संपादकीय : बुद्धीबळाचा विश्वविजेता गुकेश !
दोम्माराजू गुकेश याने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी बुद्धीबळ खेळातील ‘विश्वविजेता’ होण्याचा बहुमान मिळवला आहे. बुद्धीबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत त्याने विश्वविजेत्या चीनच्या ३८ वर्षीय डिंग लिरेनवर १४ व्या आणि शेवटच्या डावात आक्रमक चाल करून मात केली. डी. गुकेशने एवढ्या लहान वयात विश्वविजेता बनून या आधी रशियाच्या गॅरी कॅस्पारोव्हचा २२ व्या वर्षी केलेला जगज्जेता बनण्याचा विक्रम मोडला. तो भारताचाही विश्वविजेतेपदाला गवसणी घालणारा ‘सर्वांत युवा खेळाडू’ ठरला आहे. गुकेशने भारताचे नाव उंचावल्याने त्याच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ५ वेळा विश्वविजेता ठरलेले भारताचे महान बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांनीही गुकेशचे कौतुक केले आहे. त्यांच्याच अॅकॅडमीत गुकेश प्रशिक्षण घेत होता. ‘मूळ भारतीय खेळ असलेल्या या खेळाचे भारताचे वैभव पुन्हा मिळण्याकडे आता वाटचाल होत आहे’, असे म्हणावे लागेल.
बुद्धीबळाचा इतिहास
बुद्धीबळ खेळाचा उगम भारतातील आहे. भारतात त्याला ‘चतुरंग’ म्हणायचे. ४ खेळाडूंमध्ये खेळला जाणारा चतुरंग, म्हणजे सैन्याची ४ अंगे ज्यामध्ये पायदळ, घोडदळ, हत्ती आणि रथ यांचा समावेश होता. हा खेळ गुप्त राजवटीतही खेळल्याचे दाखले मिळतात. त्यानंतर पशिर्या, अरबस्थान येथून तो चीनसह जगभर पसरला आहे, म्हणजे बुद्धीबळ खेळाला भारतीय परंपरा आहे. भारतीय बुद्धीमत्तेचा डंका तेव्हाही जगात होता. राजेलोक हा खेळ खेळायचे; कारण शेवटी रणमैदानावर त्यांनाच समोरच्या राजाला प्रत्यक्षात चितपट करायचे असते. ६४ घरांचा हा खेळ ६४ कलांशीही संबंधित असू शकतो.
६४ घरांशी संबंधित तत्कालीन राजाची कथा प्रसिद्ध आहे. त्यामध्ये या खेळाचा निर्माता शुजा हा ६४ घरांच्या खेळासाठी बक्षीस म्हणून प्रत्येक दिवशी १ दाणा धान्य मागतो आणि पुढील प्रत्येक घरासाठी आधीच्या घराच्या धान्याच्या संख्येने गुणाकार करून शेवटच्या घरासाठी जी संख्या येईल, तेवढे धान्य मागतो. प्रारंभी त्याची मागणी हसण्यावारी नेणारा राजा, नंतर प्रत्यक्षात जेव्हा सहस्रो किलो धान्य द्यावे लागते, तेव्हा मात्र त्याला पश्चात्ताप होतो. बुद्धीबळाविषयी एवढी माहिती सांगण्याचे कारण म्हणजे त्याची प्राचीनता, इतिहास आणि भारतीयत्व मूळ अधोरेखित करणे आहे.
गुकेशचा प्रवास
मूळ भारतीय खेळाला जागतिक मान्यता मिळाली असली, तरी विश्वविजेतेपद मिळण्यासाठी विश्वनाथन आनंद यांच्यानंतर पुन्हा भारताला १२ वर्षे वाट पहावी लागली. गुकेश याचा बुद्धीबळ खेळाचा प्रवास विलक्षण आहे. त्याच्या आई-वडिलांनी त्याला खेळासाठी प्रोत्साहन दिले आहे. चेन्नईचा असलेल्या गुकेशच्या बुद्धीबळातील प्रवासाला वर्ष २०१३ मध्ये प्रारंभ झाला. आठवड्यातून ३ दिवस एक-एक घंटा सराव करून त्याने बुद्धीबळाचे धडे गिरवण्यास प्रारंभ केला. त्याने विविध वयोगटांमध्ये स्पर्धा जिंकल्यावर वर्ष २०१७ मध्ये तो आंतरराष्ट्रीय ‘मास्टर’ पुरस्काराचा मानकरी ठरला. गुकेशचे वडील डॉ. रजनीकांत यांनी वर्ष २०१७-१८ मध्ये स्वत:चे काम थांबवून गुकेशसमवेत प्रत्येक स्पर्धेच्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ असलेल्या त्याच्या आईने घरचे सर्व दायित्व स्वीकारले. सतत परदेशात प्रवास करण्याचा, तिथे रहाण्याचा, स्पर्धेसाठीचा व्यय भागवणे अवघड जात असल्याने या दोघांनी साहाय्याचे आवाहनही केले होते. गुकेशची बुद्धीबळातील गती पाहून त्याच्या आई-वडिलांनी इयत्ता ६ वीनंतर त्याचे शालेय शिक्षण थांबवून त्याला पूर्णवेळ या खेळासाठी खेळू दिले. हासुद्धा एक धाडसी निर्णय त्यांनी घेतला होता. या खेळावर संपूर्ण लक्ष केंद्रीत केल्यावर वर्ष २०१९ मध्ये गुकेशने ‘ग्रँडमास्टर’चा पुरस्कार पटकावला. त्यानंतर त्याला विश्वनाथन आनंद यांच्या अॅकॅडमीने जवळ केले. त्यानंतर त्याने ग्रँडमास्टर, ऑलिंपियाड, सुवर्णपदक, ‘कॅडिडेट्स’ असा वेगाने प्रवास केला. ‘कॅडिडेट्स’ या प्रकारात खेळणारा तो ‘सर्वांत युवा खेळाडू’ होता. या खेळात आगमन केल्यानंतर त्याने त्वरित ही स्पर्धा जिंकली. ग्रँडमास्टर स्पर्धा त्याने तो १२ वर्ष ७ मासांचा असतांना जिंकली होती. तेव्हा तो भारतातील ‘सर्वांत युवा ग्रँडमास्टर’, तर बुद्धीबळाच्या इतिहासातील दुसरा युवा ठरला होता.
डिंग लिरेन यांच्या समवेतची स्पर्धाही तशी चुरशीची होती. पहिल्या डावात डिंग विजयी झाले होते. त्यानंतरच्या डावात गुकेशने विजय मिळवला. पुढील ७ डाव बरोबरीत सुटल्यावर पुन्हा गुकेशची सरशी झाली. १२ व्या डावात पुन्हा डिंग यांचा विजय झाल्यावर १४ वा डाव डिंग यांनी बरोबरीत राखण्याचा प्रयत्न केला; मात्र या वेळी गुकेशने चांगली चाल खेळून विजय मिळवला. या खेळात बुद्धीबळासमवेत संयम आणि मन:स्थिती चांगली ठेवणेही आवश्यक असते. यातून बुद्धीबळासह मनोबलही हवे, हे लक्षात येते आणि मुख्य म्हणजे संयम, चिकाटी, अचूक निर्णयक्षमता या गुणांचाही कस लागतो. गुकेशने शेवटपर्यंत संयम ढळू न देता त्याचे विश्वविजेता होण्याचे बोलून दाखवलेले स्वप्न पूर्ण केले.
खेळाडूंना पाठिंबा हवा !
गुकेशच्या लहान वयातील या मोठ्या प्रवासात तो चांगल्या घरातील असूनही अशा स्पर्धा खेळण्यासाठी अन्य देशांमधील प्रवास, तेथे रहाणे, प्रशिक्षण यांसाठी आर्थिक साहाय्याची आवश्यकता पुष्कळ असते. गुकेशप्रमाणे भारतात असे विविध खेळांमध्ये पारंगत होऊ पहाणारे, त्यात सर्वोच्च कामगिरी करू पहाणारे होतकरू खेळाडू आहेत. काही खेळाडूंची आर्थिक स्थिती तेवढी चांगली नसल्याने त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करता येत नाहीत. त्यामुळे दुर्दैवाने त्यांना अंगभूत खेळगुणांना विकसित करता येत नाही. भारतात क्रिकेट या एकाच खेळाला अतिशय महत्त्व दिले गेल्याने अन्य खेळांच्या स्पर्धा वा खेळांविषयीची जागृती भारतियांमध्ये नाही. केवळ क्रिकेट या एका परदेशी खेळाभोवती भारतियांचे भावनाविश्व गुंतून रहाण्याला अन्यही कारणे आहेत, त्यामध्ये या खेळाचे मोठ्या प्रमाणात झालेले व्यापारीकरण, विज्ञापने, मंडळे अशा वेगवेगळ्या मार्गांनी खेळाचा पगडा बसला आहे. बुद्धीबळ खेळातील अन्य एक भारतीय नाव
के. प्रज्ञानंद ! त्यानेही लहान वयात अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. अशा गुणवान खेळाडूंना खरेतर सरकारने हेरून त्यांच्यासाठी कष्ट घेतले पाहिजे. ज्या खेळाडूंची आर्थिक क्षमता अल्प असते; पण ते खेळाडू गुणवान आहेत, राष्ट्राचे नाव उंचावू शकतात, अशा खेळाडूंच्या खेळावर सरकारने लक्ष केंद्रीत करायला हवे. नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात खेळाविषयीची धोरणे आणखी चांगली करण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. त्याचा लाभ खेळाडूंना होणे अपेक्षित आहे, तेव्हाच भारताची खेळविषयक प्रतिभा निश्चितच बहरेल !