यास रेल्‍वे प्रशासनाकडून मंदिर तोडले जाईल आणि त्‍याचा व्‍यय विश्‍वस्‍तांकडून वसूल केला जाईल, अशी उद्दामपणाची भाषा वापरण्‍यात आली आहे. मंदिराच्‍या विश्‍वस्‍तांनी मात्र वर्ष १९६९ मध्‍ये या मंदिराची धर्मादाय आयुक्‍त कार्यालयात ‘सार्वजनिक विश्‍वस्‍त संस्‍था’ म्‍हणून नोंदणी केली आहे.

४ डिसेंबर या दिवशी हे मंदिर तोडण्‍याची नोटीस मध्‍ये रेल्‍वेच्‍या साहाय्‍यक मंडळाच्‍या कार्यकारी अभियंत्‍यांनी पाठवली आहे. दादर रेल्‍वेस्‍थानकाला लागूनच पूर्व भागात हे हनुमान मंदिर आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत नियमित सहस्रावधी भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. काही प्रवासी तर आरतीसाठी मंदिरात उपस्‍थित रहातात. प्रवासाला जातांना आणि कामावरून आल्‍यावर अनेक भाविक मंदिरात दर्शन घेतात. मंदिर पाडण्‍याविषयी मध्‍य रेल्‍वे प्रशासनाने पाठवलेल्‍या नोटिसीविषयी प्रतिक्रिया व्‍यक्‍त करतांना श्री हनुमान मंदिराचे विश्‍वस्‍त प्रकाश कारखानीस म्‍हणाले की, विकासाच्‍या नावाखाली सरकार लाखो भाविकांच्‍या भावना पायदळी तुडवून विकास करत असेल, तर तो विकास नाही, भकास ठरेल. मंदिर तोडण्‍याचा प्रकार हा भाविकांच्‍या धार्मिक भावना दुखावणारा आहे.