श्री दत्तात्रेयांचे तपश्चर्या स्थान : श्री गिरनार माहात्म्य !
भगवान श्री दत्तात्रेयांची भारतभरात अवतार कार्य केलेली अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये गाणगापूर, नरसोबाची वाडी, अक्कलकोट, माणगाव, श्री कुरवपूर, श्री पीठापूर इत्यादी आहेत. या सर्वांमध्ये एक महत्त्वाचे स्थान आहे ते म्हणजे गिरनार पर्वत ! श्री दत्तगुरूंची काही स्थाने गावांत, तर काही घनदाट जंगलात आहेत, गुजरातमधील हे स्थान मात्र पुष्कळ उंचावर आहे. भगवान श्री दत्तात्रेयांच्या १२ सहस्र वर्षांच्या तपश्चर्येने पावन झालेले तीर्थक्षेत्र म्हणजे गिरनार होय ! या तीर्थक्षेत्राचे माहात्म्य या लेखातून जाणून घेऊया.
१. गिरनारची प्राचीनता
गिरनारचे मूळ नाव गिरी नारायण असे आहे. येथील गीर गायी प्रसिद्ध आहेत. शिवपुराणात रेवतांचल पर्वत असे त्याचे नाव, अन्य पुराणांत गिरनारचे नाव रेवत, रेवतांचल आहे. पुराणांमध्ये श्वेताचल, श्वेतगिरी असाही उल्लेख आहे. गिरनार पर्वत हिमालयाहून अधिक प्राचीन आहे, असे सांगितले जाते. आधी गिरनारची निर्मिती झाली नंतर हिमालय झाला. त्यामुळे हिमालयाप्रमाणे गिरनारचे आध्यात्मिक महत्त्व आहे. गिरनारची रेवतांचल, कुमुद, उज्जयंत ही नावे त्रैमूर्तींशी (ब्रह्मा, विष्णु आणि शंकर) निगडित आहेत. गिरनार पर्वताचा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी जगताने संपन्न, विविध औषधी वनस्पतींनी युक्त आहे.
२. गिरनारमधील विविध स्थाने
गुजरात राज्यातील जुनागढ (सौराष्ट्र) येथून ५ कि.मी. अंतरावर तलेठी येथे, म्हणजे गिरनार पर्वताच्या पायथ्याला पोचतो. श्री दत्तगुरूंच्या तपश्चर्येच्या स्थानापर्यंत म्हणजे गुरुशिखरापर्यंत जाण्यासाठी १० सहस्र पायर्यांचे अंतर पार करावे लागते. २,६०० पायर्यांच्या आसपास राणक देवीमातेची शिळा आहे. त्या शिळेवर दोन हातांच्या पंजाचे निशाण आहे. थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे ३,५०० पायर्यांपाशी प्रसूतीबाईदेवीचे स्थान आहे. मूल झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणार्या भाविकांची संख्या मोठी आहे. बाजूला जैन मंदिर येते, हे मुख्य मंदिर २२ वे जैन तीर्थंकर नेमिनाथ यांचे आहे. प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे. नेमिनाथ याच ठिकाणी ७०० वर्षे साधना करत होते अन् हेच त्यांचे समाधीस्थान आहे. गौ-मुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर ४ सहस्र ८०० पायर्यांवर अंबाजी टुंक येते, म्हणजेच अंबादेवीचे हे मंदिर आहे.
५१ शक्तिपीठांपैकी हेही एक शक्तिपीठ आहे. देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला. पुढे ५ सहस्र ५०० पायर्यांवर श्री गोरक्षनाथ टुंक हे स्थान येते. गिरनार पर्वतावरील उंच शिखरावर हे स्थान आहे. समुद्र सपाटीपासून ३ सहस्र ६६६ फुटांवर हे स्थान येते. थोडे अंतर पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागतात. एक उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे ३०० पायर्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे समोर १ सहस्र पायर्या चढल्यावर गुरुशिखर हे उभ्या सुळक्यासारखे आहे. श्री दत्तगुरूंच्या चरणपादुका या स्थानी उमटलेल्या आहेत. याच स्थानावर बसून भगवान श्री दत्तात्रेयांनी १२ सहस्र वर्षे तपश्चर्या केली आणि हे त्यांचे अक्षय्य निवासस्थान आहे, अशी श्रद्धा सर्व दत्तभक्तांमध्ये आहे. १० x १२ चौरस फूट जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती, एक पुजारी बसू शकेल एवढी जागा आहे.
ख्रिस्तपूर्व १ सहस्र वर्षांपूर्वी राजा कुमारपाल यांनी गिरनारवर चढण्यासाठी या १० सहस्र पायर्यांची निर्मिती केली होती. प्रत्येक पौर्णिमेला येथे शेकडो दत्तभक्त येतात आणि गुरुशिखरापर्यंत जाऊन दर्शन घेतात. गुजरात सरकारकडून सध्या अर्ध्या पायर्यांपर्यंत जाण्यासाठी ‘रोप-वे’ची सुविधा करण्यात आली आहे. येथे डोलीची (वर जाण्यासाठी पालखीप्रमाणे व्यवस्था) व्यवस्थाही आहे, तिचाही वयोवृद्ध भाविक लाभ घेतात.
गिरनारच्या बाजूला असणार्या दोन डोंगरावर रेणुकामाता आणि अनसूयामाता विराजमान आहेत. गिरनारच्या शेजारी भव्य दातार पर्वत दिसतो. या पर्वतावर चढतांना साधारण ३ सहस्र पायर्यांवर दातार भगवान वसले आहेत. त्यापुढे नवनाथांचे स्थान आहे. या पर्वतावर चढण्याचा रस्ता पुष्कळ अवघड आहे. दातार पर्वताच्या समोरच असलेला जोगीणीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. या डोंगरावर ६४ योगिनींचा वावर आहे.
३. गिरनार येथील कुंड आणि तीर्थस्थाने
गिरनार येथे अनेक संतांना श्री दत्तप्रभूंनी साक्षात् दर्शन दिले आहे. येथे अनेक सिद्धयोगी गिरनारच्या गुहांमध्ये शेकडो वर्षांपासून साधना करत आहेत. गिरनार पर्वताच्या पायथ्याला म्हणजेच तलेठीला भवनाथ मंदिर, भगवान महादेव मंदिर, मृगी कुंड, लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन स्थळे आहेत. महाशिवरात्रीला येथे ५ दिवसांची जत्रा भरते. महाशिवरात्रीच्या मेळ्याला मृगी कुंडाजवळ भगवान महादेव मंदिरात दर्शनाला १० ते १२ लाख लोक जमा होतात. मृगी कुंडातील सिद्धांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण असते. याविषयी अशी श्रद्धा आहे की, स्वत: भगवान शिव या कुंडात स्नानासाठी येतात. मृगी कुंडामध्ये हे नागा साधू स्नानासाठी उतरतात, त्या साधूंमध्ये असा एक साधू असतो की, जो मृगी कुंडात डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही. अंतर्धान पावतो, तोच स्वत: भगवान शिव असतो. आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा, निरंजन आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा असे अनेक आखाडे आहेत. गिरनार हे नवनाथांचेही मोठे स्थान आहे.
४. श्री दत्त महाराजांची धुनी
गिरनार पर्वतावरील कमंडलू स्थान आहे. येथे श्री दत्त महाराजांची अखंड धुनी आहे. येथे असलेली धुनी ५ सहस्र वर्षांपासून आहे, असे सांगितले जाते. ही धुनी एक दैवदुर्लभ देणगी आहे. आजही ती धुनी प्रत्येक सोमवारी सकाळी सुमारे ६ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास तासाभरासाठी प्रकट होते. याविषयी अशी कथा सांगितली जाते की, भगवान दत्तात्रेय सहस्रो वर्षे दत्तटुंकवर (शिखरावर) ध्यानस्थ बसले असतांना प्रजा दुष्काळाने हैराण झाली होती. प्रजेची दया येऊन देवी अनसूयामातेने श्री दत्तात्रेयांना ध्यानावस्थेतून बाहेर काढण्यासाठी हाक मारली. तेव्हा भगवान दत्तात्रेयांचे कमंडलू खाली पडले. एक भाग एकीकडे आणि दुसरा भाग दुसरीकडे, असे त्याचे विभाजन झाले. एके ठिकाणी अग्नी (जिथे धुनी आहे) प्रकटला, तर दुसर्या स्थानावर गंगा अवतरून जलकुंड निर्माण झाले. तेच हे कमंडलू स्थान आहे. कमंडलू कुंड स्थानी असलेले साधू सुमारे ५-६ मण काष्ठे (पिंपळाची लाकडे) समर्पित करतात आणि एका विशिष्ट क्षणी श्री दत्तात्रेय निर्मित स्वयंभू अग्नीनारायणाची २ पुरुष उंचीची ज्वाला प्रकटते. भाविक-भक्त यांना या ज्वालेत श्री दत्तगुरूंचे दर्शन होते.
येथे एक आश्रम आहे. एवढ्या पुष्कळ उंचीवर येथे असलेल्या या आश्रमात अन्नछत्रही २४ घंटे चालू असते. तेथे अनेक वर्षांपासून भाविकांसाठी प्रसाद-महाप्रसाद यांची विनामूल्य व्यवस्था केली जात आहे. ३ सहस्र फुटांवर ही व्यवस्था करणे तसे आव्हानात्मक आहे; मात्र तेथील सेवेकरी सेवाभावाने करतात. येथील धुनीतील विभूती भाविकांना दिली जाते.
गिरनार येथील काही अद्भुत गोष्टी !
गिरनार येथील काही गोष्टी या अद्भुत, रहस्यमयी आणि गूढही आहेत. याविषयी गुजरात येथील आणि गिरनार यात्रा नित्यनेमाने करणारे स्वामी योगेश्वरानंदगिरी उपाख्य स्वामी यो यांनी त्यांच्या अन् अन्य ‘यू ट्यूब’ वाहिनीवर विस्ताराने सांगितले आहे. स्वामी यो यांनी सांगितले की, येथे गूढ गोष्टी पुष्कळ आहेत. गिरनार येथील काही ठिकाणे ही वेळ आणि अवकाश या मितींच्या पलीकडे आहेत. अशा काही गुप्त गुहा येथे आहेत, तेथे शेकडो वर्षांपासून काही दिव्य ऋषि साधना, तपश्चर्या करत आहेत. याविषयी एक विलक्षण अनुभव स्वामी लीलाशहा (पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे गुरु) यांचा आहे. त्यांच्या शिष्याला या गुप्त गुहांविषयी केवळ माहिती होते, एकदा त्याने स्वामी लीलाशहा यांच्याकडे या गुप्त ऋषींच्या दर्शनाविषयी विचारले. तेव्हा स्वामी लीलाशहा यांनी ‘तुला एकदा दर्शन घडवतो’, असे सांगितले. ते गिरनार पर्वताजवळ एके ठिकाणी गेले, तेथे प्रत्यक्ष पुष्कळ उंचच उंच पर्वताच्या भिंती होत्या. स्वामी लीलाशहा यांनी शिष्याला सांगितले की, मी करतो तसे तू कर आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकले अन् ते त्यांच्या शिष्याला दिसेनासे झाले. शिष्याला नेमके काय झाले ? हे कळले नाही आणि तो तेथेच उभा राहिला. त्यामुळे स्वामी लीलाशहा पुन्हा पर्वतातून बाहेर आले आणि त्याला ‘तुला सांगितले ना की, मी करतो तसे कर !’, असे सांगितले. तेव्हा शिष्य भानावर आला आणि त्याने स्वामी लीलाशहा यांच्याप्रमाणे एक पाऊल पुढे टाकले आणि त्याने एका वेगळ्याच जगात प्रवेश केला, असे त्याला लक्षात आले. तो अशा एका गुहेत पोचला होता की, तेथे त्याला जटा असलेले अनेक साधू, ऋषि तपश्चर्या करत आहेत, असे दिसले. स्वामी लीलाशहा यांनी त्यांना साधू-ऋषी यांना नमस्कार करण्यास सांगितले आणि ते नंतर परत आले. तेव्हा या अद्भुत दर्शनाने भक्त धन्य झाला.
स्वामी योगेश्वरानंदगिरी यांना एक साधू भेटले होते, तेव्हा त्यांनी त्यांचे वय ‘९०० वर्षे आहे’, असे सांगितले होते. गिरनार येथीलच एक अतिशय वृद्ध साधू स्थानिक गावात गेला आणि म्हणाला, ‘‘आता राजा कोण आहे ?’’ तेव्हा तेथे उपस्थित गावकर्यांनी आता लोकशाही आहे, राजेशाही नाही, असे सांगितले. तेव्हा लोकांनी तुम्ही कोणत्या राजाविषयी बोलत आहात. तेव्हा वृद्ध साधूने सांगितले की, मी मागील वेळी ‘अकबर राजा आहे’, असे ऐकले होते. तेव्हा त्या साधूच्या वयाचा अंदाज गावकर्यांना आला.
गिरनार येथे अश्वत्थाम्याचेही वास्तव्य आहे. येथील एका दुर्गम भागातील मंदिरात शिवपिंडीवर फुले आणि बेलपत्र वाहिलेले पुजार्यांना आढळतात. ‘ती अश्वत्थामा स्वत: वहाण्यास येतो’, असे स्थानिक पुजारी सांगतात. गिरनार येथे पर्वतावर काही दगड लटकत आहेत, असे वाटते; मात्र ते पडत नाहीत. येथील स्थानिक राणीने गिरनार पर्वताला तिचा भाऊ मानले. जेव्हा परकियांनी तिच्यावर आक्रमण केले, तेव्हा राणीने पर्वताला प्रार्थना केली. त्या वेळी पर्वतावरून शेकडो दगडांचा वर्षाव शत्रूसैन्यावर झाला आणि राणीचे राज्य अभेद्य राहिले. तसे अद्यापही काही दगड आहेत.
गिरनार येथे अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत, एवढेच की, या वनस्पतींची तितकीशी माहिती नाही. पर्वतावर चढणार्या एका भाविकाने चढता चढता सहज एका वनस्पतीची पाने खाल्ली आणि पुढील काही मिनिटांमध्येच त्याचे दात निघाले. पूर्वीच्या काळी डोक्यावरील विशिष्ट नस दाबल्यावर दात सहज निघायचे, अशी विद्या भारतात होती. ही विद्या सध्या लुप्त आहे; मात्र वनस्पतीमुळेही दात निघाले. एका साधूंसह त्यांचे एक भक्त सहज बोलत असतांना केस गळून टक्कल पडण्याची समस्या त्यांनी साधूंना सांगितली. तेव्हा साधूने सहज हाताला आलेली एक वनस्पती काढून दिली, तिचे चूर्ण करून डोक्यावर लावल्यावर व्यक्तीला पुन्हा केस आले.
येथील काही संतांच्या समाध्या या कालपरत्वे भूमीत गडप झाल्या आहेत. येथे काही कामानिमित्त उत्खनन केल्यावर या समाध्या आढळतात. जेव्हा त्या वर उकरून काढल्या जातात, तेव्हा त्यामध्ये पेटता दिवा आढळतो. हा दिवा कोण पेटवतो ? हे आश्चर्य आहे. येथील एका साधूने तर त्याच्याजवळ सेवाभावी वृत्तीने सेवा करणार्या आर्थिक दुर्बल भक्ताला एक सोन्याची वस्तू उपलब्ध करून दिली. ती विकत घेतांना स्थानिक प्रशासकीय अधिकार्यांना सोनाराने संपर्क केला. तेव्हा ही सोन्याची वस्तू सिद्धीपासून निर्माण केली आहे, असे प्रशासकीय अधिकार्याला लक्षात आले आणि त्यांनी त्या साधूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. अशा अनेक अद्भुत गोष्टी आणि या गूढ गोष्टींची जाण असणारे काही महात्मे गुप्त रूपाने गिरनार येथे वास्तव्याला आहेत. श्री दत्तप्रभूंचे जे अवतार झाले, तेही अनेक गूढ विद्या, सिद्धी यांनी संपन्न आणि भक्तांची दु:खे, त्रास हरण करणारे होते.
– श्री. यज्ञेश सावंत
५. श्री गिरनार परिक्रमा
‘गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेवून त्याला प्रदक्षिणा करणे’, यालाच ‘परिक्रमा करणे’, असेही म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे. गिरनारच्या भोवती पूर्ण जंगल आहे. जे सध्या वन विभागाच्या अखत्यारीत आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही. केवळ या परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस परिक्रमेपुरता प्रवेश मिळतो. या जंगलात मुंगी, विंचूपासून सिंहापर्यंत भरपूर प्राणी आहेत. गिरची जंगले ही सिंहासाठी प्रसिद्ध आहेत; पण या ५ दिवसांत हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत, ही दत्तगुरूंचीच कृपा आहे. देव आणि त्यांचे गण हेसुद्धा या कालावधीत परिक्रमेसाठी येतात अन् परिक्रमा करतात, अशी आख्यायिका आहे. या जंगलात तेव्हा ३३ कोटी देवता आणि ८४ सहस्र ऋषी यांचे वास्तव्य असते. या जंगलात किमान १ रात्र वास्तव्य करून तेथील चैतन्य आिण आध्यात्मिक वातावरण यांचा लाभ घेता येतो. ही परिक्रमा तशी खडतर असते, ३ डोंगर चढणे, उतरणे, दगड-धोंडे यातून प्रवास करावा लागतो. कळत नकळत घडलेल्या अनेक पापांपासून मुक्ती ही परिक्रमा केली असता मिळते. त्यामुळे प्रचंड संख्येने भक्त मंडळी ही परिक्रमा करतात.
भक्तांच्या कल्याणासाठी अनादी कालापासून कार्यरत असलेल्या भगवान श्री दत्तात्रेयांच्या चरणी कोटी कोटी वंदन !
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (७.१२.२०२४)