श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेला लोकसंग्रह !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांच्यातील प्रीती या गुणामुळे रामनाथी आश्रमात असतांना तेथे आलेले आणि नंतर भारतभर भ्रमण करतांना भेटलेले विविध क्षेत्रांतील संत अन् मान्यवर यांना सनातन संस्थेशी कसे जोडले ?, ते आपण विशेष पुरवणीच्या पृष्ठ ३ वरील लेखात पाहिले. येथे तमिळनाडूतील कांचीपूरम्मधील ‘वेडाल’ या लहानशा गावी नव्याने रहायला गेल्यावर तेथे केलेला लोकसंग्रह जाणून घेऊ.

तमिळनाडूतील कांचीपूरम्मधील ‘वेडाल’ या लहानशा गावी नव्याने रहायला गेल्यावर तेथे केलेला लोकसंग्रह !

चेन्नई येथे संपर्कात आलेले शिंपी १. श्री. पळनी वेल यांनी गावी बांधलेले नवीन घर पहायला बोलावल्यावर त्यांच्या निमंत्रणाचा मान राखून श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ तेथे गेल्या. पळनी वेल यांना भेटवस्तू देतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ. समवेत पळनी वेल कुटुंबीय

१. ४ – ५ मासांतच दारावर येणारा भाजीवाला, दूधवाला इत्यादींना आपलेसे करणे : ऑक्टोबर २०२३ मध्ये श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली या तमिळनाडूतील चेन्नई येथून ६० कि.मी. अंतरावर असलेल्या कांचीपूरम्मधील ‘वेडाल’ या लहानशा गावी रहायला गेल्या. खरेतर नवीन ठिकाणी रहायला गेल्यावर आपल्या ओळखी लगेच होणे कठीण असते; पण श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली यांनी त्यांच्यातील ‘प्रीती’ या गुणामुळे अगदी ४ – ५ मासांतच (महिन्यांतच) दारावर भाजी विकायला येणारा भाजीवाला, दूधवाला, फुले आणि गजरे विकायला येणारी बाई, तेथील रिक्शावाला इत्यादींना आपलेसे केले आहे. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली त्या व्यक्तींची प्रेमाने विचारपूस करतात, तमिळनाडूत ऊन पुष्कळ असल्याने त्यांना आत बोलावून पाणी देतात, काही वेळा त्यांना विभूती देतात, काही सणवारी त्यांना देवाचा प्रसाद देतात, देवतेचे एखादे चित्र देतात.

२. जवळीक झालेल्या व्यक्तींच्या मनात श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली यांच्याप्रती ‘माताजी’, म्हणजे ‘गुरु’ म्हणून भाव असणे : जवळीक झालेल्या या व्यक्ती शेजारच्याच गावातील आणि निर्मळ मनाच्या आहेत. त्यांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली यांचे श्रेष्ठत्व लक्षात येते. त्या व्यक्ती श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली यांच्या घरासमोरील अंगणातून घरात येतांना त्यांची पादत्राणे अंगणाबाहेर काढतात; कारण त्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली यांना ‘माताजी’, म्हणजे ‘गुरु’ मानतात. ‘माताजींच्या आश्रमात पादत्राणे घालून कसे जायचे !’, असा त्यांचा भाव असतो. त्या व्यक्ती आता एवढ्या परिचित झाल्या आहेत की, त्या व्यक्तींच्या घरी काही मंगलकार्य असेल, तर त्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली यांनाही निमंत्रण देतात आणि त्यांना ‘तुमचा आशीर्वाद असू दे’, अशी प्रार्थना करतात.

१. बांधकाम व्यावसायिक श्रीधरजी आणि त्यांचे कुटुंबीय यांची भेट घेतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ. २. समवेत श्री. विनायक शानभाग. ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद मिळावा’, अशी श्रीधरजी यांची इच्छा होती. (वर्ष २०२४)

३. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली या सध्या ज्या २०० बंगले असलेल्या संकुलात रहात आहेत, त्या संकुलात त्या ‘माताजी’ म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत ! : श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली यांच्याकडे कुणी पहिल्यांदाच आले की, त्या संकुलाचे रखवालदार ‘माताजींचे घर आम्हाला ठाऊक आहे’, असे म्हणून त्यांच्याकडे लगेच आणून सोडतात.

४. कांचीपूरम्मधील एका प्रसिद्ध देवीच्या मंदिरातील मुख्य पुजार्‍यांपैकी एका पुजार्‍यांचा ‘साक्षात् देवीच आमच्या गावात रहायला येणार आहे !’, असा भाव असणे आणि त्यामुळे त्यांनी स्वतः येऊन श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली यांच्या गृहप्रवेशाच्या वेळी वेदमंत्र म्हणणे : श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली कांचीपूरम्मध्ये रहायला येणार आहेत, हे कांचीपूरम्मधील एका प्रसिद्ध देवीच्या मंदिरातील मुख्य पुजार्‍यांपैकी एका पुजार्‍यांना कळले. त्यांचा श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. ते म्हणाले, ‘‘साक्षात् देवीच आमच्या गावात रहायला येणार आहे ! त्यामुळे त्यांच्या गृहप्रवेशाच्या दिवशी मी स्वतः येणार.’’ त्याप्रमाणे ते आणि त्यांच्याबरोबरचे आणखी एक पुजारी आले. त्यांनी केलेल्या वेदमंत्रांसहित श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली यांनी त्या नवीन घरात प्रवेश केला.

५. ‘प्रीती’ या गुणामुळे साधनेत कसे साहाय्य होते’, याची अनुभूती श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली यांच्या बरोबरच्या साधकांना पदोपदी मिळत असणे : श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली यांच्याशी जोडलेल्या व्यक्ती सात्त्विक असतात. ओळख झालेली व्यक्ती तिच्याशी परिचित असलेल्या आणखी एखाद्या चांगल्या व्यक्तीशी ओळख करून देते. पुढे ती व्यक्ती आणखी एकाशी ओळख करून देते. अशा प्रकारे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली यांच्या संपर्कातील व्यक्ती वाढत गेल्या आहेत. अशा व्यक्तींमुळे पुष्कळ साहाय्य होते, तसेच योग्य दरात आणि चांगल्या वस्तू आपोआपच मिळतात. यातून देवच साहाय्य करतो. ‘प्रीती’ या गुणामुळे साधनेत कसे साहाय्य होते’, याची अनुभूती श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली यांच्या बरोबरच्या साधकांना पदोपदी मिळत आहे.

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे पती), पीएच्.डी., गोवा. (२५.११.२०२४)