श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या कांचीपूरम् येथे रहायला येण्यामागील पार्श्वभूमी !

कामाक्षीदेवीचे वस्त्र (उपरणे) परिधान केलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘संपूर्ण विश्वात कधीही नष्ट न होणार्‍या सप्तपुरी आहेत. त्यांपैकी ‘कांचीपूरम्’, ही एक नगरी आहे. ही मोक्षपुरीही आहे. कामाक्षीदेवी ही या नगराची अधिष्ठात्री देवता आहे. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ‘कांचीपूरम्’मध्ये रहायला येण्यामागील कार्यकारणभाव पुढे दिला आहे.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. कांचीपूरम् येथील ‘एकांबरेश्वर’मंदिरात गेल्यावर घडलेला एक प्रसंग !

१ अ. सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कांचीपूरम् येथील ‘एकांबरेश्वर’ मंदिरात जाणे : १.७.२०२३ या दिवशी, म्हणजे गुरुपौणिमेच्या दोन दिवस आधी सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना कांचीपूरम् येथील ‘एकांबरेश्वर’ मंदिरात जाण्यास सांगितले. दक्षिण भारतात शिवाची पंचमहाभुतांशी संबंधित ५ मंदिरे आहेत. त्यांपैकी ‘एकांबरेश्वर’ हे शिवाचे पृथ्वीतत्त्वाशी संबंधित मंदिर आहे. त्याप्रमाणे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत आम्ही (मी, श्री. वाल्मीक भुकन, श्री. स्नेहल राऊत (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३८ वर्षे) आणि श्री. विनीत देसाई)) त्या मंदिरात गेलो.

१ आ. मंदिरातून बाहेर आल्यावर केवळ श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची पादत्राणे नाहीशी होणे आणि ती शोधूनही न सापडणे : ती संध्याकाळची वेळ होती. आम्ही पादत्राणे बाहेर काढून मंदिरात गेलो. देवदर्शन झाल्यानंतर बाहेर आल्यावर आम्हा सर्व मुलांची पादत्राणे होती; मात्र श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची पादत्राणे दिसत नव्हती. मी आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ मंदिराच्या बाहेर उभे राहिलो आणि जवळच श्री. वाल्मीक भुकन, श्री. स्नेहल राऊत अन् श्री. विनीत देसाई, हे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची पादत्राणे शोधत होते.

१ इ. एका उंच व्यक्तीने जवळ येऊन श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना कांचीपूरम्मधील गुरुपौर्णिमेविषयी विचारणे : तेवढ्यात एक उंच व्यक्ती आमच्या जवळ आली. तिने श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याप्रतीच्या आदराने स्वतःच्या पायांतील पादत्राणे काढली आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे पाहून ती तमिळ भाषेत म्हणाली, ‘‘उद्या गुरुपौर्णिमा आहे. ‘कांचीपूरम्मध्ये गुरुपौर्णिमा कुठे साजरी केली जाते ?’, हे तुम्हाला ठाऊक आहे का ?’’ त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘‘स्वामी, आम्ही कांचीपूरम् येथील निवासी नाही. सध्या आम्ही चेन्नईला असतो. कांचीपूरम्विषयी आम्हाला काही ठाऊक नाही.’’ तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, ‘‘गुरुपौर्णिमा ही व्यासऋषींसाठी असते. तिला ‘व्यासपौर्णिमा’, असेही म्हणतात.’’

१ ई. मस्तकावर विभूतीचे त्रिपुंड्र असलेली ती व्यक्ती दिसेनाशी होणे आणि शोधूनही ती व्यक्ती न सापडणे : तेवढ्यात आम्ही पादत्राणे शोधत असलेल्या साधकांकडे मागे वळून पाहिले आणि परत वळून समोर पाहिले, तर ती व्यक्ती दिसेनाशी झाली होती. त्या वेळी मंदिरात दर्शनासाठी अनेक भक्त आले होते. आम्ही त्या व्यक्तीला शोधत पुष्कळ दूरपर्यंत गेलो, तरी ती व्यक्ती कुठेही सापडली नाही. त्या व्यक्तीच्या मस्तकावर विभूतीचे त्रिपुंड्र (टीप) होते.

टीप : त्रिपुंड्र म्हणजे विभूतीच्या तीन आडव्या रेषा. हे कपाळावर लावले जात असून भगवान शिवाशी संबंधित आहे.

१ उ. ‘ती व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष शिवच असल्याचे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगणे : थोड्या वेळाने श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ आम्हाला म्हणाल्या, ‘‘ती व्यक्ती म्हणजे दुसरी कुणी नसून साक्षात् शिवच होती.’’ हे सर्व ४ – ५ मिनिटांमध्ये घडले. त्या वेळी आम्हाला ‘काय घडत आहे ?’, हे समजले नाही.

२. सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कांचीपूरम् येथे रहाण्याचे ठरवणे

श्री. विनायक शानभाग

सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे वर्ष २०२३ मधील नवरात्रीच्या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी आपत्काळाच्या दृष्टीने चेन्नई सोडून कांचीपूरम् येथे निवासाला जाण्याची सिद्धता चालू केली. आम्ही वर्ष २०२३ मध्ये विजयादशमीनंतर ४ दिवसांनी कांचीपूरम् येथे एका भाड्याच्या घरात रहायला आलो.

आपल्या पुराणांमध्ये कांचीपूरम्ला ‘भूकैलास’ असेही म्हटले आहे. शिवपुराणात असे म्हटले आहे की, शिवाचे २ नेत्र आहेत, ते म्हणजे ‘काशी’ आणि ‘कांची’ ! काशीला (वाराणसीला) तर आपले साधक आहेतच. आता शिवाच्या कृपेने कांचीलाही म्हणजे कांचीपूरम्लाही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा आश्रम होत आहे, असे आम्हाला वाटले.

३. सप्तर्षींनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना पुष्कळ वेळा कांचीपूरम् येथे जायला सांगणे

जानेवारी २०१५ मध्ये श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ पहिल्यांदा कांचीपूरम् येथे आल्या. एप्रिल २०१५ मध्ये त्या जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींच्या संपर्कात आल्या. वर्ष २०१५ ते २०२३ या ८ वर्षांच्या कालावधीत सप्तर्षींनी ५० हून अधिक वेळा श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना कांचीपूरम् येथे जायला सांगितले आणि त्यानुसार त्या तितक्या वेळा गेल्याही.

४. ईश्वर, सप्तर्षी आणि गुरु यांनी साधकांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समवेत पुढे कांचीपूरम् येथे रहायला येण्याविषयीचे दैवी संकेत देणे अन् त्यांचा नंतर उलगडा होणे

ईश्वर, सप्तर्षी आणि गुरु आम्हाला वेगवेगळ्या माध्यमांतून असे संकेत देत होते की, पुढे आम्हा साधकांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत कांचीपूरम्सारख्या तीर्थक्षेत्री जाऊन रहावे लागणार आहे; पण हे दैवी संकेत त्या वेळी आमच्या लक्षात आले नाहीत. आता मात्र प्रत्यक्षात आम्हाला देवी कामाक्षीच्या भूमीत रहाण्याचा योग आला आहे. त्यामुळे ‘हे सगळे कामाक्षीदेवीने घडवून आणले’, हे आमच्या लक्षात आले. श्री कामाक्षीदेवीलाच तिची लीला ठाऊक आहे. त्यामुळे ‘श्री कामाक्षीदेव्याः चरणारविन्दे मम शरणम् ।’, म्हणजे ‘मी श्री कामाक्षीदेवीच्या चरणकमलांपाशी शरण आलो आहे.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४२ वर्षे), कांचीपूरम्, तमिळनाडू. (२१.१०.२०२४)


श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ कांचीपूरम्च्या कामाक्षीच्या मंदिरात गेल्यावर मंदिराच्या विश्वस्तांनी त्यांचा सन्मान करणे आणि त्यांना प.पू. गुरुदेवांना भेट देण्यासाठी देवीचे वस्त्र देणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

वर्ष २०१६ मध्ये प.पू. गुरुदेवांच्या अमृतमहोत्सवाच्या काही दिवस आधी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ कांचीपूरम् येथील कामाक्षीदेवीच्या मंदिरात आल्या होत्या. तेव्हा मंदिराचे विश्वस्त श्री. विश्वनाथ शास्त्री यांनी त्यांचा सन्मान केला आणि प.पू. गुरुदेवांना अमृतमहोत्सवाच्या दिवशी भेट देण्यासाठी कामाक्षीदेवीचे वस्त्र दिले. सप्तर्षींच्या आज्ञेने गुरुदेवांनी त्यांच्या अमृतमहोत्सवाच्या दिवशी हे वस्त्र धारण केले.

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४२ वर्षे), कांचीपूरम्, तमिळनाडू. (२१.१०.२०२४)